आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Confession Box By Chandramohan Kulkarni

ना खंत ना खेद !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य जगण्याची माझी एक साधी सरळ पद्धत आहे. ते जसं येतं तसं मी स्वीकारतो. आपल्या हातात ब-याच गोष्टी नसतात, ही बाब मला सुदैवाने लवकरच कळली. त्यामुळे काय झालं नाही किंवा होऊ शकलं नाही, यापेक्षा आहे त्या परिस्थितीत काही तरी करण्याच्या संधी शोधत आणि त्या साधत मी जगत आलोय. याची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली, असं म्हणता येईल. मी लहान असल्यापासून चित्रं काढायचो, बरी काढायचो आणि अशी मुलं जशी इतर चांगल्या विषयात ढ असतात तसाच मीही होतो. त्यामुळे मी यापुढेही चित्रंच काढायची, हे मीच ठरवलं.
सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला नाही. त्यांनी तथाकथित मोठेपणाच्या इच्छा माझ्यावर कधी लादल्या नाहीत. माझ्या चित्रकारीबद्दल त्यांना फार प्रेम होतं आणि त्यांनी शक्य त्या सर्व पद्धतीने मला मदत केली. चित्रकारीसाठी माझे वडील जसे कारणीभूत होते तसंच माझ्या आईमुळे माझ्यातील संवेदनशीलता जोपासली गेली. वाचनाची आवडही
माझ्यात तिच्यामुळेच आली.

वाचन हा माझ्यासाठी विरंगुळ्याचा विषय नाही. मी ते फार सिरियसपणे करतो. त्यामुळे माणूस घडतो, यावर माझा विश्वास आहे. अनेकांनी जे आपल्या आयुष्याबद्दल लिहून ठेवलं ते आपल्याला आयतं मिळतं, त्यामुळे आपल्याला दिलासा मिळतो, मार्गदर्शन मिळतं. माझ्या चित्रकलेतही हे फार झालंय. त्यामुळे माझ्या त्यातील जाणिवा वाढत गेल्या. आजही
मी मोठ्या प्रमाणात वाचन त्यामुळेच करतो.

मला सामान्य लोकांबद्दल आणि त्यांच्या दैनंदिन व्यवसायांसंबंधी प्रचंड कुतूहल आहे. हे आपल्या अवतीभवतीचं जग आहे, पण तिकडे सहसा आपलं लक्षच जात नाही. किंवा गेलं तरी दुर्लक्ष होतं. मला मात्र तसं करता येत नाही. मी बँडवाल्यांची सिरीज केली, सध्या कचरा वेचणा-या लोकांबद्दल मी सिरीज करतोय. माझ्या अवतीभवतीचं जग हे माझं जग आहे. ते
फार समकालीन आहे. आपल्या समाजाचं आजचं ते चित्र आहे. एक प्रकारचं ते डॉक्युमेंटेशन आहे. मग ते रस्त्यावरचे न्हावी असतील, किल्ल्या बनवणारा असेल, चहावाला, पानवाला, बसस्टॉपवरचे प्रवासी, सिक्युरिटीवाले, वेश्या हे सारे आपल्या जगण्यातले घटकच आहेत. मला ते चित्रांत पकडावेसे वाटतात. माझ्या अभिव्यक्तीचं ते माध्यम आहे. मला त्या चित्रांमधून त्यांच्यातलं माणूसपण शोधायचं असतं, त्यांच्यातला आणि माझ्यातला धागा बांधायचा असतो आणि हेच माझ्या चित्रवाचकांनी करावं, यासाठी मी मग त्याची प्रदर्शनंही भरवतो. आता काही म्हणतील, की यात व्यावसायिक धोका नाही का? तर तो आहे. पण मी पैशासाठी ही चित्रं काढत नाही. मला आतून काहीतरी जाणवतं, म्हणून मी ती काढतो. याच जाणवण्यानं मी जीम, ब्युटीपार्लर, खुर्ची आणि माणूस यांची एक सिरीज केली आहे. ती चित्रं मी टॅबवर
काढली. मला ते माध्यम वापरायचंही होतं आणि या विषयांसाठी मला ते योग्यही वाटलं. कारण या जिम, ब्यूटिपार्लर प्रकारांमध्ये एक सवंगपणा, कृत्रिमपणा, दिखाऊपणा आलाय, जो मला दाखवायचा होता. खुर्ची आणि माणसाचं नातंही असंच आहे. खुर्ची ही सत्तेचे प्रतीक आहे आणि त्यासाठी सारेच धडपडत असतात. मला ते टिपायचं होतं. त्यातून ही सिरीज निघाली. पण आता हे माध्यम वापरून झालंय, त्याच्या शक्यता माझ्यापुरत्या तरी संपल्या आहेत, त्यामुळे मी ते सध्या दूर केलंय.

काम करणं ही माझ्यासाठी मी संधी मानतो. त्यामुळे ते करताना मी विविध शक्यता तपासून बघत असतो. असं करताना एखादा अपघात घडला, जे करायचं त्याऐवजी भलतंच काही झालं म्हणून मी चिडत नाही, तर हे काहीतरी नवीन घडलंय, ते काय आहे, त्याबद्दल आणखी काय करता येईल याचा विचार करतो. मला त्यातूनही काहीतरी शिकण्याची संधी मी साधून घेतो. मला वाटतं, असं केल्यानं आपला त्रागा कमी होतो. केलेले कष्ट वाया जात नाहीत. हा माझ्या आयुष्याकडे बघण्याचाही दृष्टिकोन आहे. एखादा अनुस्वारही मला खूप काही शिकवून जातो. आयुष्य इंटरेस्टिंग करून घेणं ही माझी जगण्याची पद्धत आहे.

रडत बसणं हा माझा स्वभाव नाही. माझा स्वभाव आहे लढण्याचा. आणि तेही कसलाही आक्रस्ताळेपणा न करता. माझ्याही जगण्यात संकटं आलीच. त्याला कोणीच अपवाद नसतं. पण ती आली म्हणून मी हातपाय गाळून बसलो नाही. मी त्यांच्याकडेही एक संधी म्हणून पाहिलं आणि त्यातून काय शिकता येईल, याचा अंदाज घेत जगलो. मी एका वातावरणात कायम असतो. ते माझं स्वतःचं वातावरण आहे. स्थिर आणि शांत. तेच वातावरण घेऊन मी सगळीकडे फिरतो, त्यामुळे मी सहसा डिस्टर्ब होत नाही. हा, कधी कधी राग येतो तो उगाच वेळ वाया घालवण्याचा. एखाद्या कार्यक्रमाला गेलो, मग ते खासगी असो की सार्वजनिक, तिथं हमखास उशीर हा होतोच. अशा वेळी चिडचिड होते.
त्यापेक्षा तो वेळ चित्र काढण्यात किंवा वाचन करण्यात घालवायला मला आवडलं असतं. अनेकदा मनासारखी रंगाची शेड उमटली नाही की वैताग होतो. चित्र पूर्ण झालं तरी यात आणखी काही करता आलं असतं, हे असमाधान तर नेहमीच असतं. पण त्यात एक गंमत आहे. समाधान झालं तर सारंच संपलं ना? मग पुढे काय करणार? त्यामुळे हे असमाधान
तेवढं मी मनात कायम बाळगून असतो.

शब्दांकन - प्रतीक पुरी

(लेखक तैलरंगांपासून ते चारकोलपर्यंत आणि
जलरंग-अॅक्रॅलिकपासून डिजिटल पेंटिंग्जपर्यंत सर्व माध्यमांतून चित्रसंवाद साधणारे प्रसिद्ध चित्रकार आहेत.)