आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Books By Bharat Sasane, Rasik, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोलावून आणलेले मित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमारवय संपतासंपता आधी भेटलेला आणि नंतर भेटत राहणारा एक नायक म्हणजे ‘पेरी मेसन’. हा एक वकील आहे. याचा काळ जुना आहे, म्हणजे सन १९३०चा. तत्कालीन अमेरिकेतील जीवनपद्धतीनुसार हा वकील जगतो आहे. आपल्या कुमारवयाला पेरी मेसनने सत्यासाठी आणि नैतिकतेसाठी दिलेली झुंज अनोखी आणि प्रेरणादायी वाटत आलेली असते. पेरी मेसनकडे आलेला त्याचा क्लायंट जेव्हा त्याची हकिकत सांगायला लागतो, तेव्हा त्याच्या कार्यालयात उपस्थित राहून अदृश्यपणे तुम्हीही ती हकिकत ऐकत राहता. एखादी सुंदर तरुणी खुनाच्या आरोपात अडकवली जाणे, हा तर रहस्यकथेचा मसाला असतोच; पण दुर्लक्षित वृद्ध, वर्णद्वेषामुळे सहानुभूती गमावलेला एखादा निग्रो तरुण या सगळ्यांच्या बाजूने एकटा पेरी मेसन उभा राहतो आणि तुम्हाला आश्वासन देतो की, सत्याचा विजय होत असतो. हे आश्वासन पुढच्या वाटचालीत तुमच्या सोबत प्रवाहित होत राहते. ‘कोर्टरूम ड्रामा’ नावाचा साहित्यातला प्रकार तुम्हाला त्या निमित्ताने पहिल्यांदा परिचित होतो. कोर्टातली प्रश्नोत्तरे, पेरी मेसनने केलेली उलटतपासणी, त्यातून त्याने उलगडलेले सत्य आणि अन्यायाचा परिहार हे सगळं तुम्हाला मोठं रोमहर्षक वाटतं. ‘फायटिंग स्पिरिट’ म्हणजे काही वृत्ती असते, हे तुम्हाला त्या वेळेला नकळतपणे समजलेलं असतं. तुमचं वय वाढतं, पण तरुण वयात स्वीकारलेला हा दिलासा तुम्हाला पुढे नेहमीच सोबत करीत राहतो.
{{{{{{
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर, गरजेनुसार, काही हरवलेले-विस्मृत झालेले पण नेहमीच तुमच्या सोबत असलेले ‘वफादार’ मित्र तुम्हाला बोलावून आणावे लागतात. कारण तुम्हाला त्यांची आवश्यकता निर्माण होते. हाकेनुसार ते येतात आणि तुमची सोबत करतात. तुम्हाला दिलासा देतात. बळ देतात. तारतात. जवळजवळ एक जिवंत व्यक्ती बनून ही पात्रे पुढच्या वाटचालीत, तुमच्या जगण्यात, तुमच्या सोबत वावरत राहतात, चालत राहतात. तुम्ही त्यांना बोलावले, हाकारले, की तुमच्या हाकेला ते ‘ओ’ देतात. धावत येतात. तुम्हाला मदत करतात. सोबत करतात. किशोर-कुमार वयात या मित्रांनी तुमची सोबत केलेली असते. तुमचे रंजन केलेले असते. तुम्हाला बळ दिलेले असते. तुमचा एकाकीपणा घालवलेला असतो. पुढे, आयुष्याच्या विविध वयाच्या टप्प्यांवर हे मित्र तुम्हाला गरजेनुसार बोलावून आणता येतात. कारण वाचनातून मिळालेले हे तुमचे सुहृद असतात.
- पाऊस पडतो आहे. बाहेर अंधार आहे. येथे, घरातसुद्धा टेबललॅम्पचा प्रकाश. छाती धडधडते आहे. झुंजारच्या विजयेचे अपहरण झाले आहे. झुंजार तिला शोधतो आहे. आता हा पराक्रमी वीरनायक आपल्या विजयेला कसा शोधणार आणि दुष्टांच्या संघटनेला कसे उद्ध्वस्त करणार, याची उत्सुकता आहे.
हा वीरनायक तुमच्या कुमारवयात तुम्हाला नेहमी भेटत आलेला असतो. हा रंगेल आणि रगेल असा वीरनायक आहे. दुष्टांचा कर्दनकाळ आहे. तो विनोदी बोलतो, उपहास करतो आणि संकटात स्वतःहून उडी घेतो. त्याचे उद्देश नेहमीच चांगले असतात. आणि म्हणून तो तुम्हाला आवडतो. आनंदराव त्याला पकडण्यासाठी धडपड करणारे एक पोलिस अधिकारी आहेत. तेही मनाने चांगलेच आहेत. त्यांची नेहमी फजिती होते. मात्र, झुंजार आनंदरावांना प्रकरण सोडवण्याचे श्रेय नेहमीच देतो. त्याला प्रसिद्धी नको आहे. हा अफाट वीरनायक काळाच्या सतत बरोबरीने वावरतो. त्याच काळात त्याच्या झुंजारमहालात मोटारीला गच्चीवर घेऊन जाणारी लिफ्ट असते. हे सगळं तुम्ही आवडीने आणि आनंदाने आणि नवलाने वाचता. तुमच्या छातीची धडधड वाढलेली असते. त्याचा ‘झुंजारमहाल’ तुम्ही आतून जाऊन पाहिलेला असतो. त्याच्या प्रत्येक साहसी मोहिमेत तुम्ही त्याच्या सोबत असता. समाजाने, समाजातील शिष्ठसंमत व्यवस्थेने, वाङ‌्मयव्यवहाराने अशा प्रकारच्या लिखाणाला प्रतिष्ठा दिलेली आहे की नाही, याची तुम्हाला त्या वयात पर्वा नसते. ही पर्वा शिष्ठांनी करायची असते. या वीरांना मात्र सत्याची बाजू घ्यायची असते. वाईटाशी लढायचं असतं. आणि इतकं तुम्हाला पुरे असतं. त्या लढाईत तुम्हीही सामील असता, श्वास रोखून.
* * *
तुम्ही आयुष्यात कधी एकाकी असता. तुमच्या तीव्र अशा एकाकीपणाच्या दिवसांत बोलावून आणलेले हे ग्रंथमित्र तुमची साथ देतात. तुमच्या सोबत वावरतात. जगणं सुसह्य करतात. या मित्रांच्या गर्दीत, वर स्मरण केलेले मित्र तुमच्या दिलाशासाठी येऊन उपस्थित होतात. ‘झुंजार’सुद्धा. ‘पेरी मेसन’सुद्धा. कधी ‘कथासरित्सागर’ तर कधी ‘अरेबियन नाइट‌्स’सुद्धा. ‘महाभारत’ आणि ‘रामायण’सुद्धा. तुम्हाला कधी अन्यायाविरुद्ध लढावं लागतं. निराशा झुगारून लढवय्यी वृत्ती स्वीकारावी लागते. जर आपली बाजू बरोबर असेल तर सत्याचा विजय होईल, असा विश्वास मनात बाळगावा लागतो. यासाठी ही ‘बोलावून आणलेली मित्रमंडळी’ तुम्हाला उपयोगी ठरतात, दिलासा देतात, तुमच्या बाजूने उभी राहतात. वाचनाच्या वयातल्या विविध टप्प्यांवर तुम्हाला भेटलेले वफादार, असे तुमचे ‘वीरनायक’ म्हणजे वाचनाने तुम्हाला दिलेली अनमोल देणगी असते.
आणि वाचता वाचता पुढील वाटचालीतून आणि वाचनातून एक वृद्ध तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला बुचकळ्यात टाकत राहतो. त्याचं नाव मोहनदास करमचंद गांधी असं असतं. त्याला तुम्ही पाहिलं असण्याचा प्रश्नच उद््भवत नसतो. त्याने तुम्हाला प्रभावितही करण्याचा प्रश्न उद्भवत नसतो. पण तुमच्या वाचनातून आणि वाचनाच्या सगळ्या प्रवासातून तुम्हाला तो भेटतो, भेटत राहतो आणि पुन:पुन्हा बुचकळ्यात पाडतो. असा काही माणूस अस्तित्वात तरी होता का, असं वाटावं असं त्याचं वागणं, वावरणं गूढ असं असतं. काही मंडळी याचा द्वेष करतात, तर काही मंडळी त्याला राष्ट्रपिता मानतात. हा वृद्ध माणूस पुढे आपल्याला चित्रपटातूनसुद्धा भेटतो, त्याच्या आत्मकथेतून भेटत राहतो आणि आपल्यासोबत चालत राहतो.
bjsasane@yahoo.co.in