आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Caste Reality In India By Gajoo Tayde

जातीच्या नव्या भिंती !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैतिक संकटाच्या काळातही जे आपली तटस्थता कायम राखतात त्यांच्यासाठी नरकातल्या सर्वात काळोख्या जागा राखीव असतात.
-(दांतेच्या ‘इन्फर्नो’मधून)
नामदेव ढसाळ गेल्याची बातमी आली आणि त्यांच्यासंबंधीच्या पोस्ट्सनी फेसबुकावरच्या अनेक भिंती भरून गेल्या. बहुतांशी पोस्ट्स ढसाळांना आदरांजली वाहणा-या होत्या. काहींनी त्यांच्या कविता, फोटो शेअर केले, कुणी त्यांच्या वैयक्तिक आठवणी जागवल्या, कुणाला त्यांचा पँथरावतार आठवला, कुणाला आणखी काही. मात्र जवळपास सगळ्या पोस्ट्समध्ये आपण काहीतरी चांगलं हरवल्याची खंत जाणवत होती. अनेकांनी या पोस्ट्सवर भरपूर प्रतिसादही लिहिले. सगळ्यांनाच काही तसं करायचं नव्हतं. त्यांनी ‘ढसाळ’ विषयावर मौन बाळगणंच पसंत केलं. ‘आपण काहीच म्हटलं नाही तर प्रतिगामी तर ठरवले जाणार नाही ना?’ या भीतीपोटीही काहींनी जुलमाच्या श्रद्धांजल्या वाहून घेतल्या.
...दोन-तीन दिवस सरले. तळमळीचे कार्यकर्ते पुन्हा आपले पाने, फुले, पक्षी, नक्षी, कविता, फोटो वगैरे जुन्या ‘रूटीन मोड’मध्ये गेले आणि मग मळमळीच्या कार्यकर्त्यांना जाग आली. हळुच्चकन् काहींनी ‘कोण ढसाळ? त्यांचे कर्तृत्व काय? ते व्यक्तिश: कसे होते?’ इथपासून ते ‘कोण बुवा हे ढसाळ? मला तर त्यांचं नावही माहीत नाही’ पर्यंतच्या पोस्ट्सनी आपल्या भिंती चितारणं सुरू केलं.
वरवर साळसूद; मात्र प्रत्यक्षात जाणीवपूर्वक चिमटा काढणा-या अशा पोस्ट्सनी साहजिकच अनेक जण दुखावले गेले आणि त्यांनी कडाडून प्रतिहल्ला चढवला. हा हल्ला अगदीच अनपेक्षित नव्हता; पण तो इतक्या ताकदीनं होईल, अशी कुणी अपेक्षा केली नव्हती. काही पोस्टकर्ते गांगरले आणि त्यांनी ‘नसतं लचांड नको’ म्हणून अशा पोस्ट्स आपापल्या भिंतीवरून नाहीशा केल्या.
कातडीबचाऊ धोरण ठेवत विद्वेष पसरवण्यासाठी यातल्या काही पोस्ट्सनी मग आधार घेतला तो फेसबुकवर अस्तित्वात असलेल्या काही समूहांचा. ‘खुल्या’ समूहावर स्टेटस टाकले तर ‘कुणीही यावे, टपली मारून जावे’ असा प्रकार; शिवाय पुरोगामित्वाचा बुरखा टर्रकन् फाटला जाण्याची भीती! मग पर्याय उरला तो ‘बंदिस्त’ अथवा ‘गुप्त’ समूहाचा. (‘ओपन’ आणि ‘क्लोज’ या संज्ञा मटक्यात असतात तशाच फेसबुक समूहांवरही असतात. शिवाय ‘सिक्रेट ग्रुप’ हा प्रकारही असतो. त्यावर ऐ-यागै-याला प्रवेश नसतो. रोटरी, लायन्स अशा ‘एलिट’ क्लब्जप्रमाणे त्याचे आमंत्रण यावे लागते.)
विषाक्त पोस्टवर काहीच अ‍ॅक्शन न घेणा-या, सेन्सॉरशिपला विरोध असणा-या समूह संचालकांनी पोस्टच्या निषेधात प्रतिक्रिया देणा-या काही सदस्यांवर मात्र सेन्सॉरशिप लादली आणि त्यांना समूहातून बाहेर केले.
प्रकरण आणखीच चिघळले. एकतर्फी कारवाईमुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी हा वाद मग समूहाबाहेर वैयक्तिक भिंतीवर आणला. दोन-चार दिवस प्रचंड घमासान झाले आणि एका रात्री आता आपल्याला त्या समूहावर प्रवेश बंद झाल्याचा साक्षात्कार तिथल्या अनेक सदस्यांना झाला. ‘क्लोज्ड ग्रुप’चं रूपांतर ‘सिक्रेट ग्रुप’मध्ये झालं होतं!
****
ही घटना नुकतीच ‘फेसबुक’वर घडलेली असली तरी ती प्रातिनिधिक आणि एकूणच काही नेटिझन्सच्या ‘यत्ते’वर पुरेसे भाष्य करणारी आहे. प्रत्यक्ष जीवनात ज्या जात-धर्म-वंश-वर्ण आदी भेदांमुळे भारतीय समाजमानस लिडबिडलेले आहे, त्याचंच प्रतिबिंब नेटवर काही सोशल ग्रुप्स, कम्युनिटी पेजेस, ब्लॉग्ज वगैरेंमधून अधिक गडद, भेसूर, बीभत्स होऊन पडलेलं आहे; हे नेटवर थोडाफार वावर असलेल्या कुणाही सजग व्यक्तीच्या सहज लक्षात येण्यासारखं आहे. समाजातलं जातवास्तव नाकारणं म्हणजे मांजरानं डोळे मिटून दूध पिण्याचाच प्रकार आहे.
फेसबुकवर (मी इथे वारंवार ‘फेसबुक’ हा शब्द वापरत असलो तरी त्यात इतर सोशल साइट्स समाविष्ट आहेत, असे धरून चालावे.) प्रवेशासाठी, सहभागासाठी पात्रतेचे, गुणवत्तेचे निकष नसल्याचा फायदा असा झाला, की इथे सर्वांना मुक्तद्वार लाभले. यामुळे जात-धर्म-वंश-वर्णातली दरी बुजली, असे वरवर पाहता भासले, तरी तसे समजणे पूर्णांशानं बरोबर ठरणार नाही. जो-तो इथे येताना आपापली मूळ मानसिकता आणि वैचारिक बैठक, गंड वगैरे सोबत घेऊनच येतो. इंटरनेटनं भौगोलिक अंतरं तोडली असली, तरी मानसिक अंतरं किती पार करता आली, याबद्दल शंका घेण्यास पूर्ण वाव आहे.
मराठी मंडळीपुरतं पाहिलं तर, ‘शेंबवणे बुद्रुक’ गावचा तरुण शेतकरी ते परदेशी राहूनही आपल्या ‘संस्कृती’च्या नावानं व्याकूळ होणारे अत्युच्चशिक्षित भारतीय, अशी ही विशाल रेंज आहे. अनेक टाइम झोन्स व्यापणारी. या विविध टाइम झोन्समुळे ‘फेसबुक’च्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. कुणाची ना कुणाची उपस्थिती तिथे सर्वकाळ असते. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’चा इथे सतत प्रत्यय येत असतो. फेसबुक नवं नवं असताना त्याचा मधुचंद्राचा काळ मोठा बहारदार, गुलगुलीत, गोग्गोड वगैरे होता. अनेक संसारांमध्ये पुढच्या काळात होते तशी निबरपणाची, आंबूसपणाची लागण इथेही झाली. तीच ती पाने-फुले-पक्षी-नक्षी-कविता-फोटो वगैरे कंटाळा आणू लागले. काही काळातच चाणाक्ष लोकांनी या माध्यमाची ताकद ओळखली. अत्यंत कमी वेळात, विशेष सायास किंवा खर्च न करता स्वत:ला, स्वत:च्या व्यवसायाला, विचारसरणीला, धारणा-धोरणांना इथे सहज ‘प्रमोट’ करता येतं, हे त्यांच्या लक्षात आलं. यातल्या बहुतेकांचे उद्देश चांगले आणि विधायकच होते आणि आहेत, हे आवर्जून सांगावं लागेल.
पण समाजविघातक जातीय शक्तींनाही यामुळे फार मोठे पाठबळ मिळाले. जातिधर्मातल्या भेदांना खतपाणी घालून द्वेषाचं पीक काढू पाहणारांना छान मशागत केलेली भूमी आयतीच मिळाली. सर्वधर्मीय मूलतत्त्ववादी, उच्चवर्णीय, बहुजन, दलित, अमुकवादी, तमुकवादी, अलाणी सेना, फलाणी संस्था, ढिकाणी ब्रिगेड अशा विखारी, जातिधर्मभेद पसरवून, आग लावून तीवर आपली भाकर भाजणा-या संस्थांचा फेसबुकवरही प्रादुर्भाव झाला.
काहींनी वातावरणात वैचारिक विष पत्करण्याचे कार्य वैयक्तिक पातळीवर स्वीकारले. ब-याच जणांनी यातही आपली खरी ओळख कळू नये म्हणून खोटी नावे, खोटे चेहरे धारण केले. काही ‘थेट झुंजाया’ उभे ठाकले. काही लोकांनी विखार पसरवण्यासाठी शब्दांहूनही प्रभावी ठरणारे चित्र, फोटो, व्हिडिओज वगैरे दृश्य माध्यम निवडले. असे साहित्य निर्माण करून ते फेसबुकवर टाकले जाऊ लागले. यातले बरेचसे खरे तर काही ‘डॉक्टर्ड’ म्हणता येईल असे.
‘फोटोशॉप’सारखी किंवा ‘फिल्ममेकर’सारखी सॉफ्टवेअर्स वापरून कुणीही किमान कौशल्य असलेली व्यक्ती हे करू शकते. (उदाहरणादाखल पाकिस्तानात भारतीय झेंड्याचे दहन झाले असता, ते पार्श्वभूमी बदलून भारतात असल्याचे दाखवणे.) अशा गोष्टी ‘हा-हा’ म्हणता ‘व्हायरल’ होतात. त्यांना ‘शेअर’ आणि ‘लाइक’ करणा-यांचा आकडा पाहिला, तर कुणाही थोडीफार संवेदना शिल्लक असलेल्याचे डोळे फाटतील. ‘सायबर क्राइम सेल’ वगैरे वगळता या पोस्ट्सचा उगम कधीच सामान्य लोकांना कळत नाही. त्यांच्यासाठी हे सगळे ‘अपौरुषेय’च असते. काही साळसूद वाटणारे लोक राजकारण, समाजकारण, इतिहास, साहित्य, कला, क्रीडा आदींचा आधार घेत छुपेपणाने आपला जातीयवाद मांडत असतात. यातले बरेचसे स्वघोषित विद्वान, इतिहास संशोधक, सामाजिक संशोधक वगैरे असतात. ते आपल्या मांडणीच्या पुष्टीसाठी हवे तेवढे दाखले देतात, ऐतिहासिक साधनांचे स्वत:ला हवे तसे अन्वयार्थ लावतात. वर गुगल, विकीच्या लिंक्सही देतात.
‘जे छाप्यात येते ते खरेच असते’ अशा मानसिकतेतून अजूनही बाहेर न आलेले या विद्वत्तेनं दिपून जातात आणि खोट्यालाही खरं मानू लागतात. एक वेळ आक्रस्ताळेपणाने विद्वेषी लिहिणारे परवडले; कारण त्यांची भूमिका स्पष्ट दिसते. त्याचा प्रतिवाद करता येतो (अर्थात, हे प्रतिवाद लवकरच अत्यंत हीन, विखारी पातळीवर उतरतात, हा भाग आहेच.) पण हे छुपे लोक अधिक खतरनाक असतात. सामान्य व्यक्तीला सहज लक्षात न येणारे शब्दबंबाळ वकिली पॉइंट्स टाकण्यात हे तरबेज असतात आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करतात. अशा एखाद्या जातीय आगलाव्या पोस्टवरच्या प्रतिक्रिया वाचणे अतिशय उद्बोधक ठरावे. संयत, नेमक्या, मोजक्या शब्दांतल्या प्रतिक्रिया; विनोद, उपहास आदींचा आधार घेऊन केलेल्या, मार्मिकपणे मुद्दा पोहोचवणा-या, अज्ञानमूलक, अट्टहासी प्रतिक्रियांखेरीज, ‘हम’री-‘तुम’रीवर येणा-या, ‘च’, ‘भ’, ‘झ’च्या बाराखडीचे यथेच्छ उपयोजन करून व्यक्तिगत अवमान करणा-या प्रतिक्रिया, मुद्द्याशी सुतराम संबंध नसणा-या शब्दबंबाळ प्रतिक्रिया एकाच पोस्टवर वाचायला मिळतात. काही नर्मदेतले गोटे प्रतिक्रिया न देता कुंपणावर उभे राहून नुसती गंमत बघत असतात, तर काही जण स्वत:कडे ‘चिअरगर्ल्स’ची भूमिका घेऊन सगळ्यांना ‘लाइक’ करून चिअर-अप करत असतात. अशा वादांची परिणती अनेकांना ‘अनफ्रेंड’ किंवा ‘ब्लॉक’ करण्यात होते.
वास्तवातल्या दहशतवाद्यांचे असतात, तसेच आभासी दहशतवाद्यांचेही ‘स्लीपिंग सेल्स’ असतात. यांनी आपल्या मित्र-यादीत आधीच प्रवेश केलेला असतो. त्यांचा एरवीचा वावर अगदी संभावित असतो. हे बराच काळ ‘सुप्त’ असतात आणि एखाद्या प्रसंगाचे, दिनविशेषाचे, घटनेचे औचित्य (?) साधून अचानक कार्यान्वित होतात. गांधी पुण्यतिथीलाच नेमके हे लोक गांधींवर अर्वाच्य टीका आणि नथुरामची भलामण करतात. एखाद्या मुस्लिम धर्मगुरूचा मृत्यू झाला की त्याच्यावर, इस्लामवर, मुस्लिमांवर प्रचंड विखार ओकतात. आंबेडकर जयंतीलाच हे लोक नेमका ‘रिडल्स’ किंवा नामांतराचा वाद उकरून काढतात. रामनवमीलाच यांना नेमकी अरुण कांबळेंच्या ‘रामायणातील संस्कृतिसंघर्ष’ची आठवण होते किंवा ‘बाबरी मशीद’ आठवते. जातीय-धार्मिक विद्वेष पसरवणारे सर्वच जातिधर्मांत आहेत, याचा विषाद वाटून घ्यावा की आनंद, हेच कळेनासे होते. ख-या अर्थाने कुणीही सुजाण शासक नसलेल्या अशा या संभ्रमित, अनागोंदीच्या आभासी वातावरणात सहज, एकोप्याने राहून व्यक्त होऊ इच्छिणारांची अगतिकता, कुंठितावस्था समजण्यासारखी आहे. असे लोकच जास्त संख्येने आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. मग अशांनी काय करावे? स्वत:चे डोके शाबूत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, कोणत्याही वादात लगेच प्रतिक्रिया देण्याचा उतावीळपणा करू नये. स्वत:च्या विवेकाला स्मरून, शाश्वत सामाजिक शांततेसाठी ‘सम्यक’ दृष्टिकोनातून मत प्रकट करणे आपल्या नक्कीच हातात आहे. ‘मला काय पडलंय?’ म्हणून तटस्थ-बिटस्थ राहण्यात काहीच अर्थ नसतो. कारण त्यामुळे अखेरीस सर्वधर्मजातीयवाद्यांचेच फावते, हे कायम लक्षात ठेवणे आज कधी नव्हे ते - आपल्या आजच्या आणि भावी पिढ्यांच्या व्यापक हितासाठी - गरजेचे झाले आहे.
gajootayde@yahoo.com