आजकाल ब-याच रुग्णांना आढळून येणारी व्याधी म्हणजे सायटिका होय. बदलती जीवनशैली किंवा चुकीच्या विहार शैलीतून निर्माण झालेला व्याधी म्हणजे सायटिका. प्रत्येक गोष्टीमागे काही कारणमीमांसा असते, या व्याधीला सायटिका हे नाव असण्यामागेही अशीच शास्त्रीय कारणमीमांसा आहे. सायटिका नर्व्हज् नावाचा चेतातंतू हा या व्याधीमध्ये प्रामुख्याने प्रभावित झालेला घटक असतो त्यामुळे त्याला सायटिका असे म्हटले जाते. आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या गृध्रसी या व्याधीशी याचे साधर्म्य सांगता येते. आयुर्वेदात गृध्रसीची परिभाषा करताना सांगितले आहे की, ‘‘गृध्रवत् चलते यस्मिन् इति गृध्रसी ।’’ अर्थात ज्या व्याधीमध्ये रुग्णाची चाल ही गृध्रव् अर्थात गिधाडाप्रमाणे होते त्याला गृध्रसी असे म्हटले जाते. गिधाड ज्याप्रमाणे चालते, अगदी त्याचप्रमाणे रुग्णाची चाल या व्याधीमध्ये झालेली असल्याकारणाने यास गृध्रसी असे म्हटले जाते.
चिकित्सा ...
रुग्णाचे व्याधीपरीक्षण करून रुग्णबल, व्याधीबल इत्यादी सर्व बाबींचा सारासार विचार करून चिकित्सा केली जाते.
शोधन चिकित्सा...
पंचकर्म चिकित्सेतील स्नेहन, स्वेदन (नाडीस्वेद) कटिबस्ती इत्यादीचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. त्याचसोबत विविध औषधी द्रव्ये योग्य त्या प्रमाणात वापरून व्याधीवर पूर्ण विजय मिळवता येतो. काही विशिष्ट व्यायाम, योगासनांची जोड देऊन व्याधी बरा होण्यास निश्चितच मोलाची मदत मिळते.
सायटिका व्याधीची कारणे
१) दीर्घकालीन बैठी जीवनशैली. (उदा. सतत बैठे काम करणारी मंडळी)
२) सतत अथवा जास्त काळपर्यंत उभे राहणे. (उदा. बस कंडक्टर, पोस्टमन)
३) अतिप्रवास
४) वाढलेले वजन (परिणामी पायांवर पडणारा अतिरिक्त भार)
५) व्यायामाचा अभाव
६) कटिप्रदेश (कमरेच्या ठिकाणी) आघाताचा इतिहास)
७) पतनाचा (गाडीवरून अथवा उंचीवरून घसरून पडण्याचा इतिहास)
८) वयोमानानुसार अथवा व्याधी स्वरूपात्मक कमरेच्या ठिकाणी असणा-या मणक्यांची झालेली झीज.
व्याधीची लक्षणे...
ज्या बाजूचा पायाचा चेतातंतू (सायटिका नर्व्हज्) हा काही कारणास्तव क्षतिग्रस्त होतो त्या बाजूच्या पायात विशेषकरून ही व्याधीची लक्षणे तीव्रतेनुसार कमी-अधिक प्रमाणात जाणवू शकतात. असे की,
> कटिशूळ (कमरेच्या ठिकाणी वेदना) > पाय जड पडणे > पाय दुखणे (विशेषत: पार्श्व व मागील बाजूने) >पायाला मुंग्या आल्यासारखे वाटणे >पायाला बधिरता येणे. >दुखावलेल्या बाजूवर कमी जोर देऊन, दुस-या पायावर संपूर्ण भार असल्याने रुग्ण लंगडून चालतो.
व्याधीसंप्राप्ती...
उपरोक्त कारणांमुळे सायटिका नर्व्हज् नावाचा चेतातंतू जो कटिप्रदेशापासून खालच्या बाजूस पायाकडे संवेदना वहन करतो तो व्याधिग्रस्त होऊन या व्याधीची निर्मिती होते.