आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Book Review By Tanuja Daptardar, Divya Marathi

सामाजिक प्रश्‍नांची परखड चिकित्सा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘21व्या शतकातील सामाजिक प्रश्न’ या पुस्तकाद्वारे आपण लेखकाच्या नजरेने पाहतो, वाचतो, समजून घेतो. त्यानंतर मात्र वाचक स्वत: अंतर्मुख होऊन या प्रश्नांबरोबर स्वत:ला को-रिलेट करू शकतो.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न’ हे पुस्तक या शतकातील बदलत्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, समीकरणामुळे उद्भवलेले प्रश्न व समस्यांचा उहापोह करते. या शतकाने अनेक बदल घडवून आणले. अजूनही बदल घडणार आहेत. त्या बदलांमुळे सर्वत्र झालेले कौटुंबिक वातावरणातील बदल, नवीन जीवनमूल्ये, जुन्या पारंपरिक कुटुंब व्यवस्थेला गेलेले तडे तसेच प्रत्येक जुन्या व नवीन पिढीत निर्माण झालेला संघर्ष, सैल झालेली कौटुंबिक नातेसंबंधाची वीण या विषयांवर भाष्य करते.

19 व्या शतकातील कार्ल मार्क्स व त्याचे मार्क्सवादी तत्त्वज्ञान बदलत्या काळाची पावले न ओळखल्यामुळे कालबाह्य ठरले. त्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. त्या क्षणापासून, ते 1990च्या दशकात ग्लोबलायझेशन, कॉम्प्युटरायझेशन, लिबरलायझेशन इ. शब्द परवलीचे ठरले. या बदलामुळे समाजातील एक वर्ग श्रीमंतीकडे झुकला, तर एक वर्ग आर्थिकदृष्ट्या अधिक दुर्बल झाला. प्रत्येक बदल आपल्या बरोबर काही नवीन प्रश्न उभे करतो. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अनेक आयुष्ये संपतात.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी लिहिलेले अनेक लेख या पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. प्रत्येक लेख एका वेगळ्या समस्येला स्पर्श करतो. लेखकाला या समस्यांची पुरती ओळख असल्याने त्या प्रत्येक समस्येची जाणीव आणि खोली वाचकही अनुभवतो. पुस्तकात मांडण्यात आलेली प्रत्येक समस्या आपण सर्वच थोड्याफार फरकाने पाहतो, अनुभवतो. आपल्या आजूबाजूच्या समाजातील एखादी तरी घटना आपणास या पुस्तकातील मुद्द्यांची आठवण करून देईल. लेखक स्वत: समाजसेवक म्हणून किंवा Part of solution making असल्यामुळे पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळाले आहे. विविध लेखांचे संकलन असल्यामुळे एकाच वेळी रशियातील ग्लासनोतपासून बर्लिनची भिंत पडण्यापर्यंत तसेच गणेशोत्सवातील बदलत्या विकृतींबद्दलही या पुस्तकातून माहिती मिळते.

या पुस्तकातील प्रत्येक प्रश्न हा आपल्या बहुतेकांच्या जगण्याचा कुठे ना कुठे एक भाग असल्यामुळे, तो प्रश्न वाचकालाही भिडतो. सुजाण वाचक अंतर्मुख होऊन विचार करील, असा हा लेखसंग्रह आहे. मात्र एका लेखात लेखकाने पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या दिनक्रमाचे वर्णन केले आहे. यंत्रविरहित घरात स्त्रिया शारीरिक श्रमाने रोजची कामे पूर्ण करीत. सध्या स्त्रिया घरगुती कामे मिक्सर, वॉशिंग मशीन, ओव्हन इ.च्या मदतीने पूर्ण करतात. लेखक म्हणतात की, पूर्वीची स्त्री सर्व कामे जिव्हाळ्याने करायची, कारण त्यात शारीरिक कष्ट होते. आधुनिक स्त्री यंत्र वापरते म्हणून तिच्या कामात, स्वयंपाकात जिव्हाळा नाही! युवा स्त्रीच्या कार्यशैलीबद्दल लेखकाने व्यक्त केलेले हे मत उदारमतवादाची कड घेणारे नाही. म्हणूनच लेखकाची स्त्रीवर्गाच्या जीवनपद्धतीविषयीची अशी काही मते आधुनिक जीवनप्रणाली मानणा-यांना पटणार नाहीत. मात्र, ही मते वगळता, हा लेखसंग्रह सामान्य वाचकास नक्कीच वाचनीय वाटेल. एक वाचक म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून आपण या पुस्तकात व्यक्त केलेल्या प्रश्नांना परिचित असतो. व्यक्ती आणि निसर्ग या दोन्हींचे लेखकाचे निरीक्षण उत्तम आहे, हे पुस्तकात सतत जाणवत राहते. बदलती कार्यसंस्कृती, पालक व मुलांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल, नवी आव्हाने, जल व्यवस्थापन, बदलती सामाजिक आणि आर्थिक गणिते अशा विविध विषयांवर पुस्तक आपल्या जाणिवा विस्तारते. 1980 सालापासून लेखक अनाथाश्रमातील मुलांचे प्रश्न सोडवण्याबाबत काम करीत आहेत. राज्यस्तरावर त्यांचे या कार्यात भरीव योगदान आहे. लेखकाने अनाथ मुले, मुली, स्त्रिया, त्यांचे आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आदी बाबतीत सातत्याने कार्य केले आहे. लेखक स्वत: अतिशय कष्टाने शिक्षण घेऊन एक संशोधक, समाजसेवक, लेखक बनले व इतरांसाठीदेखील एक प्रेरणास्थान झाले आहेत. 21व्या शतकातील सामाजिक प्रश्न आपण लेखकाच्या नजरेने पाहतो, वाचतो, समजून घेतो. त्यानंतर मात्र वाचक स्वत: अंतर्मुख होऊन या प्रश्नांबरोबर स्वत:ला को-रिलेट करू शकतो. यातच या पुस्तकाचे यश आहे. एक सामान्य वाचक ते सामाजिक प्रश्नांचा अभ्यासक अशा दोघांनाही हे पुस्तक आकर्षित करील. त्याचप्रमाणे 1990च्या दशकातील माहिती व तंत्रज्ञान युगाची सुरुवात, दूरसंचार क्षेत्रातील क्रांती, मुक्त व्यापार करार वगैरे महत्त्वाच्या जागतिक इतिहासाची पुसट उजळणी हे पुस्तक करते. त्यामुळेच या गोष्टींचा उद्भव झाल्यानंतर जन्मलेल्या अभ्यासू युवकांसाठीदेखील हा लेखसंग्रह नक्कीच वाचनीय आहे. एखादा विचार वा तत्त्वज्ञान आचरणात आणताना तो बदलत्या काळाशी सुसंगत आहे ना, हे ताडून पाहणे अतिशय गरजेचे असते, हा महत्त्वाचा विचारही लेखक अधोरेखित करतो.

ultimatedestination@gmail.com
० पुस्तकाचे नाव : एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न
० लेखक - डॉ. सुनीलकुमार लवटे
० प्रकाशन - शब्दवेल प्रकाशन
० मूल्य - 180 रु.