आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Book Intorduction By Motiram Katare, Divya Marathi, Uttam Kamble

सामान्यांमधील टिपलेले असामान्यत्व!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तपत्र विक्रेता ते ‘सकाळ’ग्रुपचे मुख्य संपादक, 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे हे सिद्धहस्त लेखक आहेत. कवितेपासून ते कथा, कादंबरी, ललित असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. सकाळ दैनिकातून त्यांनी ‘फिरस्ती’ नावाचं सदर लिहिलं होतं. त्याचा पहिला भाग त्याच नावानं; तर पुढचा भाग ‘जगण्याच्या जळत्या वाटा’ हा ‘मनोविकास प्रकाशन’, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ शीर्षकाला साजेसे आहे.


उत्तम कांबळे हे आपला गतइतिहास विसरलेले नाहीत. त्यामुळेच ते सामाजिक बांधिलकीतून आपले लेखन करत आले आहेत. नव्हे; सामान्याच्या सुख-दु:खातही सहभागी होत आले आहेत, असे लेखन वाचताना जाणवते. आपल्या आजूबाजूलाच नव्हे आपल्या उपस्थितीत अनेक गोष्टी घडत असतात. या घटना सर्वसामान्य माणूस पाहतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. कलावंताचे तसे नसते. त्यातल्या क्रांतिकारी आशयाने पारंपरिक व्यवस्था बदलाला मदत होणार आहे, हे त्याच्या लक्षात येते. लोकांपर्यंत ते पोहोचवायला हवे, या आंतरिकतेतून हे लेखन झालेले आहे. लक्ष्मण रामभाऊ गोळे यांचा अपंगत्वाकडे झालेला प्रवास आणि त्यानंतर त्यांना सापडलेली कविता लेखकापर्यंत पोहोचली. लेखकाने ‘अपंगांच्या कवितेला व्हायचंय पुस्तक’ हा लेख ‘फिरस्ती’मधून वाचकांपर्यंत पोहोचवला आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादातून गोळेंची कविता पुस्तकरूपाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रसिद्ध झाली.


इच्छाशक्ती असेल तर माणूस स्वत:त व वस्तीत कसे परिवर्तन घडवून आणू शकतो, हे ‘भानगडनगर ते शिवाजीनगर व्हाया बचत गट’ या लेखातून अनुभवाला येते. मजुरीच्या निमित्तानं शहरात आलेल्या लोकांनी वसवलेली ही वस्ती. श्रमिक आणि व्यसनं यांच्या समीकरणाला भानगडनगरमधील पुरुषही अपवाद नव्हते. रात्रभर या वस्तीत कल्ला सुरू असायचा. शहरभर भानगडनगरचं नाव प्रसिद्ध झालं होतं. स्त्रियांना मात्र ही बदनामी वाटत होती. त्यासाठी पुढाकार घेतला तो लक्ष्मीबाईनं. वस्तीतल्या दहा-बारा स्त्रियांना एकत्र करून त्यांनी बचत गट सुरू केला. शेळ्या, कोंबड्या पाळल्या. स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली. अंगणवाडी सुरू केली. दारू बंद झाली. भांडणंही बंद झाली. मुलं शिक्षणाकडे वळली.विशेष म्हणजे, लग्नातला हुंडा बंद करत आणलाय. एवढं सगळं केल्यावर वस्तीचं नवं नामकरण झालंय शिवाजीनगर या नावानं. महिलांनी इतिहास घडवला होता. एका विशिष्ट वर्गाने इतिहास घडवण्याचा मक्ता आदिवासी महिलांनी मोडीत काढला होता.


लिंबू-मिरची आणि त्यासोबत बाहुली विकणारे आज रस्तोरस्ती आपण पाहतो; आणि नास्तिक माणूस विकणारा आणि घेणारा यांच्याविषयी नाक मुरडून निघून जातो किंवा त्यावर विरोधी प्रतिक्रिया देतो. लेखक तसं करत नाही. त्यामागची कारणे शोधतो. त्यातून त्याच्या लक्षात येतं, की दिवसेंदिवस माणूस अधिक असुरक्षित झालाय. त्या असुरक्षिततेपोटी तो कुणाचा तरी आधार शोधत असतो. विविध प्रकारचे ताईत विकणारेही त्यातूनच निर्माण झाले आहेत. आयटीसारख्या क्षेत्रात काम करणारेही यातून सुटलेले नाहीत, हे लेखक निदर्शनास आणून देतो. लेखक इथं विकणा-यावर वा घेणा-यांवर टीका करत नाही, तर त्यांच्या विवेकाला आवाहन करतो.


विवेक गमावलेला माणूस श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे प्रवास सुरू करतो. त्याला चिकित्सा करता येत नाही. चांगलं की वाईट यातला तरतमभावही कळत नाही. त्यातून त्याचा बळी कसा जातो, याची लेखकाने एका ओल्ड फ्रेंडची गोष्ट कथन केली आहे. डॉक्टरने या मित्राला पंधरा दिवसांत बायपास करायला सांगितलेली असते. हा मित्र बायपास करू की नको, याचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या गुरूकडे जातो. गुरू त्याला त्यापासून परावृत्त करतो. भाबडा जीव गुरूची आध्यात्मिक ताकद महत्त्वाची मानतो. हजाराच्या पाच नोटा गुरूला दान देतो. गुरूमुळे बायपास टळल्याच्या आणि खर्चही टळल्याच्या समाधानात जगत असताना एक दिवस अ‍ॅटॅकने मरतो. लेखकाने समजावून सांगूनही मित्र अध्यात्मावरील अतिरेकी विश्वासाने जीव गमावून बसतो. बुवाबाजीच्या नादाला लागून किती जीव गमावले गेले असतील, असा प्रश्न लेखकाने विचारला आहे. या लेखाच्या शेवटी उत्तम कांबळे यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘विज्ञानावर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धाहीन होणं, असं काही जण समजतात; ते बरोबर नाही. विज्ञान कुणाला श्रद्धाहीन बनवत नाही, तर श्रद्धा घासून-पुसून उघड्या डोळ्यांनी घ्यायला शिकवतं. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट अशीच घ्यायला हवी’.(पृ.126)


लेखकानं या फिरस्तीच्या निमित्तानं विविध प्रश्नांना हात घातला आहे, याची काही उदाहरणे आपण पाहिली. र्होडिंगवर झळकणारी वर्दी आणि नको त्याच्याशी होणारी वर्दीवाल्याची मैत्री सर्वसामान्याला न्याय देऊ शकेल का? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. गल्लीबोळातल्या पुढा-याचं भ्रष्ट रूप ‘पकडा...पकडा... बालकामगार!’ मधून समोर आणतात. नोकरी करणा-या दांपत्याच्या एकट्या राहणा-या मुलांचा प्रश्न, मुलाच्या वाढदिवसालाही वेळ न देऊ शकणा-या आईवडलांची मुलं व्यसनाधीनतेकडे कशी वळताहेत, ड्राय डेच्या दिवशी दारू विकणारी मुलं असे अनेक प्रश्न त्यांनी वाचकासमोर ठेवत समाज आज कसा बदलतो आहे, हे दाखवून दिले. या लेखातली माणसं म्हटली तरी सर्वसामान्यच आहेत. त्यांच्यातलं असामान्यत्व दाखवतानाच समाजात निर्माण झालेले नवे प्रश्नही त्यांनी ताकदीने मांडले आहेत. तो प्रत्येकाचाच प्रश्न आहे. नवे प्रश्न हे जगण्याच्या जळत्या वाटा आहेत. त्या समजून घेतल्या तर जगणे सुंदर करता येईलच; पण समाजही सुंदर करायला मदत होईल. त्यासाठी एकदा तरी हे पुस्तक वाचायलाच हवे!


‘जगण्याच्या जळत्या वाटा’
० प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
० पृष्ठसंख्या - 195, मूल्य - 180 रु.


motiramkatare@gmail.com