आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सां‍गीतिक इतिहासाची मोहक पाने!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांची स्वत:चा इतिहास नोंदवून ठेवण्याची वृत्ती नव्हती, हे वास्तव आता मान्यच झाले आहे. जगभरातही सांस्कृतिक इतिहासाचा विभाग नुकताच विकसित व्हायला सुरुवात झाली आहे. खरे तर भारतीय लिपी विकसित होऊन अनंत काळ लोटला असला, तरीही मौखिक शिक्षणावर आपला नेहमीच अनावश्यक भर होता. त्यात भर पडली आपले ज्ञान गुप्त ठेवायच्या प्रवृत्तीची! खरे म्हणजे, ज्ञान वाटल्याने वाढते, हेही आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवले आहे. तरीही कुणी चोरी करेल, या भयाने आपले ज्ञान स्वत:पुरते सीमित ठेवण्याच्या पंडित व ज्ञानी लोकांच्या प्रवृत्तीमुळे, बरेचसे पारंपरिक ज्ञान हरवले, हे मात्र खरे. जे काही शिल्लक राहिले तेच आपल्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे आता सुशिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती या क्षेत्रात आल्यावर, हा अत्यंत महत्त्वाचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर ओघानेच आली. अनिष प्रधान हे इतिहासातील पदवीधर व व्यवसायाने तबलजी असल्याने, संगीत व इतिहास या दोन्ही विषयांची सांगड घालून त्यांनी ही जबाबदारी उत्तम त-हेने पार पाडली आहे. ब्रिटिशकालीन मुंबईतील हिंदुस्थानी संगीत जगताचा आढावा घेत, त्यांनी सिद्ध केलेले पुस्तक ‘हिंदुस्थानी म्युझिक इन कलोनिअल मुंबई’ संगीताच्या ऐतिहासिक वाटचालीचा अभ्यासपूर्ण आढावा घेते.

भारतीय कलांत राजकीय बदलांबरोबर बदल होतच होते. मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर आलेल्या कलाकारांनी आणलेल्या संगीतामुळे, ठाय लयीत चाललेल्या ध्रुपद धमारात बदल होऊन, ख्याल संगीत जन्माला आले. या बदलांपेक्षाही जास्त, १९वे शतक हे कलेच्या प्रांतात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे शतक ठरले. आपल्याकडे भरतमुनींनी नाट्यशास्त्रावर जरी मोठा ग्रंथ लिहिला असला तरी नाटक खेळण्याची परंपरा लुप्त झाली होती. शास्त्रीय गायन परंपरा असली तरी ती नंतर उत्तर हिंदुस्थानी राजे आणि नवाबांच्या दरबारात जोपासली गेली होती. कंपनी सरकारने तैनाती फौजेच्या कराराद्वारे व विविध कारणे दाखवून राज्ये खालसा केल्यामुळे कलाकारांचा आश्रय तुटला होता. जी संस्थाने शिल्लक होती, त्यापैकी ज्या संस्थानाचा महसूल चांगला होता, ज्या राज्यकर्त्यांना कलेची जाण होती, त्यांनीच कलाकारांना थारा दिला. परंतु कलाकार जास्त व श्रीमंत संस्थाने कमी, यामुळे अनेक कलाकार हा आश्रय मिळवू शकले नाहीत. याची सविस्तर चर्चा करून, प्रधान मुंबईच्या विकासाकडे वळतात. शहर जसे वाढत जाते तसे तिथे अनेक प्रकारचे लोक वस्तीला येतात. त्यापैकी इथे येणा-या गायिका वा गणिकांना गाण्याचे शिक्षण देण्यासाठी गायक मुंबईस येऊ लागले, इथे वसलेल्या व्यापारी नवश्रीमंतांच्या दिवाणखान्यात या गायक-गायिकांना आमंत्रणे मिळू लागली, तसेच आश्रयही मिळू लागले. या गायिकांना शिक्षण देण्यासाठी संगीतात शिक्षण घेतलेले उस्ताद मुंबईत येऊ लागले. नवश्रीमंत शेटियांत अशा गायिकांना सांभाळण्याची फॅशन आली होती. उदरनिर्वाहाची चिंता मिटल्यावर गायिका गाण्यावर आपले लक्ष संपूर्ण केंद्रित करू शकल्या. दुसरी चर्चा लेखक करतात ती म्हणजे, १८१८च्या मराठ्यांच्या पराभवानंतर संपूर्ण देश इंग्रजांच्या अमलाखाली आल्याने, भारतीय समाजावर ते करीत असलेली अनेकांगी टीका. त्यापैकी एक म्हणजे, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला सरगम (नोटेशन) नसल्याने शास्त्रीय आधार नाही, कुणीही कसेही गातो, इत्यादी. मौखिक शिक्षण देण्याच्या पद्धतीत, शिष्याने वा मुलानेही ही विद्या कंठोद्गत वा मुखोद्गत करावी, व गुरू-शिष्य परंपरेने ती आपल्या शिष्यांना द्यावी, यामुळे व्यक्तीगणिक ती बदलली जायची. इंग्रजांची ही टीका रास्त वाटून, विष्णू दिगंबर पलुस्कर व विष्णू नारायण भातखंडे या दोघांनी या दिशेने खटपट करून, स्वत:ची एक पद्धत विकसित केली. त्यानुसार पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालय स्थापन केले. भातखंडे यांच्या पद्धतीनुसार बडोदे व ग्वालियर येथे संगीत विद्यालये स्थापन झाली. राजे-महाराजे व श्रीमंतांच्या दिवाणखान्यातून संगीताला बाहेर काढण्याचे आणि सामान्य मध्यमवर्गीयांपर्यंत संगीत पोहोचवण्याचे श्रेय या दोघांना आहे. त्यांचे प्रयत्न व संगीत शिकण्याला मान मिळावा म्हणून या दोघांनी तसेच इतरांनी केलेल्या खटपटीचे सविस्तर विवेचन (एकूण चार प्रकरणांत) पुस्तकात आले आहे. यामुळे गाणे शिकण्याची गुरू-शिष्य परंपरा मोडीत निघाली नाही. पुरुष गायक गुरुगृही राहून गाणे शिकत, पण हळूहळू बदल होत आजची शिक्षणपद्धत विकसित झाली. या विद्यालयात गायन शिकलेले सर्वच गायक झाले नाहीत, परंतु गायनाचा आस्वाद घेऊ शकणारे श्रोते झाले. त्यांनीच नंतर मैफलींची तिकिटे खरेदी करून संगीताला आजचे मानाचे स्थान मिळवून दिले.

शिकण्याच्या व शिकवण्याच्या नव्या पद्धती विकसित झाल्यावर, संगीत रुजू करण्याच्या रीतीतही बदल होणे अपरिहार्य होते. त्याचप्रमाणे, मायक्रोफोनचा शोध या संबंधात महत्त्वाचा ठरला. मोठमोठ्या सभागृहात माइकवर गाणे सहज शक्य होऊ लागले. मैफलीत गाण्याच्या निवडीतही हळूहळू फरक पडत गेला. बडा ख्याल, ध्रुपद-धमार याशिवाय इतर काही गाणे पूर्वी कमी प्रतिष्ठेचे मानले जायचे. मैफली रात्रभर चालायच्या. ठुमरी, कजरी किंवा गजल उपशास्त्रीय प्रकारांत मोडायचे. श्रोत्यांचे व्यवसाय बदलू लागले, तसे मैफलीचे स्वरूप बदलले. उपशास्त्रीय गाण्याने मैफलीत शिरकाव केला. याच बदलत गेलेल्या मैफलीच्या स्वरूपाचा आढावा या पुस्तकाने घेतला आहे. २०व्या शतकात संगीतकारांना इतरही नवी-नवी क्षितिजे खुणावू लागली. १९व्या शतकात अस्तित्वात आलेली नाट्यकला, २०व्या शतकात उदयास आलेला मूकपट व बोलपटांची दुनिया, तसेच ग्रामोफोनचे रेकॉर्डिंग, गायकांना सन्मानाने पैसे कमावण्याच्या व स्वत:तील कौशल्य दाखवण्याच्या संधी होत्या.

हे सर्व सहज वा सोपे नव्हते. मैफलीत गायन सादर करण्याला जी प्रतिष्ठा होती, ती सुरुवातीला नाटक, सिनेमांना नव्हती. गाणे रेकॉर्ड करण्याबद्दलही अनेक गैरसमजुती होत्या. रेडिओचा जन्मही याच काळातला. अमुक इतक्या वेळात गाणे संपवणे, समोर श्रोते नसताना गाणे, नाटकात चेह-यावर भाव आणून गाणे, सिनेमात सुरुवातीला प्लेबॅक नसताना हवे तसे भाव आणून अॅक्शनसहित गाणे सोपे नव्हतेच. त्याचा सराव करावा लागे. पुस्तकात या सर्व बाबी आल्या आहेत. ३४७ पानी पुस्तकातील सर्व काही सांगणे परीक्षणाच्या शब्दमर्यादेत शक्य नाही. परंतु काही तांत्रिक बाबींचा उल्लेख करायला हवा. पुस्तकाची छपाई उत्तम व निर्दोष आहे, तसेच फुटनोट्स त्याच पानावर दिल्याने संदर्भ लगेच वाचताना छान वाटते. पुस्तकाचे लिखाण संशोधनाच्या सर्व कसोट्यांना उतरेल असे, भरपूर संदर्भ व मुलाखतींनी परिपूर्ण आहे.

हिंदुस्थानी म्युझिक इन कलोनिअल बॉम्बे
*लेखक : अनिष प्रधान
*प्रकाशक : थ्री एसेज कलेक्टिव्ह,
गुडगाव, हरियाणा
*किंमत : ७५० रु.

vasntidamle@hotmail.com