आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरी डिझायनिंग कल्पकता, अचूकता आणि एकाग्रता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दशकांपासून ज्वेलरी डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून भारताकडे बघितले जाते. हजारो कोटींची उलाढाल असणारे, भरघोस परकीय चलन मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. सोने आयातीत जागतिक अर्थव्यवस्थेत अव्वल स्थानावर असणा-या भारतात ज्वेलरी डिझायनिंगला सोन्याचे दिवस न येतात तरच नवल. त्यातच शुद्ध सोन्यासोबत, जेम्स-स्टोन्समधली गुंतवणूकही वाढते आहे. गुंतवणूक आणि दिखाव्यापलीकडे आजकाल प्रतिभेला, व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारे, शोभेल असे फॅशनेबल दागिने वापरणे, त्यासंदर्भातील स्टाइल आयकॉन बनण्याच्या इच्छेमुळेही दागिने खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळेच फॅशनेबल, ऑकेजनल, कॉस्च्युम ज्वेलरीला मागणी वाढते आहे. पर्यायाने ज्वेलरी डिझायनरलाही. पूर्वीच्या काळी विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असलेली ज्वेलरी डिझायनिंगची ही कला. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे वारसारूपाने या कलेचा प्रवास होत असे. याबाबतीतले बारकावे, टिप्स हे अक्षरश: एक गुपितच असायचे. मात्र, तांत्रिकदृष्ट्य उच्च प्रशिक्षित लोकांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली. पारंपरिक कलेला व्यावसायिकतेचे रूप मिळाल्यामुळे या कलेने अनेकांना कल्पक करिअरचं प्रवेशद्वारं उघडलं.

ज्वेलरी डिझायनर म्हणजे काय?
आजूबाजूच्या परिस्थितीचं कल्पकतेने केलेलं निरीक्षण, हे निरीक्षण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता, नेमकेपणा, दागिन्यांसंदर्भातील अचूक ज्ञान तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्कीच उत्कृष्ट ज्वेलरी डिझायनर होऊ शकता. त्याचबरोबर सर्वाेत्कृष्ट डिझाइन निर्मितीसाठी झपाटून जाऊन काम करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय डिझायनिंगचा सेन्स, संबंधित ट्रेंडचे बारकावे, त्यातले बदल, कल्पकता, टेक्निकली साउंड असणं, स्थानिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या क्षेत्रातल्या ट्रेंडचा अभ्यास असणं, त्याबद्दल अपडेट असणं या डिझायनर होण्यासाठीच्या आणखी काही मुख्य अटी आहेत.

कसं होतं ज्वेलरी डिझायनिंग?
दागिन्याचं डिझाइन प्रत्यक्षात घडवताना विविध टप्पे असतात. आधी दागिन्याचं डिझाइन कागदावर तयार केलं जातं. नंतर संबंधित दागिना विशिष्ट उद्देशासाठी म्हणजे फॅशन शो, विवाह सोहळा अशा काही खास प्रसंगासाठी बनवायचा असेल तर ग्राहक अथवा उत्पादकांशी चर्चा केली जाते. त्यानंतर संगणकावर त्याचे संकल्पचित्र तयार केले जाते. नंतर संगणकाच्या साहाय्याने दागिन्याच्या डिझाइमधील व्हरायटी, रंगसंगती ठरवली जाते. डिझाइन फायनल केले जाते. अलीकडच्या काळात दागिन्यांच्या डिझायनिंगसाठी संगणकाची मदत घेतली जाते. यामुळे डिझायनिंगमध्ये वैविध्यता, वेळ, श्रमाची बचत होते. ग्राहकांना किमतीच्या दृष्टीनेही ते परवडणारे असते.

सीमापार ज्वेलरी डिझाइन
पूर्वी देशातल्या वेगवेगळ्या भागांत स्थानिक कारागिरांनी डिझाइन केलेले दागिने मिळायचे. जसे महाराष्ट्रातली ठुशी, मोहनमाळ, कोल्हापुरी साज, तर राजस्थानकडचे टेवटा, कडा-पत्ती इ. मात्र आता ज्वेलरी डिझायनिंगनेही सीमोल्लंघन केले आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. आजकाल पुरुषवर्गही स्टेटस सिम्बॉल म्हणून दागिने वापरतात. सीमोल्लंघनामुळे नावीन्याची आवड असणा-या चाहत्यांसाठी देश-विदेशातील पारंपरिक डिझाइनचे दागिनेही भारतात मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे भारतातले अनेक डिझाइनर फ्यूजन दागिनेही तयार करतात. विविध प्रांतांमधली संस्कृती, लोकपरंपरा, स्थानिक वैशिष्ट्यांची झलक अशा फ्यूजन दागिन्यांमध्ये पाहावयास मिळते. देशाच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाचा वाटा उचलणा-या ज्वेलरी डिझायनिंगने आंतर-संस्कृती मिलाफही साधला आहे.

ज्वेलरी डिझायनिंगमधील संधी
केवळ दागिने बनवणं, विकणं एवढ्यापुरतंच हे क्षेत्र मर्यादित नाही. ज्वेलरी डिझायनिंगसंदर्भातली पार्श्वभूमी असणे हे या क्षेत्रात दीर्घकालीन करिअरच्या दृष्टीने फायद्याचे आहे. कोर्स संपल्यावर नामांकित संस्थेत इंटर्नशिप करता येते. शिवाय ज्वेलरी डिझायनिंग हाऊस, एक्स्पोर्ट हाऊस (आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझायनिंगची संधी), फॅशन हाऊस, स्वयंरोजगार, फ्रीलान्स डिझायनिंग (मागणीनुसार दागिन्यांचे डिझायनिंग करून देणे), स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणे अशा अमर्याद संधी या करिअरमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमधून प्रशिक्षित ज्वेलरी डिझायनर्सला खूप मागणी आहे. ज्वेलरी डिझायनिंगच्या करिअरला सध्या आहेत तितके सोनेरी दिवस कधीही नव्हते. इथला अनुभव, कामातला अचूकपणा जितका जास्त तितके जास्त वेतन तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर फ्रीलान्सिंग करणार असाल तर वेतन मिळण्याला सीमा नसते. ते अर्थात कल्पकता आणि कौशल्यावर अवलंबून असते.

प्रशिक्षण देणा-या संस्था
प्रशिक्षित कारगिराच्या हाताखाली डिझायनिंग शिकणे ही ज्वेलरी डिझायनिंगची प्राथमिक पायरी. मात्र, सध्या डिझायनिंगचे शास्त्रशुद्ध शिक्षण देशातल्या विविध संस्थांमधून दिले जाते. या संस्थांधून दागिन्यांचे प्रकार, स्टोन कटिंग, स्टोनचा दर्जा ओळखणे, दागिन्यांची रंगसंगती, डिझायनिंग थीम्स, दागिन्यांचे प्रेझेंटेशन-फ्रेमिंग, स्वतंत्र-सुटे दागिने तयार करणे, पुरुषांचे दागिने, कॉस्च्युम ज्वेलरी, ज्वेलरी कास्टिंग इ. प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी उमेदवाराला अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखतीला सामोरे जावे लागते. विशेष शैक्षणिक पात्रतेची अट या कोर्ससाठी नाही. तरी डिप्लोमा कोर्ससाठी पदवी, शॉर्ट टर्म कोर्ससाठी दहावी किंवा बारावी अशी किमान अट आहे. डिस्टन्स एज्युकेशन माध्यमातूनही ट्रेनिंगची सुविधा आहे. पुढील संस्थांमधून ज्वेलरी डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले जाते -

* द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई
* मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मॅनेजमेंट, कर्नाटक
* जे. डी. इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबई-दिल्ली
* जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई
* इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, मुंबई
* धियॉन इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाइन, पुणे
* आर्च अकॅडमी ऑफ डिझाइन,जयपूर
* सिंहगड स्कूल ऑफ जेमॉलॉजी आणि ज्वेलरी डिझाइन, पुणे
* नॉर्थईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, गुवाहाटी
* श्री चांद शिल्प शाळा, जयपूर.