आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांचा अवतार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही संतांच्या अंगावर पक्षी बसतात : अ‍ॅसिसी. काही मिथक कथांच्या नायकांभोवती प्राणी जमतात : ऑर्फिअस. व्हेनिसमधल्या सान मार्को पिआझामध्ये उंच आवाजात गाणा-यांभोवती कबुतरांचे थवे येतात. आंद्रोक्लिसकडे सिंह येतो.
माझे आणि पुस्तकांचे तसेच जुळते. ती माझ्याकडे उडत येतात, धावत येतात, ओढली जातात.

सर्गेई मिखायलोवियच आईझेन्श्टाइन.
पुस्तकांविषयीचं माझं आकर्षण कधी सुरू झालं ते नक्की सांगता येणं कठीण. लिहिता-वाचता येण्याच्या पूर्वीच, त्यांचे आकार, गंध, स्पर्श, त्यांच्याशी संबंधित घटना, माणसं ह्या सा-यांचे अतूट स्मृतिबंध होऊ लागले होते.

मी शाळेत दाखल व्हायच्या आधीच माझी थोरली बहीण मला चर्नीरोडच्या एका लहान मुलांच्या वाचनालयात घेऊन जायची. ती शनिवार-रविवार तिथे मदतनीस म्हणून काम करत असे. अगदी सुरुवातीला, ती मला चर्नीरोड चौपाटीच्या भेळपुरीचं आमिष दाखवायची; पण लवकरच त्याची गरजच उरली नाही. तिच्याबरोबर जायला पुस्तकं हे पुरेसं आमिष ठरलं.
'And what is the use of a book,' thought Alice, 'without pictures or conversations?'

अ‍ॅलिसच्या ह्या मताशी तिची ओळख होण्यापूर्वीच मी सहमत होतो. एक तर मी ताईने दिलेल्या पुस्तकाच्या ढिगातलं एकेक पुस्तक काढून त्यातली चित्रं, एकेक पान उलटून, शांतपणे-हे ताईने नंतर सांगितलेलं- बघत बसायचो. त्यात काय गोष्ट असेल ह्याबद्दल माझ्या डोक्यात काही चाललं असायचं. मग ताईला कामातून वेळ मिळाला की ती त्या पुस्तकातले संवाद वाचून दाखवायची. गोष्टी सांगायची. पुस्तकं ‘पाहण्याची’ पद्धत, मला वाचायला यायला लागण्यापूर्वीच कळायला लागली होती. घरच्या एकूण आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईच्या बाहेर पडण्याची फारशी संधी नसलेल्या मला, पुस्तकं हे मोफत प्रवासाचं साधनच झालं होतं. त्यांच्यावर स्वार होऊन मी फिलिअस फॉगबरोबर ऐंशी दिवसांत पृथ्वी प्रदक्षिणा केली. शेरवूड जंगलात शिंग फुंकले. मायापूरच्या रंगेल राक्षसांचे अचाट पराक्रम पाहिले. कॅ. नेमोबरोबर समुद्राच्या तळाशी पोहोचलो.

पुस्तकांच्या स्वयंसिद्ध जगाचा पहिला शोकनायक म्हणजे दॉन किहोते. विमान स्पेनच्या खडकाळ पर्वतांच्या अणकुचीदार कड्यांवरून लँडिंगसाठी घिरट्या घालत असताना असं वाटलं, की आपण कधी पूर्वजन्मी इथे होतो. लहानपणी आजोळी घालवलेल्या उन्हाळी सुटीत जेव्हा मी ते पुस्तक पहिल्यांदा वाचलं, तेव्हा आजूबाजूला टेकड्या अशाच होत्या का? की त्या कल्पनेत निर्माण झाल्या होत्या? आजोळच्या अंधा-या घरात, कंदिलाच्या प्रकाशात, दॉन किहोते वाचताना हे सारं दिसलं होतं की काय? मिणमिणत्या प्रकाशात विटांच्या भिंती वितळून जायच्या आणि आपण स्पेनच्या पठारावर...
तेव्हापासून पुस्तकांचं दुकान, वाचनालयं आणि इतकंच नव्हे तर घरचा ग्रंथसंग्रह ह्यांच्या अंगी चेटकाची, जादूटोण्याची शक्ती असावी, असा मला विश्वास वाटतो. आपल्या मेंदूतून निघणा-या, सतत मोठ्या होत जाणा-या वर्तुळाने, जगाच्या प्रत्येक कानाकोप-यात पोचावं. त्या उलट, जगाच्या प्रत्येक कानाकोप-यातून निघणा-या वर्तुळाने आपल्यापर्यंत पोचावं, ही तीव्र इच्छा त्यातूनच निर्माण झाली असावी... पुस्तकांनी मानवी रूप धारण करणं, हे कदाचित सत्य होऊ शकणारं कल्पित. पण पहिल्यापासून आत्तापर्यंत किती अवतारात ‘पुस्तकं’ जगली. वेदांना पुस्तकरूप मिळण्यापूर्वी चार हजार वर्षं वाणीने त्यांना चिरंजीवन दिलं. अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा, पंचतंत्र, सर्व भाषांतील वाङ्मय हे स्मृती आणि ध्वनीच्या साहाय्यानेच जन्मलं, जगलं, प्रसारित आणि वृद्धिंगत झालं. म्हणूनच वाणीला लिपीचा आधार मिळाल्यावर वाङ्मयाला स्मृतीबाहेर शरीर मिळालं. त्याचं साहित्य झालं. मग पुस्तकं तालपत्रावर, शिलांवर, चामड्यांवर आणि अनेक वेगवेगळ्या पदार्थांवर राहात होती. इजिप्तमध्ये कागदाचा थोरला भाऊ आणि नामबंधू पॅपिरस याचा तर पुस्तकांकरता आणि चित्रांकरता चांगला भक्कम आधार होता.

छपाईच्या काळापूर्वीची ही पुस्तकं फार देखणी आहेत. त्यांच्या प्रती बनवण्याकरता कुणीतरी संपूर्ण पुस्तक पुन्हा लिहून काढणं आवश्यक होतं. तितका वेळ, श्रम, प्रेम हे प्रत्येक प्रतीमध्ये ओतल्याखेरीज प्रतच अस्तित्वात येऊ शकत नव्हती.
अशी ही पुस्तकं पाहण्यात आयुष्यातला पुष्कळ वेळ मी अत्यंत आनंदात घालवलेला आहे. कैरोत असताना फेरिऑनिक संस्कृतीतले हिअरोग्लिफ्स, अरेबिक सचित्र हस्तलिखितं, युरोपात असताना मध्ययुगीन सचित्र पुस्तकं, त्यांच्या चित्रांतून कथनशैलीचा विकास, अक्षरांची दमदार वळणं, नाजूक नखरेल कलाकुसर, पुस्तकाचं मूल्य वाढवण्याकरता सोनेरी वर्खाचा वापर. भारतातील उत्तमोत्तम हस्तलिखितं (हमझानामा, बाबरनामा इ.) लंडनच्या व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियममध्ये आणि ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. (कदाचित म्हणूनच ती आज आपल्याला बघायला मिळतात.)

चिनी आणि जपानी संस्कृतींनी सुलेखन कलेला चित्रकलेचा दर्जा दिला. दुर्दैवाने, आत्तापर्यंत मला चीनमध्ये जाण्याचा योग आला नाही. पण जपानच्या प्रवासात काही खास गोष्टी पाहायला मिळाल्या. तसंच तैवानच्या राष्ट्रीय संग्रहालयात सुरक्षित, सुलिखित पुस्तकं पाहायला मिळाली.

चिनी आणि जपानी ह्या दोन संस्कृतींत लेखनाचा आशय आणि सुलेखन शैलीतील त्याचा आविष्कार यांत अविभाज्य संबंध मानला जातो. हा केवळ इतिहास नाही तर ते वर्तमानही आहे. क्योटोतल्या राष्ट्रीय संग्रहालयात सध्याच्या लेखकांची देखणी हस्तलिखितं पाहायला मिळतात. नोबेल पारितोषिक विजेत्या कावाबाटाच्या हिमप्रांत (युकी नो कुनी) कादंबरीच्या हस्तलिखिताची पानं पाहताना लेखनशैलीबरोबरच सुलेखनशैली आणि जीवनशैलीचीही जाणीव होते.

हायकू लिहिणा-या कवींनी आपल्या सुलेखनशैलीत लेखनाबरोबर सूचकता आणली. जसा ध्वनीच्या कलरवात नि:शब्द क्षण, तसाच रंगरेषांच्या मधला अस्पर्शित कागद. रिकाम्या जागेला, शांततेला, आविष्काराचा श्रीमंत घटक बनवणा-या ह्या संस्कृतीचा संयम, कलाकुसरीने आणि ध्वनीने आयुष्य सदोदित व्यापून टाकणा-या प्रच्छंद भारतीय मनाला एका वेगळ्या जगाची जाणीव करून देतो.

जपानचा हा एक चेहरा... आणि दुसरा चेहरा कॉम्प्युटर्स, सोनी, होंडा, मित्सुबिशी... एक चेहरा कागदातून, घरापासून वाङ्मयापर्यंत सर्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अग्नीसाठी कागदाचं सुंदर घर करतो. दुसरा कागदाशिवायच्या नवीन संस्कृतीचा पाठपुरावा करतो. ‘राशोमॉन’च्या महाद्वारावर जपानचा एक चेहरा तर बिल गेट्सवर दुसरा.

आता पुस्तकं ही वस्तूच कालप्रवाहाच्या बाहेर फेकली जाणार, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. ज्या कॉम्पुटरवर मी हा लेख लिहितो आहे, त्याच्या सी. डी. रॉम ड्राइव्हमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे 32 खंड आहेत. ते मला कधीही हाताळता येणार नाहीत. त्यांना गंध असणार नाही. ते शेल्फच्या एका खणात मला पाह्यला मिळणार नाहीत. ते माझे गुलाम असतील. पण मला एक विशिष्ट प्रकारचा जिवंत सहवास देणार नाहीत.

आता पुस्तकांतली चित्रं सजीव होत आहेत. एका ओळीत सलग वाचण्याच्या टेक्स्टची जागा हायपर टेक्स्ट घेत आहे. कवितांना कंठ फुटत आहेत. चित्रातले पक्षी पंख फडफडून भुर्रकन उडून जात आहेत. पुस्तक आपला कागदाचा देह आणि शेल्फवरची मर्यादित जागा सोडून सायबरस्पेसमध्ये संचार करत आहे. ज्या प्रमाणे तथाकथित आत्मा जुनं विरलेलं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो, तसं पुस्तक एक आणखी नवा जन्म घेत आहे.
The Book is dead. Long live the Book.

चित्रव्यूह-पाने 200, किंमत 350,
चलत्-चित्रव्यूह-पाने 276 किंमत 425.
प्रकाशक-लोकवाङ्मय गृह