आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, अशी आकडेवारी लॅन्सेट, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन यांसारख्या जागतिक विज्ञान पत्रिकांतून सतत प्रकाशित होत असते. तेव्हा कर्करोग विज्ञान या शाखेचा परिचय करून घेणे गरजेचे ठरते.
आँकॉलॉजी म्हणजे, कर्करोग विज्ञान. आँको फिजिशियन म्हणजे निदान करून केमोथेरपी देणारे तज्ज्ञ डॉक्टर. आँकोसर्जन म्हणजे कर्करोग शस्त्रक्रियातज्ज्ञ-शल्यचिकित्सक. आँको पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कर्करोगाची सूक्ष्मदर्शकातून तपासणी करणारे विकृतितज्ज्ञ. रेडिओथेरपिस्ट म्हणजे कर्करोगावर क्ष-किरणाने उपचार करणारे क्ष-किरणतज्ज्ञ. ढोबळमानाने कर्करोग विज्ञानाचे हे विभाग आहेत. याच्या उपशाखा आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे.
कर्करोगाच्या निदानाभोवती भीतीचे वलय असते. कर्करोगाचे निदान रुग्णाला सांगणे, हे डॉक्टरांनाही कठीण जाते. दोनशे प्रकारचे कर्करोग आहेत. ते सगळेच काही धोकादायक नाहीत. त्यामुळे कोणता कर्करोग झाला आहे, हे समजावून घेणे महत्त्वाचे असते. कर्करोगाचे निदान ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. डॉक्टरांनी तपासले आणि निदान केले, असे होत नाही.
निदानासाठी एक्सरे, विविध प्रकारचे स्कॅनिंग, रक्तचाचण्या झाल्यानंतर कर्करोगाचे प्राथमिक निदान होते. समजा, कर्करोगाची गाठ असेल तर ती शस्त्रक्रियेने काढल्यानंतर त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी होते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे, त्या गाठीची जनुकीय चाचणी करावी लागते. त्या जनुकीय चाचणीनंतर संपूर्ण निदान होते. हे सगळे सोपस्कार कशासाठी करायचे, असा प्रश्न पडणे साहजिक असते. कर्करोगाच्या जनुकीय चाचण्यांमुळे त्या कर्करोगात कोणते विशिष्ट जनुक आहेत, ते कळते. त्यावर केमोथेरपीसाठी कोणती औषधे वापरायची, क्ष-किरण थेरपी द्यायची की नाही, हे ठरवता येते. कर्करोगावरील उपचार हे व्यक्तिनिष्ठ असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक कर्करोगाचा रुग्ण हा वेगळा असतो. या कर्करोगाचा पुढील ओघ त्या विशिष्ट रुग्णात कसा राहणार आहे, यावर या सर्व चाचण्या प्रकाश टाकतात.
हा रुग्ण अॅडव्हान्स्ड स्टेजचा आहे, याच्या कर्करोगाची नुकतीच सुरुवात झाली आहे, अशी बोलणी आपण ऐकतो. याचा अर्थ काय, हे समजून घेतले पाहिजे. अनिर्बंध वाढ होणे हा कर्करोगाचा महत्त्वाचा अवगुण. बांडगुळाप्रमाणे कर्करोग वाढतो, शरीरभर फैलावतो, आणि शरीर खंगवून टाकतो. पण, हे सगळ्याच कर्करोगांच्या बाबतीत घडतेच, असे नाही. भारतात कर्करोगामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, रुग्ण कर्करोगतज्ज्ञाकडे फार उशिरा जातात. गैरसमजुती, अज्ञान, भीती अशा अनेक कारणांमुळे रुग्ण रोग अंगावर काढतो. ब-याच वेळेस झाडपाल्याचे उपाय, अंगारेधुपारे करतो. अशा दिरंगाईमुळे रुग्ण रोग बळावलेल्या अवस्थेत कर्करोगतज्ज्ञाकडे पोहोचतो. अशा वेळी केलेल्या उपचारांचा व्हावा तसा परिणाम होत नाही.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग हे महिलांचे कर्करोग. या कर्करोगाची लक्षणे ओळखणे सर्वसामान्यांसाठी आधीच कठीण असते. त्यात भारतीय महिला बहुविध कारणांमुळे डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. रोग बळावतो; उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. कर्करोगावरचे उपचार प्रभावी ठरण्यासाठी कर्करोगाचे योग्य व अचूक निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे असते, हा कर्करोगविज्ञानातील कळीचा मुद्दा आहे. कर्करोगविज्ञानाची माहिती समाजात सर्वदूर असेल, तर कर्करोगाबद्दलची योग्य जाण त्या समाजातील व्यक्तीला होत असते, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. धूम्रपानामुळे होणारा कर्करोग, तंबाखूमुळे होणारे तोंडाचे कर्करोग अशा रोगांची सचित्र माहिती शासकीय तसेच मोठ्या रुग्णालयांतून, दृक्श्राव्य माध्यमांतून समाजात पसरते. ते अत्यंत जरुरीचे म्हणून महत्त्वाचे असते. यामुळे विशिष्ट कर्करोगाची माहिती मिळते; पण कर्करोग विज्ञान म्हणजे काय, हे समजत नाही. कर्करोग विज्ञानातील संकल्पना समजल्या म्हणजे कर्करोगाबाबतच्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होते. कर्करोग इतर रोगांपेक्षा कसा निराळा आहे, हे समजते. कर्करोगावरील औषधोपचाराची योग्य माहिती मिळते.
पाश्चात्त्य विकसित देशांत कर्करोगाचे प्रमाण 1992 पासून दरवर्षी दोन टक्के याप्रमाणे कमी होत आहे. आज इंग्लंडमध्ये निदान झालेल्या कर्करोग रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण यशस्वी उपचाराने बरे होतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात कर्करोगाचा पुन्हा उद्भव होत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात याच्या उलट स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी अनेक उपाय आहेत. कर्करोग विज्ञानाची आधुनिक वैद्यकीय माहिती देणे, हा एक महत्त्वाचा उपाय. पुढील काही लेखांतून अशी माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
dranand5@yahoo.co.in
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.