आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Book Of Vishwas Patil By Chandrashekhar Nene, Divya Marathi

निर्मितीप्रवास उलगडणारे ‘बंदा रुपाया’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्यंत गतिमान आणि एकदा हातात घेतल्यावर पूर्ण झाल्याखेरीज खाली ठेवू नये, असा अनुभव देणारी लेखक विश्वास पाटील यांची कादंबरी ‘झाडाझडती’. कादंबरीची गती कायम ठेवण्यात यशस्वी झाल्याने झाडाझडतीने वाचकांचा ठाव घेतला होता. ही कादंबरी वाचताना लेखकाने अशी अंगावर काटा येणारी व्यक्तिचित्रे कशी उत्पन्न केली असतील, असा विचार वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे तसेच अशा प्रकारच्या इतर प्रश्नांची उत्तरे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विश्वास पाटील यांच्या नव्या पुस्तकात मिळतात. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले ‘बंदा रुपाया’ हे ते पुस्तक.
नावाप्रमाणेच चोख आणि निर्भेळ साहित्याचा आनंद देणारे एका सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून साकारलेले हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. साहित्य, इतिहास, नाट्य, संगीत आणि सिनेमाची एक अतिशय रमणीय सफर हे पुस्तक आपल्याला घडवते. आपल्याकडे लेखकाच्या पुस्तक लेखनाचे अनुभव प्रकाशित करण्याची फारशी पद्धत नाही, त्यामुळे आपण सगळे या वेगळ्या प्रकारच्या लेखनाला आणि त्या प्रक्रियेच्या आनंदाला मुकत असतो. या पुस्तकामुळे आपल्याला कळते की, ‘झाडाझडती’मधील भीषण वास्तव विश्वास पाटील यांनी स्वत: प्रत्यक्ष पाहून अनुभवलेले आहे. म्हणूनच कदाचित ते इतके रसरशीतपणे आपल्याला जाणवते! त्यावरचा ‘झाडाझडतीचे डोहाळे’ हा लेख मूळ पुस्तकाइतकाच दमदार आणि चरचरीत आठवणींचा ठेवा आहे आणि तो अगदी आपल्या अंतरामध्ये पोहोचतो.
या पुस्तकात एकूण पंधरा लेख आहेत. त्यापैकी काही पाटील यांच्या विविध सुप्रसिद्ध पुस्तकांच्या प्रसूतिवेदना आणि त्यांचे जिवंत व अस्सल अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ, ‘पानिपतच्या ओल्या जखमा’ हा लेख ‘पानिपत’ कादंबरीच्या निर्मितीकाळातले काही बारकावे उत्तम टिपतो. ‘महानायक’ कादंबरीच्या लेखनाच्या वेळी आणि नेताजींचे चरण जिथे जिथे पडले, त्या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा ध्यास पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी हरप्रयत्नानंतर ते ब्रह्मदेशाच्या गूढ भूमीत जाऊन भारतीय आणि विशेषत: मराठी लेखकांना अशक्य अशा जागी जाऊन आले. त्या सा-या सफरीचा वृत्तांत त्यांनी अतिशय वेधक आणि रोचक पद्धतीने सादर केला आहे. त्यावरून आपल्या या शेजारी राष्टÑाबद्दल आणि त्या धगधगत्या इतिहासाबद्दल आपल्याला नवीन माहिती मिळून नतमस्तक व्हायला होते. ‘नेताजींच्या शोधात ब्रह्मदेशात’ हा लेख या पुस्तकाचा एक फार उत्कृष्ट दागिनाच आहे!
तसेच एक निखळ उमदे आणि माहितीपूर्ण प्रवासवर्णन लेखकाच्या चीन सफरीवर आहे. ‘ज्ञानलालसेचा पॅगोडा आणि शांघायचे न्यूयॉर्ककरण’ हा लेख आपल्याला चीनची मुख्य भूमी, तसेच तेथील बीजिंग आणि शांघाय या शहरांची रंजक सफर करवून आणतो. त्याबरोबरच चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवरसुद्धा नेऊन आणतो. मराठ्यांच्या इतिहासावरचे तीन सुंदर लेख यात आहेत. त्यामधील ‘सह्याद्री आणि शिवाजी’, तसेच ‘महाराष्टÑमित्र कवी कलश’ हे दोन्ही लेख इतिहासाची काही ओजस्वी पाने आपल्यासमोर उलगडून दाखवतात. कवी कलश या शंभूराजे यांच्या एकनिष्ठ सेवकाबद्दलची नवी माहिती त्या ऐतिहासिक पुरुषाबद्दलची आपली जुनी मते बदलण्यास भाग पडते. सेतुमाधवराव पगडी आणि ‘चारुता सागर’ उर्फ ‘दत्तात्रय दिनकर भोसले’ या दोघा लेखकांची उत्तम शब्दचित्रे पाटील यांनी दोन लेखांत रेखाटली आहेत.
या सगळ्याशिवाय पाटील यांनी तमाशा आणि लावणी या लोककला आणि त्या सादर करणा-या लोककलावंतासंबंधी खूप आस्थेने आणि मायेने लिहिले आहे.
आशयघन पंधरा लेखांचा भरगच्च नजराणा या पुस्तकातून वाचकांना देलेला आहे. अर्थात, पुस्तकाचे नाव सार्थ करण्यासाठी तरी यात आणखी एक लेख जास्त देऊन पूर्ण ‘सोळा आण्यांचा’ ‘बंदा रुपाया’ आपल्या हाती लेखक प्रकाशकांनी द्यायला हवा होता, असे आपले उगीचच वाटून गेले.

पुस्तक : बंदा रुपाया, लेखक : विश्वास पाटील
प्रकाशक : मेहता प्रकाशन, पृष्ठसंख्या : 240, मूल्य : 220 रु.