आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत वाचनानुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-याची जमीन पोसायची म्हणजे रक्ताचं नसलेलं मूल तितक्याच मायेनं जपायचं, वाढवायचं आणि परतफेडीची अपेक्षाही करायची नाही. मातीशी हक्काचं नातं नसलं की अनेकांची अशी अधांतरी अवस्था होते. जमिनीचा मालक पावसाच्या लहरी स्वभावानुसार वागायला लागला, तर निसर्गाचा प्रकोप जशी हतबलता आणतो तसा हा ‘माणसाचा’ प्रकोपही त्या जमिनीसाठी राब राब राबणा-याला हताश करून सोडतो.
कृष्णात खोत यांच्या ‘धूळमाती’ या मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीतील ‘दादा’, त्याची बायको आणि या कुटुंबाच्या माध्यमातून कष्टक-यांची व्यथा मांडणारा कथेचा निवेदक, दादांचा मुलगा दारिद्र्याची विश्वासघातामुळे, फसवणुकीमुळे होणारी थट्टा कादंबरीभर एका वेगळ्याच गतीने मांडत जातो आणि कादंबरी वेदनेच्या आंतराला सामाजिक भान राखत स्पर्श करते. समाजसुधारणांचे संवाद कुणाच्या तोंडी कुठेही नाहीत की कुठेही भळभळणा-या जखमांचे उदात्तीकरण नाही. कथा घडत जाते ती अवतीभोवतीच्या लोकांमध्ये. हा भवताल ग्रामीण आहे, महानगरीय संवेदना त्यास नाही, पण म्हणून ग्राम्य भवतालाला वगळता येत नाही. ग्राम्य जीवनाचा रोमँटिसिझम मराठी साहित्यात आता बहुतांशी मागे पडला आहे. वास्तवाचा आग्रह लेखकांकडून होताना दिसतो. यातलीच कृष्णात यांची ही कादंबरी आहे.
भ्रामक कल्पना, पोकळ आशावाद, सुखांत यामध्ये ही कादंबरी अडकलेली नाही. पण एखाद्या भीषण सामाजिक वास्तवामागचा भावनिक ओलावा, उद्रेक दगड झालेल्या मनांना समजावा, हा प्रयत्न नकळतपणे लेखकाकडून कसोशीने झालेला आहे. गावातल्या दाजीची बाळाला दूध न पाजू शकणारी वांझोट्या गायीगत अवस्था झालेली बायको, ही कथेच्या मुळाशी असलेल्या कष्टक-यांचे प्रतीकच वाटते. त्यामुळे कथा सर्जनशीलतेची कितीतरी पथ्ये सहजपणे पाळते. सहजता, प्रतीकात्मकता, पारदर्शकता या तीन बाबी या कादंबरीची साहित्यिक मूल्यं म्हणून लेखकाने प्रामाणिकपणे जपल्या आहेत. उगाचच वैश्विक दु:खाचा पसारा मांडण्याच्या नादात जमीन सोडण्याचा अट्टहास लेखकाने केलेला नाही. छोट्याशा विश्वातील दु:खाची व्यापकता लेखकाने मांडली आहे. उंबराचं मूळ जिथं असतं तिथे पाण्याचा साठा असतो, असे अनेक जुने समज, श्रद्धा, अंधश्रद्धा कादंबरीमध्ये पात्रांच्या तोंडी येतात. कथेमधील भीषण परिस्थितीची अगतिकता, असहायता वाचत जाताना वाचकाला या विशिष्ट आणि दुर्लक्षित समाजाची भाषाही कळायला लागते. कृष्णात यांच्या कादंबरीचे हेच नेमके यश आहे.

अलीकडे कादंबरीच्या पृष्ठमर्यादा बदलल्या आहेत. त्यामुळे वाचकानेदेखील कादंबरी वाचतानाचे या साहित्यप्रकाराविषयीचे रूढ समज सोडून देणे गरजेचे आहे. कादंबरीला पारंपरिक, वर्षानुवर्षे चालत आलेल्या निकषांमध्ये वाचकांनी आता बसवून चालणार नाही. तसे केले तर अलीकडच्या कादंब-यांना सहजासहजी स्वीकृती मिळणार नाही. दुर्दैवाने आज अशीच परिस्थिती आहे. कादंबरी लिहिणा-या लेखकांनी आपली क्षमता ओळखून त्यानुसार लिहिताना पूर्वीचे निकष मोडले, पण वाचकाचा चश्मा मात्र फारसा बदलला नाही. अशा काळात कृष्णात यांच्या या कादंबरीचा कथेचा घाट पाहता, तो विशिष्ट वाचकवर्गापुरताच मर्यादित राहील की काय, अशीही शंका येते. शहरी, महानगरीय वातावरणात रुळलेल्या वाचकाला विरंगुळा वाटावा, अशीही व्यवस्था या कादंबरीने केली असल्याने वाचकाने त्याची चौकट मोडली नाही तरी त्याला ती आपलीशी वाटेल, असा प्रयत्न मात्र लेखकाने केला आहे. त्यामुळे कथेची गती कुठेही लेखकाने ढासळू दिली नाही.
कथेची ओघवती भाषा ही गतिमानता जपते आणि पाने उलटावी तसा वाचक अस्वस्थ होत जातो. त्यामुळे वर्तमानातील कादंबरी या साहित्यप्रकाराची स्थिती फारशी चांगली नसली, तरी कुठल्याही फॉर्ममध्ये न अडकता काहीही मोकळ्या मनाने वाचू शकणा-या वाचकाला ही कादंबरी चटकन आपलीशी करू शकते. रोजच्या यांत्रिक जीवनाला सरावलेल्यांसाठी हा एक जिवंतपणाची प्रचिती देणारा वाचनानुभव ठरू शकतो.

- पुस्तक : धूळमाती
- लेखक : कृष्णात खोत
- प्रकाशक : मौज
- पृष्ठसंख्या : १०६
- मूल्य : १२५ रु.

dahalepriyanka28@gmail.com