आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Career Opportunity In History By Kiran Jog

इतिहासातील करिअर: मानवी संस्कृतीच्या अभ्यासाचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. अनेक राजघराणी, त्यांचा राजकीय संघर्ष, युद्धे, सामाजिक व आर्थिक संरचना, परकीय आक्रमणे, आर्थिक उलाढाली, भौगोलिक स्थिती अशा शेकडो गोष्टी इतिहास या सदरात येतात. इतिहास म्हणजे फक्त इसवी सनांचे पाठांतर नाही तर इतिहासाचा त्या त्या राजवटींची स्थिती, त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण विविध अंगांनी सांगतो. आपल्याकडे आर्टस् चे विद्यार्थी, विद्यार्थिंनी सोडून इतर कोणी या विषयाकडे वळत नाहीत. पण जर तुम्हाला इतिहासाचे प्राध्यापक-शिक्षक व्हायचे असेल वा नागरी सेवा परीक्षांसाठी इतिहास हा विषय घेऊन बसायचे असेल, वा भारत इतिहास संशोधन संस्थेत वा लंडन स्कूल ऑफ हिस्ट्री वा रशियन हिस्टॉरिकल स्टडीजसारख्या संस्थेत रिसर्च असिस्टंट म्हणून काम करायचे असेल किंवा युनायटेड नेशन्ससारख्या संस्थेत ‘इतिहास’ संदर्भात काम करायचे आहे वा उत्तम संशोधक/ लेखक पत्रकार व्हायचे आहे. तर १० वी नंतर ५ वर्षे + २ वर्षे (एमए) इतिहास या विषयात अभ्यास करा.

कुठे प्रवेश घ्याल ? : मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, कोल्हापूर येथील वा महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयात आपण प्रवेश घ्या.

किती वर्षे शिक्षण? : इतिहासात बीएपर्यंत ११ वीपासून आपण ५ वर्षे शिक्षण घेऊ शकता वा एमए करायचे असेल तर आपणास आणखी दोन वर्षे म्हणजे १० वीनंतर किमान ५ वर्षे पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. तसेच GRE-TOEFL या परदेशी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देऊन
दोन दोन/तीन वर्षे बाहेरील देशात जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेता येईल.

फी किती पडेल : खर्च? : अनुसूचित जाती वा जमाती प्रवर्गासाठी किंवा ओबीसींसाठी सर्व शासकीय मान्यताप्राप्त महाविद्यालयात आपणास मुबलक ८०-९० टक्के शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाशी वा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधणे उचित ठरेल. एरवी रु. २ लाख रुपयांत (फी भरून) ७ वर्षांचा (एमएपर्यंत) खर्च आहे.

सर्वात उत्तम ठिकाण कोणते? : भारतात तसेच इतर देशात या विषयात अनेक शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. लंडन येथील इतिहास संशोधन संस्था तर प्रसिद्ध आहे.

नोकरीच्या संधी किती आहेत? : १९९० नंतरच्या आर्थिक उदारीकरणानंतर गेल्या २५ वर्षांत अर्थकारण, समाजकारण व अर्थकारण या विषयात सर्व जगभर मूलभूत संशोधन सुरू आहे. त्यामुळे आता नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. सर्व राज्यांनी व देशांनी त्यांचे इतिहास (रिसर्च) अनुबंध स्थापन केले आहेत. त्यामुळे संशोधन, वाचन अध्ययन यांत नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

अॅडमिशन कसे घ्यावे? : अभियांत्रिकीकरण वा इतर सायन्स संबंधात जे कोर्सेस आहेत. त्यात अॅडमिशन जसे अवघड आहे, तसे इतिहास या विषयात नाही. कोणत्याही कॉलेजात केवळ सध्या प्रवेश फॉर्म भरून आपण ११ वीत वा १२ वीच्या पुढे अॅडमिशन घेऊ शकता. त्यासाठी प्रत्येक वर्षी ६ पेपर्स आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, युद्ध, पर्यावरण इत्यादींचाही यात अभ्यास येतो. अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी स्वभावाचे प्रतिबिंब इतिहासात पडते आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास आहे आणि कालचा इतिहास हा त्या शतकातला वर्तमानकाळच होता. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास हा मानवी संस्कृतीचाच अभ्यास आहे.