आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Cancer Patients By Dr.Anand Joshi, Rasik, Divya Marathi

हॅव ए पेशन्स !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘प्रत्येक कर्करोगतज्ज्ञ हा ‘जेरिऑट्रिक ऑँकॉलॉजिस्ट’ म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा कर्करोगतज्ज्ञ असतो, असे प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. स्टुअर्ट लिचमन यांनी म्हटले आहे. कर्करोगाच्या रुग्णांपैकी ५५ ते ६० टक्के रुग्ण हे जेष्ठ नागरिक असतात. ‘जेरिऑट्रिक आँकॉलॉजी’ ही कर्करोग विज्ञानाची एक शाखा म्हणून २०००मध्ये प्रस्थापित झाली. वैद्यकीय विज्ञानात वयाचे दोन प्रकार मानले जातात- ‘क्रोनॉलॉजिकल एज’ (काळानुसार वय) आणि ‘फिजिऑलॉजिकल एज’ (शारीरिक स्थितीनुसार वय). ऐंशी वर्षांचे दोन वृद्ध सारखे नसतात. एक तब्येतीने उत्तम, तर दुसरा थकलेला. तब्येतीने उत्तम असलेल्या व्यक्तीला कर्करोग झाल्यास, त्यावरचे उपचार तो चांगल्या त-हेने पेलू शकतो. ज्या ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती तनूमनू असेल, त्यांना कर्करोगावरचे उपचार पेलणे कठीण पडते.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे कर्करोगावरील उपचारासाठी तितकेच लागू आहे. रुग्णाच्या वयाप्रमाणे उपचारात कर्करोगतज्ज्ञाला योग्य ते बदल करावे लागतात. म्हातारपणात सगळेच वाईट असते, असे नाही. केमोथेरपीमुळे उलट्या होण्याची संवेदना व उलट्या होणे, हे दोन्ही उपप्रभाव तरुण रुग्णात जास्त होतात, तर वृद्ध रुग्णात कमी प्रमाणात होतात. चाळिशीचा रुग्ण कर्करोगाचे निदान ऐकून गडबडून जातो, तर ऐंशीतील रुग्ण तेच निदान ‘फिलॉसॉफिकली’ घेतो.
कर्करोगाच्या ओझ्याबरोबर रुग्णाची इतर शारीरिक स्थिती म्हणजे तब्येत कशी आहे, यावर कर्करोगाच्या वाढीची गती व उपचारांचे यश अवलंबून असते. कर्करोग व त्यावरील उपचार यामुळे रुग्णाच्या शरीरावर ताण पडणारच असतो. हे ताणतणाव घेण्याची रुग्णाची क्षमता तपासून पाहावी लागते, त्यानंतर निदानीय चाचण्यांची व उपचारांची आखणी करता येते. याची सुरुवात रुग्णाच्या वयापासून होते. सत्तरी ओलांडलेल्या रुग्णास कर्करोग झाल्यास त्याची गंभीरता जास्त असते. मधुमेह, हृदयविकार, स्थूलपणा, एड्स, अतिरक्तदाबाचा विकार, पक्षाघात अशा विकृती असलेल्या रुग्णाला कर्करोग झाल्यास त्या गंभीरतेत आणखी भर पडते. उपचारांचे यशही झाकोळते. रुग्ण जर रुग्णशय्येला खिळून असेल आणि त्याला कर्करोग झाला, तर परिस्थिती बिकट असते. रुग्णाचे वय कमी असेल, त्याला इतर रोग व व्यसने नसतील, तर कर्करोगावरील उपचार यशस्वी ठरण्याचे प्रमाण वाढते.
विज्ञानात मोजमाप करण्याला महत्त्व असते. कारण याचा उपयोग शिस्तबद्ध पद्धतीने उपचार योजण्यात होत असतो. कारनोफस्की नावाच्या तज्ज्ञाने कर्करोगावरील उपचार सुरू करण्याआधी रुग्णाच्या शारीरिक स्थितीचे मोजमाप करणारे एक कोष्टक तयार केले आहे. ते वापरून रुग्णाच्या शारीरिक स्थिती व क्षमतांबद्दल अंदाज बांधता येतो. जी व्यक्ती नॉर्मल आहे व इतर कोणतीही विकृती नाही, अशा व्यक्तीत कर्करोगाचे निदान होते. अशा रुग्णाला शंभर गुण दिले आहेत. जो रुग्ण रुग्णशय्येला खिळून आहे व त्याच्यावर कर्करोगावरचे उपचार करावयाचे आहेत, अशा रुग्णाला दहा गुण दिले आहेत. दहा व शंभर गुणांमध्ये शारीरिक स्थितीची वििवध स्तरांत विभागणी केलेली आहे. त्यानुसार रुग्णाच्या उपचारांचा अराखडा तयार करायचा असतो. प्रत्येक कर्करुग्णावरचे उपचार हे व्यक्तिनिष्ठ असतात, हा कळीचा मुद्दा. रुग्णाला निरनिराळे प्रश्न विचारून व त्याची शारीरिक तपासणी करून हे स्तर ठरवले जातात. रुग्णाला उपचार लवकरात लवकर सुरू व्हावे, असे वाटत असते. डॉक्टर यात कशाला वेळ घालवत आहेत, असे वाटण्याची शक्यता असते. पण रुग्णाला ही सगळी माहिती दिली म्हणजे त्याची चिंता कमी होते.
काही रुग्णांची शारीरिक स्थिती खराब असते, कर्करोग बळावलेला असतो, अशा वेळी कर्करोगाचे निदान झाल्यास ‘पॅलिएटिव ट्रिटमेंटचा’ उपाय योजावा लागतो. ‘पॅलिएटिव ट्रिटमेंट’ म्हणजे वेदना व चिंता दूर करण्याचे उपाय योजणे. रोग बरा करणे शक्य नसले तरी रुग्णाचे जीवन सुसह्य करणे, हाच या उपचारांचा उद्देश असतो. मॉर्फिनपासून वेदनादायी मज्जातंतू बधीर करणारे उपाय योजावे लागतात. डाॅक्टरने रुग्णाचा हात हातात घेऊन त्याला धीर देणे, हा पॅलिएशनचा महत्त्वाचा भाग असतो. ‘पॅलिएटिव मेडिसिन’ ही नूतन शाखा आहे. वेल्समधील कार्डिफ विद्यापीठातील पॅलिएटिव मेडिसिनच्या प्राध्यापिका डॉ. इलोरा फिन्ले यानी ‘मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करणे, हे पॅलिएशनचे सूत्र आहे’ या आशयाचे मार्गदर्शक विचार मांडले आहेत. dranand5@yahoo.co.in