आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Chemotherapy Meaning By Dr.Anand Joshi

'‍कीमो'चा अर्थ काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या महायुद्धात इटलीच्या बारी बंदरात उभ्या असलेल्या युद्धनौकेवर सल्फर मस्टर्ड हा विषारी वायू अपघाताने पसरला. शिपाई आजारी पडले. रक्त तयार करणारी त्यांची अस्थिमज्जा (बोनमॅरो) व लसिकाग्रंथी (लिम्फनोड्स) यावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या रक्तातील जीवाणू-विषाणूंशी युद्ध करणा-या पेशींची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. ही बातमी वैद्यकीय विश्वात वा-यासारखी पसरली. अमेरिकेतील येल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मस्टर्ड संयुगाचा शोधाभ्यास करण्याची परवानगी सरकारकडे मागितली. परवानगी मिळाली. नायट्रोजन मस्टर्डवर शोधाभ्यासी प्रयोग करताना ‘लिम्फोमा’ या कर्करोगातील कर्कपेशी यामुळे मरतात, असे लक्षात आले. १९४३च्या सुमारास याचे प्रयोग लिम्फोमाच्या रुग्णांवर केले गेले. ते यशस्वी ठरले. लिम्फोमा हा कर्करोग या औषधाने बरा होतो, हे वैद्यकीय विज्ञानाला उमगले. १९००च्या सुरुवातीला पॉल एल्रिच याने रसायने वापरून जीवाणूंचे इन्फेक्शन बरे करण्याचे यशस्वी प्रयोग केले होते. या उपचारांना त्याने ‘कीमोथेरपी’ असे नाव दिले होते. तोच शब्द पुढे कर्करोगावरील रासायनिक उपचारांना वापरला गेला. त्याचे लघुरूप ‘कीमो’ असे आहे.

संशोधनाची साठी
साठ वर्षांपूर्वी जेव्हा कीमोथेरपीची सुरुवात झाली, तेव्हा औषधांनी कर्करोग बरा करता येईल, याबद्दल विज्ञान साशंक होते. शस्त्रक्रिया व क्ष किरण उपचार हे दोनच पर्याय डॉक्टरांपुढे होते. या दोहोंचा उपयोग करून कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ३३ टक्क्यांवर येऊन ठेपले होते. हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे, असे कर्करोगतज्ज्ञांना वाटत होते. कीमोथेरपीची औषधे जहाल असतात, म्हणून त्यावर संशोधन करायला फार थोडेच संशोधक धजत होते. विज्ञानात धडाडीचे संशोधक असतात, त्यामुळे विज्ञान पुढे जाते. कीमोथेरपीच्या बाबतीत असेच घडले. आज गेल्या साठ वर्षांत कितीतरी नवीन औषधांचा शोध लागला आहे. त्याचा यशस्वी उपयोग विविध कर्करोगांसाठी होत आहे. त्याचे श्रेय त्या पाश्चात्त्य संशोधकांचे आहे.

पेशींवर हल्ला
कर्कपेशींचे सतत विभाजन होत असते. कीमोथेरपी या सतत विभाजन करणा-या पेशींवर हल्ला करते. या हल्ल्यात पेशींच्या गुणसूत्रांतील डीएनए मोडकळीला येते. पेशीतील महत्त्वाच्या जैवरासायनिक प्रक्रिया थांबतात. अशा प्रकारे कर्कपेशींचा नाश होतो, कर्करोग आटोक्यात येतो. कीमोथेरपी ही जहाल ‘टॉक्सिक’ असते. शरीरात सतत विभाजित होत असणा-या नॉर्मल पेशींवरसुद्धा या औषधांचा परिणाम होतो. या कर्कपेशी, या नॉर्मल पेशी हे कीमोथेरपीला ओळखता येत नाही. अस्थिमज्जेतील रक्तपेशी, रोगप्रतिकारक पेशी, केस वाढवणा-या पेशी अशा सतत विभाजित होत राहणा-या पेशींवर कीमोथेरपीचा परिणाम होतो. त्यामुळे कीमोथेरपीवर असलेल्या रुग्णाचे हिमोग्लोबीन कमी होते. डोक्याचे केस जातात. हा काळ रुग्णासाठी शारीरिक व मानसिक ताणाचा असतो. रोगजंतूंचे इन्फेक्शन होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागते. कीमो सुरू झाली की, रुग्णाला उलट्या होणे, उलटीची सतत संवेदना होणे, या उपप्रभावांना तोंड द्यावे लागते. त्यावर लगेच उपाय योजले जातात व काही दिवसांत हे उपप्रभाव संपतात. कीमोथेरपी शिरेतून इंजेक्शन देऊन, तर कधी स्नायूंमध्ये इंजेक्शनने, कधी गोळ्यांच्या रूपात दिली जाते. प्रत्येक कीमोथेरपीच्या ‘सायकल्स’ निराळ्या असतात. कीमोथेरपी संपली म्हणजे काही दिवसांत झालेले परिणाम पूर्ववत होऊ लागतात. केस येतात. रक्ताची स्थिती सुधारते. काही परिणाम दीर्घकाल राहू शकतात. ते प्रत्येक रुग्णागणिक निराळे असतात.

कीमोचे प्रकार
ट्युमरवर शस्त्रक्रिया, क्ष-किरण उपचार झाल्यानंतर पुन्हा कर्करोग डोके वर काढू नये, यासाठी कीमोथेरपी द्यावी लागते. कर्कपेशी रक्तातून शरीरभर पसरण्याची शक्यता असते. त्यांचा नायनाट व्हावा, म्हणून कीमोचा वापर केला जातो. याला ‘अ‍ॅडजुवंट कीमोथेरपी’ म्हणतात. काही वेळेला ट्युमरचा आकार मोठा असतो. कर्करोग बळावलेल्या
स्थितीत रुग्ण येतो. अशा वेळेला प्रथम कीमोथेरपी देऊन ट्युमरचा आकार कमी करावा लागतो. या परिस्थितीत जी कीमो देतात तिला ‘निओ अ‍ॅडजुवंट कीमोथेरपी’ अशी वैज्ञानिक संज्ञा आहे.

लिम्फोमा दिन
गेल्या ११ वर्षांपासून १५ सप्टेंबर हा ‘लिम्फोमा अवेअरनेस डे’ म्हणून जगभर मानला जातो. लिम्फोमाबाबत लोकांना माहिती असावी, हा उद्देश ‘लिम्फोमा दिना’मागे आहे. यामागे एक ऐतिहासिक कारणही आहे. कीमोथेरपीची यशस्वी सुरुवात प्रथम लिम्फोमावरील उपचाराने झाली व याचा फायदा आज अनेकांना झाला आहे.
dranand5@yahoo.co.in