लहान मुलांमध्ये गोवर, कांजण्या यासारख्या आजारांची सुरुवात होते. शाळा, बसस्थानक, वातानुकूलनीय रूम इत्यादीसारख्या ठिकाणी असे संसर्गजज्य रोग लवकर पसरतात. आजारांची लागण झालेल्या व्यक्तींनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
कांजण्या (chickenpox)
हा आजार vericella zoster virus मुळे होतो.
लक्षणे : सुरुवातीला बारीक ताप येणे, त्यानंतर अंगावर, चेह-यावर आणि डोक्यामध्ये बारीक पुरळं येतात.
दोन ते तीन दिवसांत या पुरळांचे (rash) रुपांतर फोडांमध्ये (blisters) होते. अंगाला खाज सुटते, प्रचंड दाह होतो. फोड फुटल्यानंतर तिथे खपली येते. कांजण्या साधारणत: १० ते १२ दिवस राहतात. कांजण्या असलेल्या व्यक्तींच्या सहवासात आल्यास किंवा शिंकणे, खोकणे, श्वासोच्छ्वासातून पसरतो. तसेच गरोदर स्त्रीकडून होणा-या बाळासही कांजण्यांची लागण होऊ शकते.
प्रतिबंध : पुरळ आल्यापासून साधारणत: ६ ते ७ दिवस कांजण्या जास्त संसर्गजन्य असतात. त्यामुळे मुलांनी शाळेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे
टाळावे. कांजण्या प्रतिबंधक लस वयाच्या १५ महिन्यांनंतर देता येते.
गोवर (measles)
अतिशय संसर्गजन्य असून measles virus मुळे होतो.
लक्षणे : सर्दी, खोकला, ताप येणे, डोळे लाल होऊन डोळ्यांतून पाणी येणे, अशी सुरुवातीची लक्षणे असतात. त्यानंतर चेह-यावर लालसर पुरळ येऊन पूर्ण शरीरावर पसरत जातात.
प्रतिबंध : गोवर आल्यापासून साधारणत: ५ ते ६ दिवस मुलांना शाळेत व गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. बाळांस गोवर प्रतिबंधक लस ९ महिन्यानंतर देणे गरजेचे असते. ज्यांनी गोवरची लस घेतलेली नाही किंवा ज्यांना गोवर झालेला नाही. अशा व्यक्तींनी गोवर झालेल्या व्यक्तींच्या
संपर्कात आल्यास तीन दिवसांच्या आत लस घेतल्यास गोवर टाळता येतो. गोवर झालेल्या व्यक्तीने व्हिटॅमिन (vitamin a) चा डोस घेणे गरजेचे असते.
अतिसार (डायरिया)
हा दूषित पाण्यातून पसरणारा आजार आहे. उन्हाळ्यात खाल्ल्या जाणा-या आइस्क्रीम, बर्फगोळा, ज्यूस, पाणीपुरी यातून अतिसार पसरू शकतो.
लक्षणे : वारंवार उलटी, जुलाब होणे, ताप येणे.
धोक्याची लक्षणे : अतिसुस्तपणा येणे, लघवी कमी किंवा न होणे, संडासमध्ये रक्त येणे, डोळे खोलवर जाणे, अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डा ॅक्टरांना भेटणे गरजेचे असते.
अतिसार चालू झाल्यानंतर शरीरातले पाणी कमी होऊ नये, म्हणून who – ors चे पाणी वारंवार घेणे गरजेचे असते.
प्रतिबंध : पाणी उकळून पिणे, जेवणापूर्वी व शौचानंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
अन्नविषबाधा
(फूड पाॅयझनिंग)
उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ बनवून ठेवलेल्या अन्नामध्ये जिवाणू व विषाणूची वाढ फार झटपट होते. त्यामुळे असे अन्न खाल्ल्यास अतिसार सारखी लक्षणे दिसून येतात. क्वचित प्रसंगी मृत्यू सुद्धा येऊ शकतो.
प्रतिबंध : शिळे अन्न खाऊ नये, अन्न फ्रिजमध्ये ठेवावे.
उष्माघात (sunstroke)
जास्त वेळ उन्हामध्ये काम करणे, खेळणे, तसेच पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे यामुळे होऊ शकतो. निसर्गत: शरीराची रचना अशी असते की जेव्हा शरीराचे तापमान वाढते. त्यावेळेस घाम येऊन ते तापमान कमी केले जाते. जर ही प्रक्रिया बंद पडली तर शरीराचे तापमान वाढून भोवळ येणे, बेशुद्ध होणे असे प्रकार होऊ शकतात.