आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Cancer By Dr.Anand Joshi, Divya Marathi, Nobel Laurate

कर्करोग: काल आणि आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कॅन्सर वॉर्ड’ ही नोबेलविजेत्या अलेक्झँडर सॉलझेनितसीनची कादंबरी वाचली, तेव्हा माझे वैद्यकीय शिक्षण चालू होते. पावेल निकोलेविच रुसॅनॉव या चाळिशीच्या माणसाच्या मानेवर गाठ येते. कर्करोगाचे निदान होते. हे निदान ऐकून त्याच्या हातापायातील ताकद निघून जाते. एका मेडिकल गुलागमध्ये आपण अडकलो आहोत, अशी त्याची भावना होते. कर्करोग हा त्याच्यासाठी नियतीचा शिक्षादेश ठरतो. आज डॉ. रॉबर्ट बकमन या कर्करोग तज्ज्ञाचे ‘कॅन्सर इज अ वर्ड नॉट अ सेंटेन्स’- कर्करोग हा एक शब्द आहे शिक्षादेश नव्हे- या शीर्षकाचे पुस्तक वाचले म्हणजे कर्करोग विज्ञान विकसित होत माणसाला कसे मदत करत आहे, याची जाणीव होते.


मानव जातीचा इतिहास पाहिला तर माणसाला कर्करोग गेले काही हजार वर्षे माहीत आहे. कर्करोगाचे उल्लेख पाश्चिमात्य तसेच पौर्वात्य इतिहासात आढळतात. ते उगाळत बसण्याची गरज नाही. आज काय स्थिती आहे, ते पाहू या.


कर्करोगाबद्दलच्या मूलभूत संकल्पना गेल्या अर्धशतकात झपाट्याने बदलत आल्या आहेत. याला अनेक कारणे आहेत. जैवतंत्रज्ञानाचा वेगाने झालेला विकास हे अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. या जैवतंत्रज्ञानामुळे पेशीतील जनुकांवर प्रकाश पडला. जनुकांचे कार्य, त्यात होणारी उत्परिवर्तने, त्यामुळे निर्माण होणा-या विकृती, अशी अनेकांगी माहिती मिळत गेली. मानवी जनुकांचा नकाशा तयार झाला. एपिजनेटिक्स म्हणजे जनुकांच्या कार्यावर परिणाम करणा-या काही विशिष्ट जैवरासायनिक क्रिया, असे सुलभतेने म्हणता येईल. या ‘एपिजनेटिक्स’बद्दलचे आकलन वाढू लागले. ‘प्रोटियॉमिक्स’ म्हणजे शरीरातील प्रथिनांबद्दलचे विज्ञान. या विज्ञानाचा विकास होत गेला. पंचाच्या नि-या करून ठेवाव्या त्याप्रमाणे प्रथिनाच्या रेणूच्या घड्या घातलेल्या असतात; यालाच ‘प्रोटिन फोल्डिंग’ म्हणतात. या घड्या घालण्यामध्ये काही गडबड झाली म्हणजे शरीरात काही रोग निर्माण होतात, याची माहिती जैवतंत्रज्ञानामुळे मिळू लागली. ‘मेटाबोलियम’ म्हणजे शरीरातील पेशींच्या चयापचयाचे ज्ञान. प्रथिने, स्रिग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स यांच्यावर पेशींमध्ये रासायनिक क्रिया कशा घडतात, याचे नूतन तंत्रज्ञान विकसित झाले. आज यावर प्रकाश पडत आहे. मानवी विकृतींच्या कारणांचे नवे दालन उघडत आहे. कर्करोगाच्या आकलनात यामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. हे विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे.
काही आकडेवारी
* 2002मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जगभरात 1 कोटी 10 लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळले. यातील 45 टक्के रुग्ण आशिया खंडात होते. युरोपमध्ये 26 टक्के, उत्तर अमेरिकेत 14.5 टक्के, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत 7.1 टक्के, आफ्रिकेत 6 टक्के, ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड 1 टक्का अशी आकडेवारी आहे.
* फुप्फुसाचा कर्करोग हा जगातील प्रथम क्रमांकाचा कर्करोग आहे, जास्तीत जास्त मृत्यू याच कर्करोगामुळे होतात.
*स्तनाचा कर्करोग हा जगातील दुस-या क्रमांकाचा कर्करोग आहे.
* कोणत्या कर्करोगामुळे मृत्यू होतात, याची क्रमवारी लावायची असेल तर पहिला क्रमांक फुप्फुसाचा कर्करोग, दुसरा क्रमांक जठराचा कर्करोग (स्टमक), तिसरा क्रमांक यकृताचा कर्करोग (लिव्हर), चौथा आतड्याचा कर्करोग, पाचवा

स्तनाचा कर्करोग.
* फुप्फुसाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग, हे तीन कर्करोग विकसित देशांत अविकसित देशांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळतात. यकृताचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यांचे प्रमाण अविकसित देशांत जास्त आहे.


जठराच्या कर्करोगाचे प्रमाण विकसित व अविकसित देशांत सारखेच आहे. पण जठराचा कर्करोग उत्तर अमेरिका व आफ्रिका खंडाच्या तुलनेत अशिया खंडात जास्त प्रमाणात आढळतो. कर्करोग होण्यासाठी आनुवंशिक म्हणजेच जनुकीय घटक कारणीभूत असतात. हे घटक टाळणे शक्य नसते. पण कर्करोगाला कारणीभूत ठरणारे काही घटक टाळता येण्यासारखे असतात. असे नऊ घटक आहेत. जगभरातील एकतृतीयांश कर्करोगांसाठी हे घटक कारणीभूत ठरतात. धूम्रपान, दारू पिणे, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, आहारात फळे व भाज्या यांचे प्रमाण कमी असणे, निरोध न वापरता अनेकांशी केलेले शरीरसंबंध, हवेतील प्रदूषण, घरामध्ये जळणासाठी लाकूड- कोळसा- केरोसिन यांच्या वापराने निर्माण होणारा धूर, आणि योग्य प्रकारे निर्जंतुक न केलेल्या सुया वापरून इंजेक्शने घेणे, हे नऊ टाळता येणारे घटक आहेत. भारतात इंजक्शने घेण्याचे प्रमाण खूप आहे. ‘मला ताकदीचे इंजेक्शन द्या’ अशी मागणी करणारे अनेक आहेत. ‘वीकनेसपणा’वर उपाय म्हणून सलाइनच्या ग्लुकोजच्या बाटल्या दवाखान्यात चढवल्या जातात. अशा घटना झोपडपट्टीत सर्रास घडतात. यासाठी वापरल्या जाणा-या सुया धोकादायक असतात. यामुळे ‘एड्सचा विषाणू-एचआयव्ही’, ‘हिपॅटायटिस बी व सी’ हे काविळीचे विषाणू समाजात फैलावतात. एड्सचे तसेच या काविळीचे रुग्ण समाजात वाढतात. अशा रुग्णांत यकृताच्या कर्करोगाचे तसेच इतर कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचे हे एक कारण आहे. प्रयत्नाने हे प्रमाण कमी करता येते, हा कर्करोग विज्ञानातील कळीचा मुद्दा आहे.


कर्करोग टाळण्यासाठी
* धूम्रपान करू नका, तंबाखू खाऊ नका.
* दारू पिऊ नका.
* अतिजाड ‘स्थूल’ होऊ नका.
* शारीरिक व्यायामाचा आळस करू नका.
* अनेकांशी लैंगिक शारीरिक संबंध ठेवू नका.
* घरात लाकूड, कोळसा, केरोसिन अयोग्य पद्धतीने जाळून धूर होऊ देऊ नका.
* सुया निर्जंतुक न करता ऊठसूट इंजेक्शने घेऊ नका.
* हवेतील प्रदूषण कमी करा.
* आहारात फळे व भाज्या यांचा समावेश करा.
dranand5@yahoo.co.in