आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोस्‍ट पॉप्‍युलर 'रेड स्‍टुडिओ'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोघेही समकालीन असले तरीही, माथिस हा पिकासोपेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठा होता. पिकासो आणि माथिस यांचे प्रदर्शन न्यूयॉर्क येथील मोमा या जगातल्या सगळ्यात मोठ्या गॅलरीने आयोजित केले होते. तेव्हा पीटर शेजअल या समीक्षकाने म्हटले, की ‘प्रारंभी पिकासोची चित्रे अधिक भावतात, पण प्रदर्शन पूर्ण पाहिल्यानंतर माथिस अधिक आवडू लागल्याची जाणीव होते.’ पिकासो अर्थातच मोठा चित्रकार होता. क्युबिझमसारख्या चित्रप्रकाराला त्याने जन्माला घातले. उलट माथिस हा कायमच निसर्गावर आधारित चित्रे काढत राहिला. त्याच्या चित्रात कधीच राजकीय भाष्य नसायचे. किंबहुना तो स्वत:च आपल्या चित्रकलेस ‘कॉम्फिचेअर आर्ट’ म्हणजे, ‘आरामखुर्चीवरची कला’ असे संबोधत असे. त्याच्या कलेत कधीही अधोविश्वाचे दर्शन नसे. पण ‘रेड स्टुडिओ’ या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे, इतर चित्रांप्रमाणे ते नेत्रसुखद आहेच; पण कलावंत कलेच्या भाषेत स्वत:चा विचार कसा मांडतो, याचेही त्यात दर्शन घडते. उदा. यात माथिस पर्स्पेक्टिव्हच्या रेषाच काढत नाही, तरीही सर्व वस्तूंच्या आकारांच्या लांबी- रुंदीतून खोलीचा आभास नीटपणे व्यक्त होतो. एकाच रंगाच्या अनेक छटा वापरणे, ही माथिसची खासियत होती. त्याने पत्नीचे केलेले हिरव्या, निळ्या रंगातले चित्र प्रसिद्ध आहे. मात्र लाल रंगाच्या छटेतील त्याची चित्रे कमी आहेत. माथिसने खरे तर वकिलीचे शिक्षण घेतले होते. तो चित्रकार झाला, अपघातानेच. दोन-तीन वर्षे वकिली केल्यावर त्याने चित्रकलेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मात्र सुरुवातीला त्याला चित्रकला संस्थेत कुणी प्रवेश देईना. म्हणून अनेकदा ऐन थंडीत सकाळच्या वेळी तो चित्रकला शाळेबाहेर चित्र काढत बसत असे. ती चित्रे विल्यम बॉगिरिय यांनी पाहिली आणि त्याला चित्रकला शाळेत प्रवेश मिळाला. त्याची सुरुवातीची चित्रे थोडीशी पॉइंटॅलिस्ट म्हणजे ब्रशने ठिपके देऊन केलेली चित्रे आहेत. त्यानंतरच्या चित्रात तो जाड रेषा व फटका-यांचा वापर करू लागला. या शैलीस ‘फॉविझम’ असे नाव टीकाकारांनी दिलो. फॉव म्हणजे जनावरे, पण टीका म्हणून वापरलेला शब्द वर्णनात रुळला. माथिसचे विषय अगदी साधे होते. स्टील लाइफ, भोवतालच्या माणसांची, मॉडेल्सची चित्रे, घराच्या अंतर्भागातील चित्रे आणि लँडस्केप. पण माथिसचे रंग सळसळून उठत. कवितेची तालबद्धता, संगीतातील प्रसन्नता आणि एक प्रकारची अलिप्त आध्यात्मिकता हे सारे त्याच्या चित्रात होते. रेड स्टुडिओ हे चित्र आहे 1911 मधील. परंतु, त्याच्या आधीच्या ‘हार्मनी इन रेड’ या चित्रामध्येही लाल रंगाचा वापर दिसतो.

‘रेड स्टुडिओ’ या चित्रात आपल्याला माणसाच्या आकाराचे घड्याळ दिसते. माथिस केवळ त्याची डायल व बाह्य रेखाकृती चितारतो. स्टुडिओतील काही चित्रांचे तपशीलही तो रंगवतो. इतर वस्तूंचे रंग न देता त्या वस्तू लाल रंगात विलीन करतो. परिणामी, सा-या वस्तू अधांतरी तरंगल्यासारख्या दिसतात. मग हळूहळू त्यांचे चित्रातील स्थान, आकार व घनता स्पष्ट होते. यामुळे पाहणारा चित्राकडे ओढला जातो. पुन:पुन्हा पाहताना अधिक तपशील लक्षात येतात. उदा. डावा कोपरा एखाद्या स्टील लाइफ चित्राप्रमाणे आहे. त्यातील टेबल आपल्याला वरून दिसते. उजव्या कोप-यातील खुर्ची केवळ फिकट पांढ-या रेषांतूनही नीट उभी राहते. सोनेरी रंगाची कमान सरळ ठेवली नसून किंचित तिरपी ठेवली आहे, हे कळते. त्यातील फ्रेम्स अस्ताव्यस्त आहेत. दोन पुतळे काळ्या, पांढ-या रंगाने अवकाशाचा तोल सांभाळत आहेत. शिवाय मधली मोठी रिकामी जागासुद्धा आस्वादनाचा विषय बनते. संपूर्ण चित्र लाल रंगात असले तरी यात विविध रंगांच्या छटा विखुरल्या आहेत. सुई, पाईन ग्लास, पुतळे, टेबल अशा अनेक वस्तूंनी अवकाश व्यापले आहे.

एक प्रकारे हे चित्रकाराचे आत्मचरित्र आहे. ते आपल्याला त्याचे खासगी विश्व व कलाकृती दाखवते आणि तो नसतानाही त्याच्या अस्तित्वाची सावली आपल्याला त्यात पाहायला मिळते. सुरईत खोचलेली छोटीशी वेल आणि चित्रकाराने रंगवलेली माणसे आणि टेबलावरच्या डिशवरील डिझाइन या तिन्ही गोष्टी माथिसच्या चित्रांचे तीन ठळक घटक दाखवतात. माणूस, निसर्ग आणि डिझाइन्स असा तो रंगमेळ आहे. खूप वेळा मी हे चित्र पाहिले आहे आणि आज जितक्या गोष्टी मला त्यात दिसल्या तितक्या आधी कधीच दिसल्या नाहीत. खरे तर माथिसला कलरिस्ट का म्हणतात, हे ‘रेड स्टुडिओ’ चित्र सप्रमाण सिद्धच करते.