Home | Magazine | Pratima | article on channi singh by vikas naike

पाश्चिमात्यांत पंजाबी लोककला लोकप्रिय करणारे चन्नी सिंग

विकास नाईक | Update - Jul 27, 2012, 10:32 PM IST

कधी काळी ज्या ब्रिटिशांनी आपल्या भूमीवर राज्य केले त्यांच्याच देशामध्ये राहून ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिश एम्पायर मेडल अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी भारतीयांना सन्मानित करण्यात आले आहे

 • article on channi singh by vikas naike

  भारतीयांनी जगभरात आपल्या कर्तृत्वाने नाव कमावले आहे. कधी काळी ज्या ब्रिटिशांनी आपल्या भूमीवर राज्य केले त्यांच्याच देशामध्ये राहून ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिश एम्पायर मेडल अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी भारतीयांना सन्मानित करण्यात आले आहे.
  नुकतेच चन्नी सिंग यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर म्हणजेच ‘ओबीई’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1975 मध्ये पंजाबमधील एका छोट्या गावातून इंग्लंडमध्ये नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या चन्नी सिंग यांचे खरे नाव हरचरणजित सिंग. वडील भारतीय सैन्य दलात अतिवरिष्ठ अधिकारी होते. लहानपणापासून चन्नी सिंग यांना संगीतामध्ये गती होती. त्यातही पंजाबमधील लोकसंगीताकडे त्यांचा अधिक कल होता. त्यांना पहाडी आवाजाची देणगी होती. या छंदाबरोबरच त्यांनी शिक्षणातदेखील प्रगती केली होती.
  इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. असलेले चन्नी सिंग यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात बरेच पुरस्कार मिळवले होते. इंग्रजी साहित्य या विषयात चन्नी सिंग प्राध्यापकी करत असतानाच संगीत, गाणे या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी जालंदर रेडिओसाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांना तिथे नकार मिळाला. लग्नानंतर चन्नी सिंग 1975 मध्ये इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
  इंग्लंडमध्ये आल्यानंतर पाश्चिमात्य संगीताचा आशियाई तरुणांवर बराच पगडा असल्याचे जाणवले. ते स्वत: जरी पाश्चिमात्य संगीताचे द्वेष्टे नसले तरीही भारतीय मूल्य आणि संस्कृती जर तेथील आशियाई तरुणांमध्ये रुजवायची असेल तर संगीताचा मार्ग अगदी योग्य असेल, असे त्यांना जाणवले व त्यातूनच ‘आलाप’ या संगीत चमूची स्थापना झाली. 1977 मध्ये आलापची स्थापना झाल्यानंतर चन्नी सिंग यांनी इंग्लंडमधील देवळे आणि भारतीय, आशियाई समूहाच्या ठिकाणी छोटो छोटे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. भांगडा ही पंजाबी लोककला चन्नी सिंग यांनी पाश्चिमात्य देशांमधून अक्षरश: लोकप्रिय केली.
  संगीताच्या माध्यमातून चन्नी सिंग यांनी इंग्लंड आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये विखुरलेल्या आशियाई तरुणांमध्ये पुन्हा एकदा सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक किंवा एकाकी आयुष्य व्यतीत करणा-या लोकांसाठी केलेल्या कामाकरता चन्नी सिंग यांना सन्मानित करण्यात आले.
  चन्नी सिंग यांनी ‘यल्गार’ या हिंदी सिनेमासाठीदेखील संगीत दिले होते. लिव्हरपूल येथील एका महाविद्यालयात संगीताचे मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले आशियाई असलेले चन्नी सिंग यांना ‘भांगडा’ या नृत्य प्रकाराच्या कार्यासाठी खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेला तीस वर्षांत भांगडा या लोककलेसाठी केलेल्या कामासाठी पाश्चिमात्य जगामध्ये ‘गॉडफादर ऑफ भांगडा’ म्हणून ओळख निर्माण करणारे चन्नी सिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक तरुण या कलेकडे आकृष्ट होत आहेत. ही त्यांनी जगाला दिलेली देणगीच आहे.

Trending