पर्यावरण, आरोग्य, स्त्री-पुरुष समतेची चळवळ अशा विविध क्षेत्रांत गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची ‘खेळघर’ ही पहिलीच कादंबरी. एकच कादंबरी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जवळची (किंवा दूरचीही) वाटत असते. ‘खेळघर’ ही ‘उद्या’चा विचार करणा-या ‘आज’च्या लोकांना अतिशय जवळची वाटेल, अशी कादंबरी आहे. हे उत्तर आधुनिक ‘आज’चंपण आहे. ते अतिशय प्रवाही आहे. तत्त्वज्ञानाला ‘रिसायकल बिन’मधून बाहेर काढून लवचिकपणे ‘रिस्टोअर’ करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. (यातलं ‘लवचिकपणे’ हे विशेषण महत्त्वाचं आहे!) भोवतालच्या अत्यंत विभाजित वास्तवाला समजून घ्यायचा प्रयत्न करत, त्यातून होताहोईतो एकसंध जगणं निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा नायक, जी कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे आणि त्याच्यासह भेटणारे इतर अनेक जण यांनी मांडलेला हा खेळ/प्रयोग आहे. आणि हा प्रयोग वास्तवाच्या निकषांवर अधूनमधून कदाचित भाबडा वाटला, तरी तो कमालीचा सच्चा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तो सलगपणे गुंतवून ठेवणारा आहे. वैचारिक संघर्ष, व्यवस्थात्मक प्रश्न हा मुख्य धागा असलेल्या या कादंबरीचं हे मोठं यश आहे.
‘खेळघर’ची मध्यवर्ती व्यक्तिरेखा- माधव क-हाडकर- डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत. पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांहून वेगळे असणारे क-हाडकर पोथीप्रामाण्य मानणा-या पक्षाकडून निलंबित केले जातात, आणि इथून क-हाडकरांचा शोध सुरू होतो. ‘खेळघर’ची संकल्पना आकारास येणं, हा या शोधातला मुख्य टप्पा. कुटुंबाच्या आणि एकूणच जगण्याच्या ठरीव चौकटीतून बाहेर पडून समविचारी माणसांनी एकत्र येऊन सुरू केलेलं खेळघर म्हणजे, एका नव्या मूल्यव्यवस्थेच्या आणि त्याचबरोबर व्यावहारिक भानाच्या आधारावर उभारलेलं एक विस्तारित कुटुंब आहे. ही व्यवस्था म्हणजे एक अंतिम आदर्श व्यवस्था आहे, असं आग्रही प्रतिपादन न करता या व्यवस्थेअंतर्गत राहतानाचे संघर्षही कादंबरीत चित्रित होतात. क-हाडकरांचं व्यवस्थेविषयीचं चिंतन जसं स्वतंत्र आहे, मूलगामी आहे; तसंच, त्यांचं व्यक्तीविषयीचं चिंतनही मूलगामी आहे. एक मात्र खरं की, कादंबरीचा विस्तृत पट, अनेक सामाजिक-राजकीय घटनांच्या नोंदी आणि वैचारिक मांडणी/संघर्ष हा मुख्य गाभा यामुळे व्यक्ती विरुद्ध व्यवस्था याचं चित्रण एका मर्यादेपर्यंत झालेलं दिसतं. याची दुसरी बाजू म्हणजे, कादंबरीचं स्वरूप पूर्णपणे ‘ललित’ नाही आणि कादंबरीच्या बांधणीत परिवर्तनवादी चळवळीशी कमी-अधिक प्रमाणात जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यात अतिशय टोकाचे फरक नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील वर्तमान व्यवस्थेविषयीची खळबळ आणि पर्यायाची ओढ हाच मुख्य चर्चाविषय असल्याने लेखक व्यक्ती म्हणून व्यवस्थेशी त्यांचं द्वंद्व निर्माण होण्याच्या कोणत्या जागा आहेत, हे एक-दोन अपवाद वगळता खोलात तपासत नाही. व्यक्ती आणि व्यवस्था या द्वंद्वाचा विचार करत असताना किंवा या संबंधाची मांडणी करत असताना काही हुलकावण्या अपरिहार्यपणे मिळतात, कारण कमालीच्या व्यामिश्रतेने आणि विसंगतीने भरलेल्या, वैचारिक-मूल्यात्मक स्थानही सातत्याने बदलत असणा-या मानवी अस्तित्वाला पूर्णपणे कवेत घेऊन एक सलग, दोषरहित आणि ‘आत्मिक शांततेची खात्री’ देईल, अशा व्यवस्थेची कल्पना करणं, तिची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणं, हा कायमच ‘अपरिचिताशी सामना’ असतो. ‘खेळघर’ही याला अपवाद नाही.
पण खेळघराचं महत्त्व आणि त्याचा गोडवा त्याच्या वैचारिक खुलेपणात आहे. ‘ढासळणा-या समाजव्यवस्थेच्या मुळाशी किडलेले नातेसंबंध आहेत. नातेसंबंध निरामय होण्याची सुरुवात स्वत:तील बदलापासून करायला हवी. त्यासाठी सामूहिक जीवन व पर्यावरणस्रेही जीवनशैलीचा स्वीकार करायला हवा’, ही ‘खेळघर’ची मूळ प्रेरणा आहे. विचार म्हणून ही मांडणी अतिशय महत्त्वाची आहे. लेखक उत्तर शोधू पाहतोय, एका निश्चित स्थितीकडे जाऊ पाहतोय, आणि त्यासाठी त्याने मुख्य ‘प्रॉब्लेम’ स्पष्ट केला आहे. नातेसंबंधातील निरामयता महत्त्वाची मानणारे क-हाडकर व्यवस्थेच्या प्रश्नाकडे पाहायची एक वेगळी दृष्टी देतात. ही दृष्टी आपल्याला वर्गसंघर्षाच्या (आणि जातीय संघर्षाच्याही) पलीकडे नेते का? कदाचित हो, कदाचित नाहीही. कारण, हे विश्लेषण प्रत्येक जण आपापल्या परीने करू शकेल. पण क-हाडकरांचं चिंतन आणि त्यावर आधारलेले प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. ‘खेळघर’ ही एक संवादी कादंबरी आहे. वाचकालाही बोलतं करणारी कादंबरी आहे. असं खेळघर खरंच अस्तित्वात असेल का? या प्रश्नापासून ते हे म्हणजे स्वप्नरंजन झालं, असं कसं होईल, हे सुलभीकरण वाटतं, पण खरंच- ही कल्पना किती सुंदर आहे, अशा खेळघरात खरंच राहावंसं वाटतंय... इथपर्यंत विविध प्रतिक्रिया विविध प्रवृत्तीच्या वाचकांच्या मनात उभ्या राहू शकतात. त्यामुळे ही कादंबरी वाचकाला विचारप्रवृत्त करते. मार्क्सवाद, पर्यायी विकास, कुटुंबसंस्था, पर्यावरणस्रेही जीवनशैली, स्त्रीवाद, धर्मनिरपेक्षता अशा अनेक दिशा कादंबरीत एकवटलेल्या आहेत. ‘पुरुष म्हणून मी नेहमी प्रायश्चित्ताच्या भूमिकेत जगलो’, हे क-हाडकरांचं विधान तर मला एकदम स्पर्शून गेलं. पर्याय प्रत्यक्षात उतरत असताना धक्के बसतातच; पण पर्यायाचा विचार करत असताना तो व्यापक असणं ही पूर्वअट असते. खेळघर ती पूर्ण करते.
परिवर्तनाच्या चळवळीत प्रत्यक्ष कार्यरत असणा-या एकाचं मनोगत म्हणून ही कादंबरी जरूर वाचावी. त्यातून जे वैचारिक संघर्ष दिसतात, कार्यकर्त्याचे संभ्रम, त्यांची मोडणी आणि जोडणी दिसते, ते वाचून अनुभवण्यासारखे आहे. ‘खेळघर’ हे कादंबरी स्वरूप असले, तरी त्याचा गाभा हा एका कार्यकर्त्याचा आत्मशोध, त्याचा स्वत:शी आणि इतरांशी चाललेला सततचा संवाद, हाच आहे. ‘पर्यायी जग शक्य आहे’, या धारणेने जगणा-या सर्वांनी वाचावी अशी ही कादंबरी. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, काही कारणाने ‘पर्यायी जग शक्य नाही’ असं मानून स्थितीवाद स्वीकारणा-यांनी तर ती जरूरच वाचावी!
utpalchandawar@gmail.com
खेळघर
० लेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पृष्ठे - 286
० प्रकाशक - मनोविकास प्रकाशन, किंमत-290 रु.