आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पनेतल्या भरारीला वास्तवाचे पंख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद इथं नुकतीच मुलींनी तयार केलेल्या कॉमिक्सची कार्यशाळा घेण्यात आली व या कॉमिक्सचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. केंद्र आणि राज्य सरकारच्या केजीबीव्ही कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात बीड, जालना, औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतील 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुली या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. चार दिवसांच्या या कार्यशाळेत पहिले तीन दिवस सहभागी मुलींना कॉमिक्स तयार करण्याचं प्रशिक्षण
देण्यात आलं. रेखाटनं, शब्दरचना, चित्रांचा क्रम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आणि शेवटच्या दिवशी या मुलींनी तयार केलेल्या चित्रांचं प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरवण्यात आलं. नांद्राबादसारख्या अवघ्या एक हजार लोकवस्तीच्या गावातही या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
काय आहे केजीबीव्ही
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हा ग्रामीण भागातील मुलींच्या सर्वंकष विकासासाठीचा केंद्र आणि राज्य सरकारचा उपक्रम आहे. याला युनिसेफचे सहकार्य मिळते. ज्या जिल्ह्यात वा तालुक्यात महिला साक्षरता, स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक असमतोल, महिला अत्याचार, हुंडाबळी, कुपोषण यांसारख्या प्रश्नांबाबत धोक्याची परिस्थिती असते, तेथील मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी हा निवासी वसतिगृह शाळांचा प्रकल्प राबवण्यात येतो. या निवासी शाळांमधून अशा मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या मुलींना जीवनावश्यक कौशल्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. संगणक, इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, ड्रेस डिझायनिंग, बॅग-पर्स मेकिंग, कराटे आणि संगीत प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. अनेक मैदानी खेळांचंही प्रशिक्षण या उपक्रमांतर्गत दिलं जातं. या अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सात फुटबॉलपटू मुलींची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे, हे विशेष. यांसारख्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून वर्ल्ड कॉमिक्स इंडिया या संस्थेच्या मदतीने या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. गोव्याहून आलेल्या दीप्ती अरोलकर आणि रेश्मा भिकले यांनी या मुलींना कॉमिक्स बनवण्याचं प्रशिक्षण दिलं.
विषयांची निवड
या कार्यशाळेचं लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मुलींनी कॉमिक्ससाठी निवडलेले विषय. वय वर्षे दहा ते पंधरा हा काळ तसा स्वप्नात रममाण होण्याचा. भविष्याची स्वप्नं रंगवण्याचा. या सर्वच मुली ग्रामीण भागातल्या असल्यामुळे त्यांना अपेक्षित असलेल्या शहरातल्या सुखवस्तु आयुष्याचं प्रतिबिंब त्या कॉमिक्समध्ये दिसेल अशी अपेक्षा फोल ठरली. या मुलींना बदलत्या सामाजिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असल्याचे या प्रदर्शनातून दिसले.
बीड जिल्ह्यातील तीर्थपुरीजवळच्या मोगलगावची 13 वर्षांची ऐश्वर्या मडके असो किंवा जालन्याच्या बदनापूर तालुक्यातली 12 वर्षांची सुजाता मघाडे किंवा मग जिरडगावची निकिता उगले... या सर्व मुलींनी स्वानुभवावर आधारित विषय कॉमिक्ससाठी निवडला होता. बालविवाह, स्वच्छता आणि शिक्षणाचा अभाव, मुलगाच हवा ही मानसिकता, व्यसनापायी उद्ध्वस्त झालेली कुटुंबं, हुंडा पद्धती, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, छेडछाड हा अनेकींच्या कॉमिक्सचा विषय होता. वैयक्तिक आयुष्यातल्या व्यथांना कागदावर उतरवताना या मुलींनी सामाजिक भानही राखलं होतं. त्यामुळेच लसीकरण, बुवाबाजी, शेती, कुपोषण, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांसारख्या विषयांना स्पर्श करणारी कॉमिक्सही काहीजणींनी तयार केली होती.
सकारात्मक शेवट- प्रशिक्षण घेण्यासाठी विविध ठिकाणांहून आलेल्या या मुलींसंदर्भात विशेष गोष्ट म्हणजे, कॉमिक्सच्या शेवटी त्यांनी दिलेला सकारात्मक संदेश. एखादी समस्या, त्या संदर्भातला छोटासा संवाद, त्या समस्येचे गंभीर परिणाम आणि त्यातून सर्वांनी घ्यावयाचा बोध, असं प्रत्येकीच्या छोटेखानी कॉमिक्सचं स्वरूप होतं. आजूबाजूला दिसणा-या, दैनंदिन आयुष्यात भेडसावणा-या, कधी तरी स्वत:सुद्धा त्या अनुभवातून गेलेल्या किती तरी प्रश्नांबाबत या मुलींनी स्वत:ला कॉमिक्सच्या माध्यमातून व्यक्त केलं. मात्र त्याच वेळी त्या केवळ तक्रार-समस्या मांडून थांबल्या नाहीत तर त्यावर उपाय सुचवण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नांद्राबादमधल्या गावक-यांना या मुलींनी कॉमिक्सबद्दल विश्वासाने, न लाजता माहिती सांगितली.
या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या मागास भागात बालपण व्यतीत केलेल्या मुली. आधुनिक राहणीमानाचा स्पर्श न झालेल्या. त्यांनी तयार केलेली कॉमिक्स या क्षेत्रातल्या जाणकारांना कदाचित तितकीशी परिपूर्ण वाटणार नाहीत. काहींचा त्या कॉमिक्समधल्या रेखाटनाच्या पद्धतीबद्दल आक्षेप असेल. शिवाय अ‍ॅनिमेशनच्या युगात कॉमिक्सचं जगही जणू मागे पडल्यामुळे त्यात काय विशेष असंही काही जण म्हणतील. मात्र ‘झोपाळ्यावाचून झुलायच्या’ वयात या मुलींची आसपासच्या परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता, वास्तवाची जाणीव आणि ही जाणीव व्यक्त करण्याची त्यांची समज-उमज प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे हे नक्की.
बदलते भावविश्व...
ग्रामीण भागातल्या टीनएजर
मुलींचंही भावविश्व बदलतंय. फॅशन-मेकअप, स्वप्नातलं जग यापुरतंच हे विश्व मर्यादित
राहिलेलं नाही. आजूबाजूचे सामाजिक
बदल या मुली संवेदनशीलतेनं
टिपत आहेत आणि त्यावर
धीटपणे व्यक्तही होत आहेत.
vandana.d@dainikbhaskargroup.com