आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण कोण ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जायला लागलेली कोजागिरी फार मजेशीर दिसायची. शांताची त्यासाठी एक खास भाषा होती. तिच्या गणवेशाला शांता ‘बारदान’ तर हेअर बँडला ‘मुंडासं’ म्हणे. त्या शब्दांची कोजागिरीला सवय झाली होती. थोडी मोठी झाल्यावर या शब्दांचे अर्थ तिला कळू लागले. त्यामुळे या शब्दांवर बंदी आणली गेली. अर्थात तरीही शांताच्या तोंडून ते शब्द कधी कधी निघून जायचे.

शब्दांवरून आणखी एक गोष्ट आठवली. कोजागिरीला फारसे तयार कपडे आणण्याच्या भानगडीत शांता कधी पडत नव्हती. एक तर तयार कपडे महाग असायचे. पाहिजे ती रंगसंगती सुती कपड्यात मिळणे कठीण. मुंबईच्या दमट हवेत लहान मुलांच्या कातडीला सुती कपडे छान वाटायचे. एकदा कोजागिरीच्या आग्रहाखातर तयार स्कर्ट ब्लाउज आणला. तो खूप महाग होता. हे शांताला बरोबर वाटले नव्हते. त्यामुळे चटकन, ‘हं तो --- रुपयांचा स्कर्ट घाल,’ असे ती म्हणून गेली. ‘आई, असे का म्हणतेस? त्यापेक्षा तू त्याला बदामाचा स्कर्ट म्हण नं.’ त्यावर बदामाचे डिझाइन होते हे लक्षात आणून देत कोजागिरीने शांताला दुरुस्त केले होते. कोजागिरीच्या आग्रहाखातर जर स्कर्ट आणला असेल तर त्या स्कर्टची किंमत दर वेळी लक्षात आणून देणे चुकीचे आहे हे शांताच्या लक्षात येऊनही चूक झाली होती. पण कोजागिरीने नुसती चूक दाखवली नव्हती तर पर्यायी शब्दही दिले होते. ‘आई, तू आमच्या शाळेत पँट-शर्ट घालून येऊ नकोस. तू गेल्यावर मला सर्व मुली नावं ठेवतात. मला वाईट वाटते.’ कोजागिरीने एकदा सांगितले. शांताला जरा नवल वाटले. शाळेत आयांनी मेकअप करून आलेले चालत होते. पण असा पोषाख केलेला चालत नव्हता. ‘तू सरळ सांग, माझी आई जो पोषाख घालते तो तिला आवडतो,’ असे म्हणावेसे शांताला वाटले. पण कोजागिरीचे वय शांताला समजून घेण्याचे नव्हते. मैत्रिणींनी केलेल्या टीकेला तिला तोंड देता आले नसते. ‘कोजागिरी, मी घालणार नाही असा पोषाख. पण त्याचे कारण तुझ्या मैत्रिणींना तो आवडत नाही म्हणून नव्हे. तर मैत्रिणींनी तुझ्या आईला नावं ठेवलेले तुला आवडत नाही, म्हणून.’ आईचे बोलणे कोजागिरीला समजले नाही. पण आई आपले ऐकते एवढं समजून तिची कळी खुलली होती.

‘शाळेत बाई म्हणाल्या कुंकू लावून ये. तू हिंदू आहेस. ती ख्रिश्चन आहे. तिने नाही लावले तरी चालते,’ कोजागिरी शांताला सांगत होती. ‘आई, आपण कोण आहोत?’ तिने विचारले. ‘मी आणि बाबा जन्माने हिंदू आहोत. पण आम्ही धर्म-जात पाळत नाही. त्यामुळे आपण फक्त भारतीय. खरं म्हणजे फक्त माणूस.’ आई भलतंच अवघड काहीतरी सांगतेय असा चेहरा करून कोजागिरी शांताकडे पाहत होती.

युनिट टेस्टच्या आधी पालक-शिक्षक सभा होती. सर्व पालक युनिट टेस्टला कोणता पोर्शन आहे, किती प्रश्न विचारले जाणार आहेत, कशाला किती मार्क आहेत यावर चर्चा करत आणि प्रश्न विचारत होते. शांताला मुलांची आणि शिक्षकांची दया आली.

अभ्यास-परीक्षा-मार्क यापलीकडे कोणालाही आपल्या मुला/मुलीबद्दल प्रश्न नव्हते. शांताने सांगायचा प्रयत्न केला, ‘आपली मुलं केवळ दुसरीत आहेत. वर्गात त्यांना विषय समजून घ्यायला किंवा इतर काही अडचणी आहेत का यावर आपण बोलूया.’ सर्व पालक एका सुरात म्हणाले, ‘अहो, पहिल्यापासून मार्क मिळवण्याची सवय नाही लावली तर पुढे काय भविष्य? बघितलंत ना केवढी स्पर्धा आहे ते.’

शांताला वाटले, आजूबाजूचे वातावरण कोजागिरीच्या मनात अनेक प्रश्न तयार करत असणार. त्याचा अर्थ ती लावत असणार. ते तिला सोपे कसे होईल याकडे शांता लक्ष देत होती. काही हुकमी मार्ग होते. कोजागिरीला कोणताही प्रश्न विचारण्याची मुभा वाटणे. तिने काही सांगितले, तिचे मत दिले तर ते ऐकून घेणे. शांताचे मत तिला नाही पटले तरी, शांता तिचे मत तिला वेळोवेळी सांगत होती. आईचे मत वेगळे असूनही ती आग्रह धरत नाही हे मोठे होताना कोजागिरीला कळत गेले. याची पावती शांताला मिळायची जेव्हा कोजागिरी तिला मिठी मारून म्हणायची, ‘तू माझी लाडकी माऊ आहेस.’