आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेचा सर्वधर्मसमभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छतेच्या बाबतीत मागासलेल्या भारतीय समाजात स्वच्छता अभियान सुरू झालं की, पहिला प्रश्न विचारला जातो, स्वच्छतेची सुरुवात कोण करणार? पाठोपाठ दुसरा प्रश्न फेकला जातो, स्वच्छता हा धर्म आहे की राजकारण? यानंतर स्वच्छतेला प्रारंभ करण्याऐवजी वाद उकरून काढला जातो, शेवटी घाण करतं कोण? अस्वच्छता पसरवतं कोण? याचा संबंध कोण्या एका धर्माशी आहे की जातीशी? कुठल्या वस्तीशी आहे की श्रद्धेशी? नेमकं असंच काहीसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानानंतर घडू लागलंय.
असं घडू नये, या उद्देशाने ‘ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्स’च्या वतीने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि धर्मगुरूंची एक परिषद अलीकडेच हृषीकेश येथे भरली होती. या परिषदेत स्वच्छता न राखल्याने महिला आणि मुलांवर होत असलेल्या दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात उघड्यावर शौचास जाण्याने मुलांमध्ये पसरणा-या आजारांचा उल्लेख झालाच, पण वाढत्या बालमृत्यूदराचा अस्वच्छतेशी थेट संबंध असल्याचेही प्रतिपादन तज्ज्ञांकडून झाले. खरं तर स्वच्छता आणि महिला आरोग्य असा विषय घेऊन या परिषदेत महिला धर्मगुरूंनी विचारमंथन करणे ही अत्यंत सुखावह अशी बाब होती. मात्र, एक समाज म्हणून स्वच्छतेचा विचार कृतीत उतरवताना या विषयाशी जोडलेले समज-गैरसमज दूर होणं महत्त्वाचं आहे. तसं झालंच तरच स्वच्छतेच्या धर्माचं आपल्याला आकलन होईल आणि तेव्हाच स्वच्छतेबाबतचा समभाव आपल्याला जागवता येईल.
ज्यांनी कुणी ‘स्लमडॉग मिल्यनेअर’ नावाचा सिनेमा बघितलाय, त्यांना आपल्या लाडक्या स्टारच्या भेटीसाठी आटापिटा करताना मुलं शौचकुपात पडल्याचं दृश्य आठवत असेल. हे केवळ सिनेमापुरतं दृश्य नव्हतं, तर शहरातल्या बकाल वस्त्यांमधल्या गलिच्छपणाचं ते प्रतीक होतं. मुंबईसारख्या महानगराचं हे एक वास्तव असलं तरीही वेळोवेळी प्रसिद्ध होणारे संशोधनपर अहवाल (संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारतातले ५९.४ कोटी लोक उघड्यावर शौचास बसतात. ४४ टक्के महिला आपल्या मुलांचे मलमूत्र उघड्यावर टाकतात.) सांगताहेत की, ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याची अपरिहार्यता आणि हात स्वच्छ न करण्याची सवय यामुळे मुलं आणि महिलांना डायरिया तसेच श्वसनाशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागत आहे. आकडेवारी तर हेही सांगतेय की, ग्रामीण भारतातली पाच वर्षांखालील केवळ सहा टक्के मुलं शौचालयांचा वापर करताहेत. इतर ९४ टक्के मुलं उघड्यावर शौचास बसून आजारांना आमंत्रण देताहेत. तरीही उघड्यावर शौचास बसणे हेच कसे स्वच्छता राखणे आहे, असे मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे दबाव राखून आहे.

अर्थात, स्वच्छतेबाबतीत हा एकच अडथळा आपल्याकडे नाही. मुस्लिम समाज हिंदूंच्या तुलनेत खूप अस्वच्छ आहे, हा समज बाळगण्यासही अनेकांना गैर वाटत नाही. या संदर्भात ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’चे मायकेल जेरुसो आणि ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’चे डीन स्पिअर्स यांचे संशोधन मात्र वेगळेच वास्तव मांडत आहे. त्यानुसार हिंदूंच्या तुलनेत कमी शिकलेला, आर्थिकदृष्ट्या मागासलेला असूनही मुस्लिम समाजातील बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. याचाच अर्थ स्वच्छता आणि साक्षरता याचा थेट संबंध नाही. जेरुसो आणि स्पिअर्स हाही प्रश्न येथे उपस्थित करतात की, हिंदू आणि मुस्लिम समाजातल्या बालमृत्यू दरात १८ टक्क्यांचा फरक का आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना ते या निष्कर्षाप्रत पोहोचतात की, मुस्लिम कुटुंबांमध्ये शौचालय असणे आणि महत्त्वाचे म्हणजे, त्याचा नियमित वापर होणे या गोष्टी ठळक आहेत. त्यांचे निष्कर्ष हेही सूचित करतात की, उघड्यावर शौचास बसणा-या मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची संख्या ४० टक्के अधिक आहे. याच संदर्भात भारत आणि नेपाळमधल्या गावांमधील सर्वेक्षणात ही बाब उघड झालीय की, घरांमध्ये किंवा घराच्या आवारात शौचालय असूनही हिंदू लोक त्याचा वापर कमी करताहेत. ही सुविधा केवळ महिला आणि आजारी माणसांच्याच वापरासाठी आहे, हा समज त्यामागे असल्याचे सर्वेक्षणात नोंदण्यात आलंय. २००५चा शासकीय अहवाल तर असं नमूद करतोय की, शहरी आणि ग्रामीण भागात राहणारा ६७ टक्के हिंदू नागरिक उघड्यावर शौचास जात आहे, तर त्या तुलनेत मुस्लिम समाजातील नागरिकांची टक्केवारी ४२ टक्के इतकी आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून भारतात स्वच्छता मोहीम सुरू आहे. पंतप्रधानांपासून फिल्म स्टार्सपर्यंत आणि कॉर्पोरेट जगतापासून शाळकरी मुलांपर्यंतचे लोक त्यात सहभागी होत असल्याचे दिसत असले तरीही, स्वच्छतेच्या बाबतीत बांगलादेश आणि ‘ब्रिक्स’ देशांच्या तुलनेत अजूनही भारत खूप मागे आहे. भारतात जर अर्ध्याहून अधिक लोकसंख्या उघड्यावर शौचास जात असेल, तर बांगलादेशमध्ये हेच प्रमाण केवळ ७ टक्के आणि चीनमध्ये ४ टक्के आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, केवळ फोटोपुरत्या मोहिमा चालवून आपले काम भागणारे नाही, त्यासाठी स्वच्छतेचा पुरस्कार करणारी संस्कृती आपल्याला टप्प्याटप्प्याने विकसित करावी लागणार आहे. कारण हा केवळ चांगलं दिसण्याचा मामला नाही, तर याचा संबंध आपल्या अर्थव्यवस्थेशी, राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. म्हणजेच निव्वळ शौचालय उभारून समस्या सुटणारी नाही, तर बांधलेल्या शौचालयांचा नियमित उपयोग होण्या-न होण्यावर अभियानाचे यश अवलंबून असणार आहे. अर्थात, ज्या देशातली ९० टक्के जनता विविध धार्मिक श्रद्धा बाळगून आहे, त्या देशातल्या धर्मगुरूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसं घडलं तरच जात, धर्म, समज-गैरसमज टाळून स्वच्छतेच्या बाबतीत समभाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंदिर-मशीद प्रचाराचे केंद्र ठरावे…
हृषीकेश येथील राष्ट्रीय परिषदेस उपस्थित परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मन:परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले, आम्हाला आजवर परमेश्वराचा वास असलेल्या अवकाशाची स्वच्छता राखावी, असे सांगितले जात होते. मात्र आता, जो स्वच्छता राखतो तोही स्वच्छ राहायला हवा. मौलाना कल्बे सादिक आणि लुकमान तारापुरी म्हणाले, प्रत्येक मशिदीतून स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहोचायला हवा. तर दक्षिण आफ्रिकेतून आलेले आर्चबिशप थाबो मकगोबा यांनी अनुयायांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा जागृत करणे हे धर्मगुरूंचे प्रथम कर्तव्य असल्याचा उद‌्घोष केला.

tripathiarunk@gmail.com