गेल्या दहा वर्षांपासून मला सांधेदुखीचा त्रास आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी रोज सकाळ – संध्याकाळ वेदनाशामक गोळ्या खायचे, तरीही माझा त्रास कमी होत नव्हता. सर्वात अगोदर माझ्या दोन्ही हातांच्या बोटांतील सांधे दुखण्यास व नंतर आखडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू दोन्ही मनगटे, कोपर, खांदे, दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही गुडघे, घोटे व पायांच्या बोटांचे सांधे दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मानेचे मणक्यांतील सांधे दुखण्यास सुरुवात झाली आणि शेवटी दोन्ही बाजूंच्या बरगड्या दुखायला लागल्या. सर्वात अगोदर सांधे दुखायला (एकसारखी ठणक असायची) सुरुवात व्हायची, नंतर सांध्यांवर सूज यायची, नंतर सांधे लाल व्हायचे व शेवटी रोज सकाळी आखडायचे.
अशाप्रकारे माझ्या शरीरातले सगळेच सांधे खूप दुखायचे. गेल्या दहा वर्षांपासून हा त्रास सतत व्हायचा. हा त्रास आभाळी वातावरणात, हिवाळ्यात, थंड खाल्ल्यानंतर व रात्री जास्तच वाढायचा. या त्रासामुळे व दुखण्यामुळे मी अक्षरशः कंटाळून गेले होते. इतक्या तीव्र वेदना असायच्या की मी रडायचे, रात्रभर झोप येत नसायची, चिडचिड व्हायची. त्यासाठी औरंगाबाद मधील जवळपास बारा ते पंधरा वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आणि दवाखान्यात उपचार घेतले, पण मला तीळमात्रही कुठेच फरक पडला नाही. मी सर्वप्रकारच्या औषधोपचार पद्धतीचे औषध घेतले. अगदी प्रत्येक डॉक्टरांनी सांगितले त्यापद्धतीने, अगदी काटेकोरपणे उपचारांचे व औषधांचे पालन केले, तरीही काहीच फरक पडला नाही.
अशा पद्धतीने अतितीव्र वेदनादायक आयुष्य जगत असताना माझ्या शेजारी राहणा-या एका तरुणाने मला सांगितले की तुम्ही होमिओपॅथिक उपचार का नाही घेत. माझा पोटाचा विकार व माझ्या आईचा सांधेदुखीचा आजार होमिओपॅथिक औषधाने ब-याच प्रमाणात कमी झाला. आम्ही आजही नियमित उपचार घेत आहोत. अगदी सहाच महिन्यांत आम्हाला खूप चांगला फरक पडला. तो मला होमिओपॅथिक दवाखान्यात घेऊन गेला.
आजपर्यंत एवढे उपचार केले, मग हा आणखी एक उपचार करून पाहू म्हणून मी होमिओपॅथिक औषधोपचार करण्याचे ठरवून गेले. गेल्या पाच महिन्यांपासून मी होमिओपॅथिक औषधोपचार घेत आहे आणि मला सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आहे. सुरुवातीला मला होमिओपॅथिक औषधोपचार प्रणाली माहीतच नव्हती.
माझ्यासारखे कितीतरी रुग्ण असे असतील की ज्यांना हे माहीतही नसेल की होमिओपॅथी एक उत्तम औषधोपचार प्रणाली आहे व इतर औषधोपचार पद्धतीला एक खूप चांगला पर्याय आहे. होमिओपॅथिक औषधोपचार पद्धतीनेच माझा आजार खूप कमी झाल्यामुळे मी होमिओपॅथीचे मनापासून आभार मानते व त्यांना धन्यवाद देते.