आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारवयीन भावविश्‍वाचा ठाव घेणारी पुस्तके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुले मराठी वाचत नाहीत आणि मुलांना आवडतील अशी मराठी पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत, हा ‘कोंबडी आधी की अंडी आधी’ या प्रश्नासारखा असलेला पेच सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे, डायमंड प्रकाशनाची ‘मालाकाईटची मंजुषा’ आणि ‘अमिलिया एयरहार्ट’ ही दोन पुस्तके. ‘मालाकाईटची मंजुषा’ हे मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केलेले रशियन लोककथांचे पुस्तक आहे, तर ‘अमिलिया एयरहार्ट’ हे कीर्ती परचुरे यांनी लिहिलेले छोटेखानी चरित्र आहे.
‘मालाकाईटची मंजुषा’ हे पावेल बाज्झोव यांनी लिहिलेले उराल पर्वतातील रशियन लोककथांचे पुस्तक आहे. मुग्धा कर्णिक यांच्या सहजसुंदर अनुवादामुळे या लोककथा वाचनीय झाल्या आहेत. रशियातल्या युक्रेनच्या परिसराला धातू, रत्ने, सुंदर छटांचे मालाकाईटचे दगड यांच्या खाणींमुळे प्राचीन काळापासून फार महत्त्व आहे. मालाकाईट म्हणजे हिरवा-निळा, मोरपिशी रंगाचा मौल्यवान दगड. रशियातल्या उराल परिसरातल्या तांब्याच्या समृद्ध खाणींमध्ये हा दगड सापडतो. या खडकातल्या रंगछटांमुळे हा दगड कोरीव वस्तू, विलासी वस्तू, अलंकार यांसाठी रशियात फारच प्रसिद्ध आहे.

हा दगड जिथे मिळतो, तिथले खाणकामगार झारच्या, जमीनदारांच्या गुलामीत काम करत. या गुलामांना स्वतःचे पोट भरण्यासाठी पराकोटीचे कष्ट सहन करावे लागत. या कष्टांतून बाहेर पडण्यासाठी त्यांना छोटीशी पळवाटही नव्हती, पण जात्यावर दळण दळणा-या स्त्रियांना सुचणा-या ओव्यांप्रमाणेच या गुलामांनीही स्वत:च्या दुःखावर मात करणा-या मनोरंजक लोककथा रचल्या. स्वतःच्या मनासाठी आधार शोधणा-या, स्वतःच्या दुःखाचा कार्यकारणभाव शोधणा-या या कथा अतिशय रंजक आहेत. जादू, चमत्कार, दृश्य-अदृश्य शक्ती यांच्यामुळे या कथांना गूढतेचे वलय लाभले आहे.

या गूढरम्य कथांची नायिका ताम्रपर्वताची राणी आहे. तिचा झगा झगमगत्या तांब्यासारखा असतो. तिच्या अश्रूंचे रूपांतर झगमगत्या खड्यांमध्ये होते. ती ज्या ताम्रवनात राहते, ते ताम्रवन माणसाला गुंगवून टाकते. या ताम्रवनातली पाने काळ्याशार मखमलीसारखी असतात. तिथे सोनेरी, चंदेरी ताराफुले असतात. तिथे रुंजी घालणा-या मधमाशाही पाषाणाच्याच असतात. असे कल्पनारम्य वर्णन या गोष्टींमधून वाचायला मिळते.

या कहाण्या म्हणजे रशियन लोककथा असल्या, तरी ‘पावेल बाज्झोव’ या लेखकाने त्या शब्दबद्ध केल्या आणि त्या जगात सगळीकडे लोकप्रिय झाल्या. यातल्या ‘मालाकाईटची मंजुषा’ आणि ‘पाषाणपुष्प’ या कथा तर रशियन कलाकारांनी नाट्यकृती, चित्रपट आणि रंगचित्रं अशा विविध माध्यमांतून जिवंत केल्या आहेत; पण पुस्तकाच्या माध्यमातल्या या कथा कुमारवाचकांच्या स्वप्नाळू, कल्पनेत रमणा-या मानसिकतेला खतपाणी घालणा-या आहेत.

‘मालाकाईटची मंजुषा’ या कल्पनारम्य कथांबरोबरच कुमारवयीन वाचकांना प्रेरक ठरेल, असे ‘अमिलिया एयरहार्ट’ हे कीर्ती परचुरे यांनी लिहिलेले छोटेखानी चरित्रही ‘कनक बुक्स’ची उत्कृष्ट निर्मिती आहे. पुरुषांइतक्याच स्त्रियाही उत्कृष्ट वैमानिक बनू शकतात, हे सिद्ध करण्याच्या ध्येयाने अमिलिया एयरहार्ट ही तरुणी पछाडलेली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेसारख्या प्रगत देशातही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची, समानतेची वागणूक मिळत नव्हती. अशा वेळी अमिलियाने वैमानिक बनण्याचे नवखे स्वप्न बाळगले. एवढेच नाही, तर फोटोग्राफर, ट्रक ड्रायव्हर, स्टेनोग्राफर अशा वेगवेगळ्या नोक-या करून तिने एक हजार डॉलर्स जमवले. आपल्या नवखेपणावर कुणी टीका करू नये, म्हणून तिने तिचे कमरेपर्यंत येणारे लांबसडक केस कापून बॉयकटही केला. एवढेच नाही, तर वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी दोन हजार डॉलर्सचे स्वतःचे विमान खरेदी केले. १४ हजार फुटांच्या उंचीवरचे उड्डाण, विमेन्स एयर डर्बीत म्हणजेच स्त्री वैमानिकांच्या विमानउड्डाणाच्या शर्यतीत सहभाग, अटलांटिक समुद्रावरून विमानोड्डाण, पॅसिफिक समुद्राचा प्रवास, लॉस एंजलिस ते मेक्सिको असे एकटीने केलेले विमानोड्डाण असे अनेक विक्रम तिच्या नावे जमा आहेत.
दुर्दैवाने जगप्रदक्षिणेच्या महत्त्वाकांक्षी विमानप्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात अमिलियाचे विमान गायब झाले आणि केवळ ३९व्या वर्षी तिच्या कर्तृत्वाचा अंत झाला. अमिलियाच्या विमानाचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. अमिलियाला नाहीसे होऊन तब्बल ८७ वर्षं लोटली तरी अजूनही तिची लोकप्रियता वाढतेच आहे. अमिलियाचे नेमके काय झाले, ती कशी नाहीशी झाली, हे प्रश्न अजूनही तिच्या चाहत्यांना सतावतात. इतिहासात अजरामर झालेल्या या धाडसी तरुणीचे चरित्र कुमारांनाच नव्हे, तर सगळ्याच वयोगटातल्या वाचकांना प्रेरक ठरणारे आहे.

पुस्तकाचे नाव : मालाकाईटची मंजुषा,
* लेखक : पावेल बाज्झोव
* अनुवाद : मुग्धा कर्णिक,
* प्रकाशक : कनक बुक्स, डायमंड पब्लिकेशन्स
* पृष्ठसंख्या : ११६
* मूल्य : १५०/- रुपये
पुस्तकाचे नाव : अमिलिया एयरहार्ट,
* लेखक : कीर्ती परचुरे
* प्रकाशक : कनक बुक्स,
* डायमंड पब्लिकेशन्स
* पृष्ठसंख्या : ६८
* किंमत : ५०/- रुपये