आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक ग्रंथालय: वाचनसंस्कृतीचा डोळस परिचय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सार्वजनिक ग्रंथालये प्रगती आणि वस्तुस्थिती’ या वसंत सावे आणि डॉ. सुषमा पौडवाल लिखित पुस्तकाद्वारे एकूणच वाचनसंस्कृती, सार्वजनिक ग्रंथालयाचा प्रारंभ, त्यांचे सामाजिक महत्त्व, ग्रंथालयांकडून अपेक्षित कार्ये, तेथील सोयी-सुविधा, त्यांची कार्यपद्धती, तेथील व्यवस्थापन असा सांगोपांगी आढावा घेतलेला आहे. हे पुस्तक वाचत असताना संपूर्ण ग्रंथालय व्यवहाराबद्दलची साद्यंत माहिती तर मिळतेच; परंतु केवळ माहिती देणं, हा या लेखकद्वयीचा मूळ हेतू नाहीच. दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधाराने आपापल्या परिक्षेत्रातील सार्वजनिक ग्रंथालयांबाबत आपल्याला डोळस बनवणे, हेही एक लक्ष्य आहे. सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या ग्रंथालयांची होणारी आबाळ, तेथील ग्रंथालय सेवक, व्यवस्था यांबद्दलची अनास्था, तुटपुंजी अनुदाने आणि वारेमाप अपेक्षांची ओझी हे सारं काही वाचताना वाचक म्हणून नक्कीच अस्वस्थ व्हायला होतं. आज २१व्या शतकामध्ये या सार्वजनिक ग्रंथालयांची शान काही औरच असायला हवी होती. या ग्रंथालयांसंबंधातील आदर्श असे जे काही नियम, अपेक्षा आणि सेवा इथे नोंदवलेल्या आहेत, ते पाहता सध्याची सार्वजनिक ग्रंथालये ही या निकषावर कितपत तरतील, हाच मोठा प्रश्न आहे. युनेस्कोच्या व्याख्येनुसार सार्वजनिक ग्रंथालये, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे सांगितली गेलेली सार्वजनिक ग्रंथालयांची एकूण उद्दिष्टे तसेच २००५मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय ज्ञान आयोगाने सॅम पित्रोदा यांच्या समितीतर्फे सादर केलेल्या शिफारशी यांचा ताळमेळ आज किती जमतो, ते पाहणे उद‌्बोधक ठरणारे आहे. आपल्या इथे सार्वजनिक ग्रंथालये आणि तेथील कर्मचा-यांच्या प्रश्नांची भिजत घोंगडी कित्येक काळ तशीच पडून आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांना जनतेची विद्यापीठे आणि निरंतर शिक्षणाची केंद्रे असे संबोधले जाते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या स्वरूपाविषयी या पुस्तकाद्वारे मिळणारी सखोल माहिती ही नक्कीच आपल्याला जागरूक वाचक म्हणून बरेच काही देऊन जाणारी आहे. ज्ञानाचे हे भांडार कालानुसार बदलायला हवे. तेथे नवनवीन ज्ञानशाखांच्या आधारे जगभरातील ज्ञानाचे दालन खुले व्हावे. माहितीतंत्रज्ञान युगामध्ये तर या ग्रंथालयांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. संदर्भसेवा, लोकाभिमुखता, वाचकस्नेही उपक्रम, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या ग्रंथालयांना नवसंजीवनी मिळायला हवी. त्याकरिता समाजानेच पुढाकार घेऊन या संस्थांच्या प्रगतीसाठी, अस्तित्वासाठी ठोस पाऊल उचलले पाहिजे. सावे आणि पौडवाल यांचे या पुस्तकासाठी घेतलेले श्रम हे वाचताना जागोजागी जाणवत राहतात. ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम मार्गदर्शक ठरावे, असे झाले आहे. प्रगत देशांमधील अनेक गोष्टींचे आपल्याला अतिशय कौतुक आहे. परंतु ते त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथे जिथे आहेत, त्या सगळ्याचे जतन आणि सर्वंकष संवर्धन करण्यासाठी जी सकारात्मक पावले उचलतात, त्याबद्दल मात्र आपण काहीही बोलत नाही. जागता ग्रंथव्यवहार आणि सजग वाचक हे समाजाच्या वैभवसंपन्नतेचं एक ठळक लक्षण समजलं जातं. माध्यमांचा पसारा आज अतोनात वाढलेला आहे. तिथेही वाचनाशी निगडित काही कार्यक्रम प्रसारित होत असतात. तेवढ्यानेच काही होणारे नाही. राज्यस्तरावरील कायद्याची सशक्त चौकट, उत्तम प्रशासन आणि व्यवस्थापनाची जोड या ठिकाणी अभिप्रेत आहे. या ग्रंथालयांसाठी आवश्यक तो आर्थिक निधी असेल तर त्यांची वाटचाल ही समृद्धीच्या दिशेने होईल. महाराष्ट्रातील ग्रंथालये ही आज आर्थिक पाठबळाशिवाय दुबळी झालेली आहेत. तिथली ग्रंथसंपदा अतिशय मौल्यवान असली तरीही योग्य त्या आर्थिक निधीअभावी जराजर्जर झालेली आहे. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने समाजानेच पुढाकार घेऊन सुरुवात केली पाहिजे.

* सार्वजनिक ग्रंथालये : प्रगती आणि वस्तुस्थिती
* लेखक: वसंत सावे, डॉ. सुषमा पौडवाल *प्रकाशक: माधवी प्रकाशन, पुणे
*पृष्ठसंख्या: २५८ * मूल्य: ३०० रुपये

anuradhaparab@gmail.com