Home »Magazine »Rasik» Article On Bollywood Heroine

पडद्यावरची पण तुमच्या- माझ्यातलीच!

नवी नायिका | Jan 05, 2013, 21:35 PM IST

  • पडद्यावरची पण तुमच्या- माझ्यातलीच!

भारतीय चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा ही सातत्याने पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेची, परिणामी पुरुषप्रधान बाजारपेठीय सत्तेची बळी ठरत आली. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’बनवला. त्यात त्यांनी पुराणातल्या ‘नायका’ची कथा मांडली. तेव्हा त्यात त्याची ‘अनुगामिनी’ पत्नी तारामती आपसूकच प्रेक्षकांसमोर आली. या ‘नायकानुगामिनी’ स्त्री प्रतिमेचा कित्ता त्यानंतर दशकानुदशके भारतीय चित्रपट गिरवत आला. मूकपटांच्या युगात फिअरलेस नादियाच्या व्यक्तिरेखांच्या अपवादाने प्रत्यक्षात नियमच सिद्ध करून दिला. पुरुषप्रधान समाजाला मनोरंजन माध्यमात जी स्त्री-प्रतिमा हवी असते, तीच दाखवणे म्हणजे बाजारपेठ सुरक्षित राखणे. स्त्री प्रेक्षकांनासुद्धा हीच प्रतिमा सुरक्षित आणि म्हणून सोयीची वाटत आली. पुरुष वर्चस्वाखाली राहणे, म्हणजे (पुरुषापासून?) सुरक्षित असणे, निवांत असणे ही पुरुषप्रधान समाजातील स्त्रीची गतानुगतिक मानसिकता.
1930 च्या दशकात ‘प्रभात’च्या चित्रपटांनी काही अंशी ही प्रतिमा बदलण्याचे, समाजाच्या मानसिकतेला धक्का देऊन विचार करायला लावण्याचे काम केले. महायुद्ध काळात चित्रपटसृष्टीत जी उलथापालथ झाली, विचारशून्य मनोरंजन व त्याद्वारे तिकीट खिडकीवरच्या यशाची निश्चिती यांचेच राज्य सुरू झाले, तेव्हा 1930 च्या दशकात सुरू झालेला चित्रपटातील स्त्री प्रतिमेचा तो प्रवास खुंटलाच. समाजात नवा विचार रुजू लागलेला असताना चित्रपटातली स्त्री मात्र त्या वास्तवापासून फटकून कचकड्याच्या बाहुल्यांच्या कारखान्यातून बाहेर पडलेल्या मालासारखीच वागत राहिली. समाजात आदर्शांवर प्रश्नचिन्हे लागू लागली, तरी ती मात्र निमूट त्या आदर्शांनाच कवटाळत राहिली. कारण सामान्यपणे एकदा यशस्वी झालेला साचाच पुन:पुन्हा वापरण्याची चित्रपट व्यावसायिकांची वृत्ती ही सार्वकालिक आहे. प्रयोगाचे धाडस करणारे त्यात अपवादानेच जन्मतात. भारतीय चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना, हे वास्तव सतत डोळ्यासमोर असते.
संस्कृत साहित्यात ‘नायक’ या शब्दाची व्याख्या दिली आहे ‘नयति इति नायक:’. कथानकाला, त्याच्या उद्दिष्टाला पुढे नेतो तो नायक. नायिकेच्या वाट्याला मात्र नायक शब्दाचे स्त्रीलिंगी रूप यापलीकडे फारसे काही आले नाही. भारतीय चित्रपटांनी ‘नायिका’ या शब्दाची हीच व्याख्या प्रमाण मानली आणि तिला पुरुषाची, नायकाची अनुगामिनी, त्याग, सेवा, सौंदर्य, दुर्बलता यांची मूर्ती बनवले. त्याबरोबरच चारित्र्य म्हणजे लैंगिक चारित्र्य (तेही केवळ स्त्रीचे), पातिव्रत्य म्हणजेच सकारात्मक गुणवत्ता आणि हे एवढे म्हणजेच ‘भारतीय नारीत्व’ अशा एकांगी, खोट्या गृहीतकात आपल्या नायिकेला कोंबून बसवले. वर म्हटल्याप्रमाणे पुरुष प्रेक्षक वर्गाला आणि पुरुषशरण स्त्री प्रेक्षक वर्गाला चित्रपटातील हीच स्त्री प्रतिमा सोयीस्कर वाटत राहिली. या प्रेक्षकाच्या दृष्टीला एकूणच काळा किंवा पांढरा असे दोनच रंग पाहण्याची सवय लागून गेली होती. मधल्या काही रंगछटा असतात, याचा विचार त्या दृष्टीला कधी शिवला नव्हता.
अशा कुंद वातावरणात दूरचे पाहू शकणा-या, जगण्यातल्या, मानवी मनातल्या विविध रंगछटा ओळखू शकणा-या काही लेखक-दिग्दर्शकांनी स्त्री व्यक्तिरेखेतल्या शक्यता, क्षमता आणि प्रश्न उभे करण्याची ताकद ओळखली. काहींनी ती धाडसाने साचे मोडून चित्रपटात मांडली (जशी सत्यजित राय यांनी ‘पथेर पांचाली’तली सर्वजया मांडली, ‘चारुलता’ मांडली), तर काहींनी प्रेक्षकप्रिय चौकटीला धक्का न लावता हळूच या व्यक्तिरेखांमधील ठिणग्यांची चुणूक दाखवली. उदा. मेहबूब खान यांची ‘मदर इंडिया’तील राधा, बिमल रॉय यांच्या गौरी (‘सीमा’), सुजाता, कल्याणी (‘बंदिनी’), पारो आणि चंद्रमुखी (‘देवदास’), के. आसिफ यांची अनारकली (‘मुगले आझम’), गुरुदत्तच्या मीना-गुलाबो (‘प्यासा’) आणि छोटी बहू (‘साहिब, बीवी और गुलाम’)... त्यांनी कधी आखून दिलेल्या चौकटीतही आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार घडवला, तर कधी त्या बी. आर. चोप्रांच्या ‘गुमराह’मधल्या मीनाप्रमाणे परंपराशरण होत मूकपणे प्रश्न उभा करून गेल्या. त्या आपापल्या काळाच्या, आपापल्या समाज-स्थितीच्या लेकी होत्या, पण आपल्या तडफडीतून त्यांनी त्या त्या आशयाला, कथासूत्राला दिशा दिली. पुरुषप्रधान चित्रपटाच्या पसा-यात त्यांचे नायिकापण ठसठशीतपणे जाणवले. त्यामुळे त्या प्रेक्षकांच्या किमान तीन पिढ्यांच्या स्मृतिपटलावर कोरल्या गेल्या.
1975 पासून स्त्रीमुक्तीचा विचार स्पष्टपणे मांडला जाऊ लागला. त्याला चळवळीचे रूप आले. कळत-नकळत या बदलत्या वातावरणाचा परिणामही 1980 च्या दशकातील सुलभा महाजन (उंबरठा) सारख्या व्यक्तिरेखांच्या रूपाने दिसू लागला.
1994 मध्ये मी ‘लोकसत्ता’च्या ‘रंगतरंग’ पुरवणीत ‘नायिका’ हे सदर लिहायला सुरुवात केली, तेव्हा नायकप्रधान भारतीय सिनेमात ज्या नायिकांनी - स्त्री व्यक्तिरेखांनी - व्यक्ती म्हणून त्या नायकप्रधान व्यवस्थेला छेद दिला आणि काळाच्या पटावर आख्यायिका बनून आपले अस्तित्व कोरले, त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. (हे सदर पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.) जगण्याच्या, टेक्नॉलॉजीच्या विकासाचा वेग पंचवीस वर्षांत इतका वाढला आहे, दिवसागणिक वाढत चालला आहे, की एखादी प्रतिमा मनात मुरून, मानसिक संस्काराचा भाग बनून आख्यायिका म्हणून काळाच्या पटावर कोरली जावी, एवढा अवधीच तिला मिळत नाही. अशा परिस्थितीत ‘लीजंड’ कशा जन्माला येणार? 1980 च्या उत्तरार्धापासून पुढे भारतीय चित्रपटांतल्या एकूणच व्यक्तिरेखांना या परिस्थितीचा फटका बसतो आहे. परंतु याच काळात सामाजिक- मानसिक बैठक, नीतिमूल्ये बदलू लागली आहेत. प्रेक्षकाच्या भूमिकेतूनही हा सामाजिक-संस्कृतिक बदल स्वीकारला जाऊ लागला आहे. सांस्कृतिक जागतिकीकरणाने बाजारपेठेलाच नव्हे तर ग्राहकाच्या, आस्वादकाच्या, प्रेक्षकाच्या मानसिकतेलाही गदगदा हलवायला सुरुवात केली आहे. काही अंशी जगण्याच्या अनिवार्य वेगाचा परिणाम म्हणून आणि काही अंशी विचार मोकळे होऊ लागल्यामुळेही स्थिती बदलते आहे. चित्रपटांच्या कथानकांतून, त्यातील व्यक्तिरेखांच्या चित्रणातून, अभिनयशैलीतूनही या परिस्थितीचे जे आकलन दिसून येते, त्याला प्रेक्षकांची सहानुभूती, साथ प्रगल्भपणे मिळू लागली आहे. ‘नायिका’ या यापूर्वीच्या लेखमालेतही मी 1980च्या दशकात सुरू झालेल्या या बदलांच्या निदर्शक अशा व्हायोलेट स्टोनहॅम (36 चौरंगी लेन)च्या सामाजिक एकाकीपणाचा, परमा(परमा)च्या गोंधळलेल्या स्त्रीमुक्ती विचाराचा, पूजा आणि कविता (अर्थ) यांना तोंड द्यावे लागले त्या नातेसंबंधांतल्या अनिवार्य वेदनांचा, सुलभा महाजन (उंबरठा) सारख्या जबाबदार आधुनिक जाणिवेच्या स्त्रीलाही आपल्या आधुनिक परिसरातील दांभिकतेपायी अनुभवाव्या लागणा-या अगतिकतेचा, उषा(भूमिका)च्या घुसमटीचा, परंपरेतल्या क्रौर्याचा विदारक साक्षात्कार झाल्यावर अपारंपरिक निर्णयाला पोहोचलेल्या दामिनी(दामिनी)चा, ‘पंचवटी’मधील साध्वीला पडलेल्या मूलभूत प्रश्नाचा, आणि त्याहूनही ‘अग्निस्नान’ या आसामी चित्रपटातील नायिकेच्या विलक्षण साहसी स्त्रीवादाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. ‘दृष्टी’च्या नायिकेच्या निमित्ताने आधुनिक काळातल्या परस्पर संबंधांविषयी गोंधळलेल्या आणि वेळोवेळी त्या संबंधांच्या स्वत:ला सोयीस्कर अशा व्याख्या करू पाहणा-या पती-पत्नीच्या संवाद-विसंवादाचा मागोवाही घेतला होता. 1980 च्या दशकात भारतीय चित्रपटातल्या स्त्री व्यक्तिरेखांच्या चित्रणात होत चाललेल्या बदलांच्या, या चित्रण-विकासाच्या आरंभाची नोंद अशा प्रकारे त्या वेळी घेतली होती. त्यामुळे तिथून पुढचा प्रवास हा मलाही कुतूहलजनक आणि उत्सुक करणारा वाटतो आहे.
अर्थात, अमृता प्रीतम म्हणतात त्याप्रमाणे आपल्या देशात एकाच वेळी अनेक शतके नांदत असतात, तशी ती आज एकविसाव्या शतकातही नांदत आहेतच, हे विसरून चालणार नाही. परंतु म्हणूनच व्यक्तित्वहीन स्त्री पात्रांमध्ये या व्यक्तिरेखा उठून दिसतात.
आजचा सिनेमा ‘नो वन किल्ड जेसिका’च्या रूपात समाजातल्या किळसवाण्या, क्रूर घटितांकडे समाजापेक्षाही अधिक संवेदनशीलतेने बघताना दिसतो आहे. ‘डर्टी पिक्चर’च्या नावाने आज दचकायला होत नाही आणि त्याच्या नायिकेवर चरित्रहीन असे लेबल डकवून त्याला वेगळ्या खणात ढकलले जात नाही. कचकडेपणा नाकारून खरेपणाला दाद देण्याइतकी प्रगल्भता चित्रपट व्यावसायिकात आणि प्रेक्षकात नक्कीच दिसते आहे. भले मग ते खरेपण दोन-तीन आठवडेच डोळ्यापुढून चमकून जात असेल, दाद देण्याच्या सिल्व्हर ज्युबिल्या नसतील साज-या होत; पण हा खरेपणा गतिशीलतेकडे निर्देश करतो आहे. बेगडी आदर्शांचा मोह संपून वास्तवात अनुभवाला येणारी जगण्यातील आणि मानसिकतेतील गुंतागुंत स्वीकारण्याचे आणि सिनेमाच्या समर्थ भाषेत ती मांडण्याचे धैर्य दिसते आहे. आदर्शांच्या दिखाऊ लक्ष्मणरेषा तिला रोखू शकत नाहीत. ती केवळ पुराणांतून आणि कहाण्यांतून भेटणारी कुणी अप्सरा, देवता किंवा यक्षिणी नाही. ती तुमच्या-माझ्या आसपास वावरणारी कुणी तरी एक आहे. तुमच्या-माझ्यातलीच. मर्त्य माणूस जातीतली.


‘दिव्य मराठी’च्या ‘नवी नायिका’ या प्रस्तुत सदरात अशा स्त्री व्यक्तिरेखांचाच शोध घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यातून या वेगवान पाव शतकाच्या सांस्कृतिक-सामाजिक मानसिकतेचा वेध घेता येतो का, हेही पाहणार आहे. पण त्यासाठी त्याबरोबरच मला थोडेफार 1980च्या दशकातही रेंगाळावे लागणार आहे आणि एवढेच नव्हे, तर मागच्या कालखंडातील एक नायिकाही खुणावते आहेच. तशी बरीच मागची. पण काळाचे पान उलटू पाहते आहे याची चाहूल देणारी. आज नाही धाडसी वाटणार ती, पण 1960च्या दशकात धाडसच केले तिने. (काळाच्या पुढे होती म्हणून‘कुंकू’मधल्या नीराविषयी बरेच बोलले लिहिले गेले आहे. त्यामुळे मी तिच्यावर पुनरुक्ती करण्याचे आधीही टाळले होते, आताही टाळले आहे.) 1960 च्या दशकातल्या ज्या नायिकेचा मी इथे उल्लेख केला ती एका वेगळ्या सामाजिक वर्गातल्या बदलांची निदर्शक होती. या बदलांची फारशी दखल मध्यमवर्गीय मानसिकतेने आणि तथाकथित कुलीन वर्गाने कधी घेतली नाही. चित्रपटसृष्टीने घेतली, पण रुपेरी पडद्याने घेतली नव्हती. मी इथे म्हणते आहे ते‘गाइड’मधल्या रोझीविषयी... या नायिकांच्या भेटी मात्र मला कालक्रमानुसारच मिळतील असे नाही; याची ‘दिव्य मराठी’चे वाचक नोंद घेतील, असा मला विश्वास आहे.

(लेखिका चित्रपटकला आणि सामाजिक विषयांच्या जाणकार आहेत.)

Next Article

Recommended