आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Book Introduction By Satish Chaphekar

शब्दांआडचा खेळिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवीण दवणेचे ‘गाणारे क्षण’ नावाचे ७५ वे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ते पुस्तक वाचता वाचता मी जवळजवळ ३०-३५ वर्षे मागे गेलो. या पुस्तकामधील जवळजवळ सर्वच क्षणांचा, लेखांचा मी ३५ वर्षांतला साक्षीदार होतो...
...घुमटकर सरांचा चित्रपटाचा प्रयत्न. प्रवीणच गाणी लिहिणार, ही त्यांची जिद्द एका लेखातून जाणवते. परंतु त्याच्या थोडे आधी त्याच काळात एक घटना घडली. त्याचा संदर्भ ‘थोडी मिठाई...’ ‘थोडा ढेकर’! या लेखात येतो. अर्थात, प्रवीणने डिटेल दिले नाही. पण मी सांगतो. कारण प्रवीणने जी गाणी लिहिली, विविधता येऊ लागली, ती जगन्नाथशेठ खांगटे आणि मिठाईवाले गुप्ताजी यांच्यामुळे. खांगटे माझ्या इमारतीत राहात होते, आजही राहतात. त्यांनी ‘सवत’ हा चित्रपट काढला होता. मी सहजपणे म्हणालो होतो, मला गाणी नाही आवडली. तसे ते माझ्यावर डाफरले. म्हणाले, गाणी कुणाची आहेत, तुला माहीत आहे का? शांताबाईंची... शांताबाई शेळके. तेव्हा मी म्हणालो, माझा मित्र प्रवीण आहे, सॉलिड गाणी लिहितो.
आण तुझ्या त्या ‘परवीन’ला. झाले, प्रवीण आमच्या अड्ड्यात आला. मग राजाभाऊ बारगीरही त्यांच्याकडे यायचे... आणि मग खांगटेशेठ आणि गुप्ताशेठ प्रवीणला यशवंत थैडे यांच्याकडे घेऊन गेले. कारण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजाभाऊ बारगीर... चित्रपट होता ‘ठकास महाठक’. हा प्रवीणचा पहिला चित्रपट. प्रवीणला आमच्या अड्ड्यात ढकलायला मी, खांगटे, चंदरशेठ कारणीभूत ठरलो. पण पुढील प्रवास प्रवीणने जो दणक्यात केला की, त्याला तोड नाही. त्याचे एक ब्रीदवाक्य आहे, ‘संधी सोडली तर संधिवात होतो.’ अर्थात, चांगली संधी.

या पुस्तकात नंदू होनप, दीपक पाटेकर यांचे उल्लेख सतत येतात. अर्थात, कारणही तसेच. नंदूने प्रवीणच्या असंख्य गाण्यांना चाली लावल्या, हा वेगळाच रेकॉर्ड म्हणावा लागेल. एक कवी प्रवीण दवणे आणि एक संगीतकार नंदू होनप. या दोघांनी मिळून १९००च्या वर गाणी केलीत. विश्वास बसणार नाही. तरीही प्रवीणला कवी आणि लेखक न मानणारे कंपू आहेतच. अर्थात, ते भोग माडगूळकरांनाही चुकले नव्हते.

‘बॉम्बे लॅब’मध्ये सर्वप्रथम प्रवीणने लताबाईंचे गाणे ऐकले. तेव्हा आम्ही दोघेच होतो. आधी हृदयनाथजींना ठाण्याला आम्ही विचारले होते. आम्हाला दीदींचे गाणे ‘बघायचे’ आहे. त्यांनी आम्हाला दोन दिवसांनी वेळ देऊन, बॉम्बे लॅबमध्ये बोलावले. आम्ही गेलो. पुढचे सर्व लेखात वाचायला मिळते. दीपक पाटेकर हा असाच जबरदस्त संगीतकार. त्याचाही उल्लेख अनेक वेळा येतो. त्याने प्रवीणची खूप आर्त गाणी केली आहेत. दुर्दैवाने ती तशीच राहिली आहेत. जेव्हा जेव्हा दीपक पाटेकरचे नाव येते, तेव्हा आजही प्रवीण हळहळतो.

प्रवीण जेव्हा लिहितो, तेव्हा त्याचे लेख निश्चित सामान्यजणांना भिडतात. एक साधा लेख आहे, ‘प्रतिभावंताचे लेखन टेबल.’ लेखन टेबलाविषयी आतापर्यंत कुणी लिहिले आहे का? कुणी विचार तरी केला आहे का? प्रवीणच्या घरी नेहमीच माझे जाणे-येणे असते. त्याचे टेबल मी फार पूर्वीपासून पाहिलेले आहे. त्याची गोल फिरणारी खुर्ची मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला त्या खुर्चीचा आणि टेबलाचा हेवा वाटला होता. प्रवीणची गाणी अनेक अमराठी गायकांनी गायली आहेत. त्यांची नावे ऐकली तरी वेगळे वाटेल. आरती मुखर्जी, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, महेंद्र कपूर, अलका याज्ञिक, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, कुणाल गांजावाला, दिलराज कौर, मला वाटते प्रीती सागरही आहे, अर्थात तिथे तिचे नाव नाही. लता, आशा, उषा,
पं. जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, उत्तरा केळकर... सूचीत किती नावे घ्यायची. मला वाटते, यांच्यासाठी गाणी लिहायची हे खायचे काम नाही.
अनिल मोहिले, अशोक पत्की, श्रीधर फडके, बप्पी लाहिरी. आणि मग प्रवीण चालीवरून गाणी लिहितो, म्हणून टीका करणारेही आहेत. अरे पण ते सोपे नाही. भल्याभल्यांची बोबडी वळते, हतबल होतात. प्रवीणबद्दल खूप लिहिता येईल. त्याच्या ‘ध्यानस्थ’मधील कविता कुणी वाचल्या असतील तर त्याच्या कवितांच्या खोलीची व्याप्ती जाणवल्याखेरीज राहणार नाही. या पुस्तकात अनेक गोष्टींचे अगदी ओझरते उल्लेख आहेत, त्यामुळे प्रवीण दवणे कवी-लेखक म्हणून घडला आणि बिघडलाही. त्यांनी हावरे यांच्यावर पुस्तक लिहिले. मला व्यक्तिश: अजिबात पटले नव्हते. कारण तो त्याचा पिंडच नव्हता. पण त्याच्याही अनेक भाषांतून
आवृत्त्या निघताहेत. असो.

हे आवडत नाही, ते आवडत नाही, असे करत राहिले तर ती संधी जी तुम्हाला शोधत असते ती थांबत नाही; पण ती संधी किती प्रमाणात वापरावी, हे लेखकाचे चातुर्य आहे आणि ते प्रवीण दवणे या लेखकाकडे आहे. कारण त्याच्या कवितेचा लेखनाचा पिंड भा. रा. तांबे, माडगूळकर,
कुसुमाग्रज, बोरकर, विंदा यांच्यावर पोसलेला आहे. या पुस्तकामध्ये ‘कुसुमाग्रजांसोबत’ नावाच्या लेखामध्ये कुसुमाग्रजांचे एक वाक्य आहे, ‘प्रवीण, तुमच्या ललित लेखनाकडे मी आवर्जून लक्ष ठेवून आहे, लिहीत राहा.’ असे शब्द कुणा ये-या-गबाळ्याच्या वाट्याला कधी येणारच नाहीत. ‘तो अकरावा मजला’मध्ये ख-या प्रवीण दवणेचे चित्र दिसते. नेहमी तो सच्चा
आहेच, परंतु या प्रसंगात तो वेगळाच दिसतो. नुसती गाणे लिहिण्याची अॅक्टिंग करण्यासाठी त्याला पैसे देऊ केलेले असतात, तो ते नाकारतो.
आज प्रवीणने असंख्य संस्थांना प्रचंड मदत केली आहे. मिळवून दिली आहे. परंतु तो त्याची वाच्यता कुठेच करताना दिसत नाही. लिहिताना दिसत नाही.

‘सापडला! सापडला!!’ या लेखामध्ये विद्याधर गोखले यांनी जेव्हा प्रवीणचे दणक्यात झालेले भाषण ऐकले तेव्हा ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रवीणला उद्देशून म्हणाले होते, ‘सापडला! सापडला!! सापडला!!! माझ्यानंतरचा महाराष्ट्रातला मोठा वक्ता सापडला!’
विद्याधर गोखल्यांचे हे शब्द निश्चितपणे खरे ठरले, हे प्रवीणच्या आजपर्यंतच्या प्रवासावरून आणि यशाच्या चढत्या श्रेणीवरून लक्षात येते. काही कवी, लेखक एखाद्या कलाकृतीत संपतात, तृप्त होतात. तसे प्रवीणचे नाही. तो लेखनातील अनेक क्षेत्रांत वावरतोय. हे पुस्तक वाचताना अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या. ज्या पुस्तकात नाहीतही. सुरेश एजन्सीच्या गुलाबराव मारुतीराव कारले यांनी हे प्रवीण दवणेंचे स्वतंत्र लेखाचे पुस्तक काढून असे दाखवून दिले आहे, असेही लिहिले जाते आणि छापलेही जाते.

>पुस्तकाचे नाव - गाणारे क्षण
>प्रकाशक - सुरेश एजन्सी
>मूल्ये - रु. १४०/-
satishchaphekar5@
gmail.com