आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Cancer Dignosis By Dr. Anand Joshi, Divya Marathi

कर्करोग निदानाचा संवेदन टप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्करोग नेमका कशापासून झाला आहे, याची माहिती सूक्ष्मदर्शकाखाली मिळते. कर्कपेशी ग्रंथींपासून निर्माण झाल्या आहेत का? त्या म्युकस म्हणजेच चिकट द्रव पदार्थ तयार करतात का? कर्कपेशी छोट्या आहेत का? (फुप्फुसाचा कर्करोग व लिम्फोमा या कर्करोगात हे महत्त्वाचे असते) कर्कपेशी त्वचापेशींसारख्या चपट्या आहेत का? अशा कितीतरी गोष्टी कळल्या म्हणजे कर्करोगाचे पुढील वर्तन कसे असेल आणि या कर्करोगावर कोणते उपाय करावे, हे ठरवण्यास मदत होते.

अनेक वर्षे जगभर झालेल्या संशोधनाने कर्कपेशींची लक्षणे (फीचर्स) कोणती, हे नक्की झालेले आहे. त्यामुळे जगभरचे विकृतीतज्ज्ञ तेच निकष लावून कर्कपेशी तपासतात. ज्या अवयवाला कर्करोग झाला आहे, त्यातील सर्वसाधारण पेशी कशा दिसतात आणि तेथील कर्कपेशी कशा दिसतात, हे प्रथम तपासून पाहतात. या दिसण्यातील फरक जितका कमी असेल, म्हणजे कर्कपेशी त्याच अवयवातील सर्वसाधारण पेशींसारख्या दिसत असतील, तर ते चांगले लक्षण समजले जाते. याचा अर्थ, या कर्कपेशी फार बंडखोर नाहीत. त्या अनिर्बंध वाढणार नाहीत. वाढीचे थोडेफार नियम पाळतील, असे म्हणता येते. थोडक्यात, असा कर्करोग आक्रमक नसतो. याला ‘लो ग्रेड ट्यूमर’ असे वैज्ञानिक नाव आहे. असे ट्यूमर हळूहळू वाढतात. शरीरभर पसरण्याचा त्यांचा कल कमी असतो.

काही कर्करोगात कर्कपेशी झटकन ओळखू येतात. अवयवातील सर्वसाधारण पेशींसारख्या त्या दिसत नाहीत. त्या बंडखोर असतात आणि भराभर वाढतात. असा कर्करोग म्हणजे हाय ग्रेड ट्यूमर. हा ट्यूमर वेगाने वाढतो. शरीरभर चटकन पसरतो. कर्कपेशीतील ‘न्यूक्लियस’ केंद्रक मोठा असतो. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तर कर्कपेशी विभाजनाच्या निरनिराळ्या अवस्थेत दिसतात. त्यांचे सतत विभाजन पुनर्जनन चालू असते. आताशा कर्कपेशींचे स्टेनिंग म्हणजे, कर्कपेशी रंगवण्याच्या नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत. इम्युनॉलॉजी-प्रतिक्षमता यंत्रणेतील संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. याला ‘इम्युन स्टेनिंग’ म्हणतात.
विशिष्ट कर्कपेशींवर विशिष्ट रेणवीय नक्षीकाम असते. हे रेणू प्रथिनांचे बनलेले असतात. या प्रथिनांना ओळखतील, अशा अँटिबॉडीज-प्रतिपिंडे वापरून त्या कर्कपेशींचे स्टेनिंग करता येते, म्हणजे त्या पेशी ठळकपणे दाखवता येतात. याचा उपयोग पुढे या कर्करोगासाठी कोणते उपचार निवडायचे, हे ठरवण्यासाठी होतो. जठराचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग यांच्यासाठी या कर्कपेशी म्युसिन हा द्रव निर्माण करतात की नाही, हे शोधण्याच्या चाचण्या विकसित झाल्या आहेत. मोठ्या आतड्याचा कर्करोग, स्त्रीबीजांडाचा-ओव्हरीचा कर्करोग, त्वचेचा मेलॅनोमा हा कर्करोग, अशा विविध कर्करोगांच्या कर्कपेशींवर निरनिराळे रेणू असतात, ते शोधण्याच्या चाचण्या विकसित झाल्यामुळे निदानाबरोबर उपचारांमध्ये स्पष्टता व विविक्षता आली आहे.

कर्कविकृतीतज्ज्ञांकडे बायॉप्सी करून उती तपासणीसाठी पाठवला म्हणजे निर्णय येईपर्यंतचा काळ रुग्णासाठी काळजीचा असतो. परंतु निदान काय, हे शंभर टक्के कळेल, अशी रुग्णाची अपेक्षाही असते. बरेच वेळेला ती पूर्ण होते. पण काही वेळा तज्ज्ञ निर्णय देऊ शकत नाहीत. अशा वेळेस अनिश्चिततेची कारणे रुग्णाने समजून घेणे, हा या काळातील चिंता कमी करण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो. असे का होते? सूक्ष्मदर्शकाखाली प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यानंतरही विकृतीतज्ज्ञ शंभर टक्के निर्णय का देऊ शकत नाहीत, असा प्रश्न रुग्णाला पडतो.

सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करणे, ही जटिल प्रक्रिया असते. पेशींचे जैवविज्ञान हे गणित नाही. दोन अधिक दोन म्हणजे चार, असे जैवविज्ञानात घडत नाही. कधी कधी सूक्ष्मदर्शकाखाली दिसणा-या पेशी या कर्कपेशी आहेत की सर्वसाधारण पेशी आहेत, हा संभ्रम पडतो. याचे कारण हा ट्यूमर अत्यंत धीम्या गतीने वाढत असतो. नॉर्मल आणि कर्करोग याच्या सीमेवर या पेशी असतात. अशा ट्यूमरना ‘बॉर्डर लाइन ट्यूमर’ असे म्हणतात. काही कर्करोगांच्या कर्कपेशी इतक्या बदलेल्या असतात, त्या कोणत्या अवयवांपासून निर्माण झाल्या आहेत, हे कळत नाही. पाच ते दहा टक्के ट्यूमर या कॅटॅगरीमध्ये मोडतात. कर्करोग कोणत्या अवयवापासून निर्माण झाला आहे, हे न कळल्यामुळे याला ‘कॅन्सर ऑफ अननोन प्रायमरी’ अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. रुग्णांना ही सर्व माहिती समजावून सांगितली गेली पाहिजे. कर्कपेशींचे जैवविज्ञान अजून विकसित होत आहे. ब-याच रिकाम्या जागा आहेत, हे रुग्णाला समजले पाहिजे. स्टेनिंगच्या विविध चाचण्या त्यासाठीच विकसित होत आहेत. त्याचा उपयोग कालांतराने दिसून येईल. आधुनिक वैद्यकीय विज्ञान ही संशोधनातील पुराव्यावर आधारित निरंतर विकसित व उत्क्रांत होत जाणारी विज्ञान शाखा आहे. माणसाचे शरीर म्हणजे ‘ब्लॅकबॉक्स’ हाती आली तरी त्यातील गोष्टी सहजासहजी कळून येत नाहीत, हे रुग्णांनी लक्षात घेतले पाहिजे.