आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Cancer By Dr.Anand Joshi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोगाचे साथरोगविज्ञान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाची साठी उलटलेले एक गृहस्थ एका कर्करोगतज्ज्ञाकडे आले होते. त्यांना फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. गेली काही वर्षे त्यांनी धूम्रपान बंद केले होते. पण त्याआधी दोन दशके त्यांनी धूम्रपान उपभोगले होते. ‘माझे इतर मित्रही धूम्रपान करतात, पण मलाच का फुप्फुसाचा कर्करोग झाला? त्यांना का नाही?’ असा त्यांचा प्रश्न.

कर्करोगतज्ज्ञाकडे एक तरुण आला होता. त्याच्या वडलांना प्रॉस्टेटचा कर्करोग होता. ‘माझ्या वडलांना प्रॉस्टेटचा कर्करोग आहे. आम्ही तिघे भाऊ, मग आम्हालाही म्हातारपणात प्रॉस्टेटचा कर्करोग होईल का?’ असा त्या तरुणाचा सवाल. वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे सरळ सोपी नाहीत. साथरोगविज्ञानाच्या प्रकाशात ही उत्तरे शोधता येतील का ते पाहू...

एपिडेमिऑलॉजी - साथरोगविज्ञान- एखाद्या रोगाचा साथरोगविज्ञानाच्या अंगाने अभ्यास म्हणजे, या रोगाचे समाजातील प्रमाण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, समाजातील पर्यावरण, लोकसमूहाचे जनुकविज्ञान, अशा अनेक अंगांनी त्या रोगाचा शोध घेणे. विविध कर्करोगांचा तसा शोधाभ्यास चालूच असतो. त्यातून कर्करोगाबद्दलची बरीच सांख्यिकीय माहिती मिळते. साथरोगविज्ञानाला सांख्यिकीची-स्टॅटिस्टिक्स-सतत जोड लागते.

एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला आहे, तर त्याच्या फर्स्ट डिग्री नातेवाइकांना कर्करोग होण्याचा धोका सामान्य व्यक्तीच्या कर्करोग होण्याच्या धोक्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो, असे शोधाभ्यासात आढळून आले आहे. जगभरच्या लोकसमूहातील कर्करोगाबद्दलच्या साथरोगविज्ञानाच्या शोधाभ्यासामुळे हे शक्य झाले आहे. व्यक्तीचे फर्स्ट डिग्री नातेवाईक म्हणजे काय? त्या व्यक्तीचे आईवडील व सख्खी भावंडे यांना फर्स्ट डिग्री नातेवाईक म्हणतात.
आता एक उदाहण घेऊ. वडलांना प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग आहे, तर त्याच्या मुलांना हा कर्करोग होण्याचा धोका, इतर माणसांपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो. याला ‘जनेटिक प्रिडिस्पोझिशन ऑफ कॅन्सर’ असे म्हणतात. व्यक्तीच्या फर्स्ट डिग्री नातेवाइकांत कर्करोग निर्माण करण्यास साहाय्य करणारे जनुक असू शकतात. असे जनुक व्यक्तीच्या पर्यावरणातील कार्सिनोजेन्स-कर्करोगजनक घटकांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता असते. याचा अर्थ, कर्करोग होण्यासाठी पर्यावरण व व्यक्तीचे जनुक हे दोन्ही घटक योग्य प्रमाणात एकत्र आले, तर कर्करोगाची शक्यता निर्माण होते. हे मानवजातीसाठी आशादायक आहे. कारण पर्यावरणातील कर्करोगजनक घटकांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न माणूस निश्चितच करू शकतो. धूम्रपानावर नियंत्रण हे साथरोगविज्ञानातील महत्त्वाचे उदाहरण. एकूणच कर्करोगाचा प्रतिबंध करणे, हे साथरोगविज्ञानामुळे शक्य झाले.

आद्यशोधनिबंध- ब्रिटिश वैज्ञानिक रिचर्ड डॉल (1912-2004) व ब्रॅडफर्ड हिल (1887-1991) या दोघांनी धूम्रपानावरील साथरोगविज्ञानाचे आद्य संशोधन केले. 1948च्या सुमारास डॉल व हिल यांनी प्राथमिक निरीक्षणाअंती ‘धूम्रपान हे फुप्फुसाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे कारण आहे’ असा शोधनिबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केला.

डॉल व हिल यांनी 1954मध्ये धूम्रपानाच्या संदर्भात ‘प्रॉस्पेक्टिव कोहॉर्ट स्टडी’ म्हणजे ‘विशिष्ट समूहाबाबतच्या काळात पुढे चालू राहणारा शोधाभ्यास’ सुरू केला. हा शोधाभ्यास पन्नास वर्षे चालला. शेवटचा शोधनिबंध 2004 मध्ये; रिचर्ड डॉल मरण्याआधी एक वर्ष प्रकाशित झाला. या कामी 34 हजार ब्रिटिश डॉक्टरांनाच संशोधनाचे उमेदवार म्हणून घेतले होते. त्यांना त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल सखोल प्रश्नावली वेळोवेळी पाठवली गेली. हा शोधाभ्यास या समूहावर पन्नास वर्षे चालल्यामुळे धूम्रपानामुळे होणा-या फुप्फुसाच्या कर्करोगाबद्दल, कर्करोगाच्या लक्षणांबद्दल, उमेदवाराच्या मृत्यूबाबत व इतर अनेक मुद्द्यांसंबंधी आकडेवारीचा खजिनाच हाती आला. धूम्रपानामुळे कर्करोग होतो, हे सिद्ध करणारा हा साथरोगविज्ञानातला पहिला शोधाभ्यास होता. यातील आकडेवारी व निष्कर्ष दर दोन-चार वर्षानंतर प्रकाशित होत राहिले. धूम्रपान न करणा-यांपेक्षा धूम्रपान करणा-यांमध्ये मृत्यू दहा वर्षे आधी येतो, असे आढळून आले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी धूम्रपान पूर्णपणे थांबवले तर फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका निम्मा होतो, वयाच्या तिसाव्या वर्षी धूम्रपान पूर्णपणे थांबवले तर कर्करोगाचा धोका जवळजवळ नाहीसा होतो. इंग्लंड व अमेरिकेतील अशा शोधाभ्यासांची दखल सर्व देशांना घ्यावी लागली. त्यामुळे धूम्रपानाच्या सर्व जाहिराती बंद झाल्या. सिगारेटच्या पाकिटावर धोक्याच्या सूचना द्याव्या लागल्या, धूम्रपानावर निर्बंध आले. साथरोगविज्ञानाच्या या अभ्यासामुळे कर्करोगावर प्रतिबंधक उपाय योजता येतात, हे सिद्ध झाले.

तपश्चर्या- साथरोगविज्ञानातील प्रदीर्घ संशोधनाची अशी परंपरा पाश्चात्त्य देशांत दिसून येते. साथरोगविज्ञानात दोन प्रकारची संशोधने असतात. एकाच वेळी हजारो लोकांचे विशिष्ट रोगाच्या बाबतीत सर्वेक्षण करणे, हा एक प्रकार. एक लोकसमूह घेऊन त्याचे अनेक वर्षे म्हणजे पन्नास-शंभर वर्षे सर्वेक्षण करणे, हा दुसरा प्रकार. दोन्ही प्रकारची संशोधने वैद्यकीय विज्ञानाला महत्त्वाची माहिती पुरवत असतात. कर्करोगविज्ञानात अशी दोन्ही प्रकारची संशोधने चालू असतात.

dranand5@yahoo.co.in