आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तवेधक चितकुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चितकुल हे भारत-तिबेट सीमेवरचं शेवटचं गाव. जवळजवळ साडेतीन हजार फुटांवर वसलेलं, नी-ला या सुंदर बर्फाच्छादित पर्वतरांगेच्या कुशीत पहुडलेलं हे चिमुकलं चितकुल म्हणजे निसर्गसौंदर्याची नुसती खाणच आहे.

ना कोची मोहीम फत्ते करून काल्पाला परतलो. आता फक्त एकच दिवस मध्ये उरला होता. हिमाचल सोडायचा दिवस जवळ आला की, माझ्या डोळ्यात एवढ्या-तेवढ्यावरून टचकन पाणीच यायला लागतं. पवन, पृथ्वी या माझ्या सगळ्या हिमाचली मित्रांना हे पूर्वानुभवावरून चांगलंच माहीत झालं होतं. त्यामुळे परत जायचे दिवस जवळ यायला लागले की, ते माझ्याशी फार जपून बोलायचे. आताही पृथ्वीने मला म्हटलं, ‘एकच दिवस राहिलाय किन्नौरमध्ये, उद्या सांगला आणि चितकुलला जायचं का?’ मी अर्थातच आनंदाने हो म्हटलं.

दुसऱ्या दिवशी पहाटेच निघालो. मुलं, मी, पवन आणि पृथ्वी. सांगला खोरे आणि चितकुल या गावाबद्दल मी खूप ऐकलं होतं. सांगला हे बास्पा नदीचे खोरे, आणि चितकुल हे भारत-तिबेट सीमेवरचं शेवटचं गाव. म्हणजे प्रत्यक्ष सीमारेषा चितकुलहून १०० किलोमीटर दूर आहे, पण पुढे रस्ता सैन्याच्या ताब्यात आहे. जवळजवळ साडेतीन हजार फुटांवर वसलेलं, नी-ला या सुंदर बर्फाच्छादित पर्वतरांगेच्या कुशीत पहुडलेलं हे चिमुकलं चितकुल म्हणजे निसर्गसौंदर्याची नुसती खाणच आहे. काल्पाहून सांगला खोऱ्यात जाणारा रस्ता हा रारंग ढांगला वळसा घालून जातो. एकदा गाडी रामपूर-काल्पा हमरस्त्यावरून बास्पा खोऱ्यात जायला वळली की, पूर्ण प्रवास बास्पा नदीच्या अवखळ प्रवाहाच्या साक्षीने होतो. बास्पाचा प्रवाह सतलजसारखा उग्र, रौद्र नाहीये. बास्पा एखाद्या चिमुरड्या पोरीसारखी नाचत, बागडत जाते. छोटी मुलगी कशी मध्येच तिच्या बाबाचं बोट सोडून पळत थोडीशी दूर जाते पण बाबा जरा नजरेआड झाला की, घाबरून लगेच परत येऊन निमूट त्याचं बोट पकडते, तशी बास्पा नदी अधूनमधून रस्त्याचं बोट सोडून दूर जाते आणि लगेच पुढच्या वळणावर परत येते.

सांगला खोऱ्यातील पहिलं आणि बऱ्यापैकी मोठं गाव म्हणजे रकछम. या गावात बकव्हीट, बटाटे आणि मोहोरी यांची शेती होते, पण फक्त एकाच हंगामात. जून ते ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या दिवसांतच. आम्ही गेलो ते जुलै महिन्याचे सरतीचे दिवस होते. सगळी शेती जोमाने तरारून आली होती. बकव्हीटची लालस गुलाबी फुले, जर्द पिवळी मोहोरीची फुले आणि बटाट्याची पोपटी तजेलदार रोपं अशी नुसती रंगपंचमी झाली होती रस्त्याच्या आजूबाजूला, आणि पलीकडे बास्पाचा सुंदर, फेसाळता, पांढराशुभ्र प्रवाह. रकछम गावाजवळ एक छोटं हॉटेल होतं, अगदी नदीच्या काठाजवळ. तिथे चहा प्यायला थांबलो. त्या हॉटेलच्या खिडकीतून मागचं दृश्य फारच सुंदर दिसत होतं. बास्पाच्या प्रवाहाला अगदी लागून असलेली, फुलून आलेली शेती, मध्ये श्वेत-शुभ्र रेशमी वस्त्रासारखा तलम असा बास्पाचा प्रवाह, पलीकडे बर्फाच्छादित उत्तुंग पर्वतरांगा आणि डोईवर केवळ हिमालयातच दिसू शकतं असं मोराच्या देहाइतकं दीप्तिमान निळं आकाश, आणि त्यात मध्येच विहरणारा पांढराशुभ्र गुबगुबीत ढग. ते दृश्य बघून मी पुरती हरवूनच गेले.

अगदी तिथेच, बास्पा नदीच्या तीरावर गावची स्मशानभूमी होती. स्मशानभूमी म्हणजे तरी काय, फक्त एक सुंदर छोटीशी शेड. ती शेड बघताना माझ्याही नकळत मी प्रकट बोलून गेले, ‘वा! काय सुंदर स्मशानभूमी आहे. इथे जळायला किती मजा येईल. इट इज ए प्लेस वर्थ डायिंग फॉर!’ ‘मॅम, काय बोलताय हे,’ म्हणत पृथ्वी आणि पवन, दोघांनीही कपाळाला हात लावला. मुलंही माझ्याकडे बघतच राहिली. पण मला खरंच मनापासून वाटतं की, मृत्यू एक ना एक दिवस मला गाठणारच आहे. पण त्याची माझी भेट अशी, इथे हिमालयातल्या कुठल्यातरी अनवट वाटेवर, एका कृतार्थ क्षणी व्हावी, झाडावरचं पिवळं पान गळून पडल्याच्या सहजतेने श्वास बंद व्हावा आणि मृत्यूचा हात पकडून मी अज्ञाताच्या सफरीवर निघून जावं. शांतपणे. माझी राख इथेच पडावी. याच हिमालयाच्या पायथ्याशी.

मी याच विचारात मग्न असताना मुलं म्हणाली, ‘चल, पुढे जाऊ या की चितकुलला.’ माझं विचारचक्र तिथंच थांबलं, आणि आम्ही पुढे निघालो. चितकुलला पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. तिथे पोचल्या पोचल्या एक पाटी तुमचं स्वागत करते, ‘हिंदुस्थान का आखरी ढाबा.’ ती पाटी बघितल्या बघितल्या मुलं म्हणाली, ‘इथंच खायचं.’ भूकही लागलेलीच होती, त्यामुळे तिथे जाऊन मॅगी आणि गोड, खूप उकळलेला चहा असं खास पहाडी जेवण उरकलं आणि गाव बघायला निघालो. चितकुल अगदीच चिमुकलं गाव आहे. गाव कसलं, वाडीच आहे छोटी. किन्नर कैलासची परिक्रमा इथून सुरू होते. चितकुलला माथी देवीचं एक सुंदर पारंपरिक किन्नौरी शैलीत बांधलेलं मंदिर आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गावात काग्युपा पंथाचं एक बुद्धमंदिर आहे, तिथे शाक्यमुनी बुद्धाची चार दिशांकडे बघणारी एक सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या प्राकाराबाहेर गावातली वृद्ध मंडळी ऊन खात गप्पा मारत बसलेली होती. मी जाऊन त्यांना अभिवादन केलं. त्यातले एक आजोबा हसले, म्हणाले, ‘या बसा, चहा घ्या.’ मी काही म्हणायच्या आत त्यांनी मागेच असलेल्या घराकडे तोंड करून ऑर्डर सोडली, ‘चाय लाना जी.’ थोड्या वेळाने स्टीलच्या ग्लासमध्ये वाफाळता बटर टी आला. या याक बटर आणि सत्तूपासून केलेल्या चहाला एक प्रकारचा विशिष्ट वास आणि मिठाची चव असते, जी पहिल्यांदाच त्या चहाची चव घेणाऱ्या माणसाला सहसा आवडत नाही. पण मी या आधी बऱ्याच वेळा हा चहा घेतला होता आणि सवयीमुळे तो मला आवडायलाही लागला होता. मी सराईतासारखा झुरका घेतला. आजोबा आणि त्यांचे मित्र मला बघतच होते. माझ्या चेहऱ्यावर कुठलाच वेडावाकडा भाव येत नाही, हे बघून आजोबा मिश्कीलपणे हसले, म्हणाले, ‘आप तो लोकल जैसे चाय पिते हैं.’ त्यांचं वाक्य ऐकून पृथ्वी हसत म्हणाला, ‘मॅम का बस चले तो लोकल ही हो जाती वो.’ खरंच होतं त्याचं. हिमाचल प्रदेश सोडताना प्रत्येक वेळी माझ्या मनात हाच विचार येतो की, इथेच कायमचं राहता आलं तर किती चांगलं होईल? 

shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...