आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटचा गब्‍बर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रानटी फुलांना वास नसतो. तरीही ती दिसायला मोहक असतात. काटेरी असतात, परंतु आकर्षक असतात. त्यांचे हेच वेगळेपण पाहणा-याला भावते. क्रिकेटपटू शिखर धवनचेही असेच आहे. त्याची फलंदाजी कोणत्याही तांत्रिक निकषांच्या चौकटीबाहेरची. पाहताना काहीतरी वेगळेपण पाहत असल्याचा भास होतो. त्या फलंदाजीला तंत्रशुद्धतेचा गंध नाही. पण क्षेत्ररक्षकांना चकवून सीमापार जाणा-या चेंडूकडे आगळेच मार्दव आहे. भारतासारख्या कलात्मक, नाजूक व संस्कृतीच्या परंपरेत रुळलेल्या देशाला आणि देशवासीयांना कदाचित शिखर धवनची फलंदाजी म्हणजे प्रतारणा वाटेल. त्याची रांगडी फलंदाजीची शैली वेस्ट इंडीज क्रिकेटच्या धाटणीची. त्यात अरेरावी आहे, मर्दानगी आहे. समोरच्याच्या गोलंदाजीचा अपमान करण्याची क्षमता आहे. बेदरकारपणा आहे. जशी फलंदाजी तसाच स्वभावही. कदाचित तशा स्वभावाचेच प्रतिबिंब त्याच्या फलंदाजीत उतरून आले असावे. प्रत्येक चेंडू खेळताना वाट्टेल तसा निर्णय घेऊन त्याची बॅट फिरते. जीवनाच्या संघर्षातही अशाच निर्णयाचे पडसाद त्याच्या फलंदाजीत परावर्तित झालेले दिसतात. आपल्यापेक्षा तब्बल तेरा वर्षांनी प्रौढ असलेल्या दोन मुलींच्या आईशी त्याने संसार थाटला. त्या वेळी क्रिकेट क्षेत्रात हलकल्लोळ वगैरे माजला नव्हता. कारण शिखर धवन त्या वेळी रणजी स्पर्धेतच गटांगळ्या खात होता. मात्र तो ज्या समाजात राहत होता, त्या समाजात जगणे त्याला असह्य झाले होते. त्याच्या आई-वडलांना, नातेवाइकांना त्याच्या कृतीमुळे त्रास सहन करावा लागला. त्या घटनेने आजचा शिखर धवन घडला. त्या कठीण कालखंडाने त्याला खूप काही शिकविले. जीवनाच्या सामन्यात तो दररोज नव्या खेळी करीत होताच. परंतु ज्या क्रिकेट मैदानात त्याच्या नावावर फारशा धावा दिसत नव्हत्या, तेथे चक्क शतके दिसायला लागली. लग्नामुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले. शिखर धवनच्या आयुष्याला तेथूनच कलाटणी मिळायला लागली. 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंची विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात होती. 2004 साल असावे. त्याने तीन शतके ठोकली आणि त्याच्या नावाचा डंका वाजायला लागला. रणजी स्पर्धेत हळूहळू त्याचा जम बसायला लागला. मात्र त्याच्याकडून एखादी विजयी खेळी होत नव्हती. 2010चा हंगाम होता. दिल्लीला जिंकायला 136 धावाच हव्या होत्या. धवन एक खराब फटका खेळून बाद झाला आणि दिल्लीने सामना गमावला. दिल्ली रणजी स्पर्धेतूनच बाद झाली. ते अपयश त्याने मनाला फारच लावून घेतले. त्या क्षणामुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला कलाटणी मिळाली.

प्रत्येक घटना त्याच्या मनावर आघात करतानाच त्याचा गुरू होत होती. दिल्लीतील त्या फटक्याने त्याच्या मनावर एवढा प्रचंड आघात केला की त्यानंतर तो प्रत्येक फटका काळजीपूर्वक खेळायला लागला. त्याच्याकडे गुणवत्ता होती. मात्र त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाटी तो स्वत:च फारसा उत्सुक नसायचा. त्या वेळी जर कुणी त्याला सांगितले की, तू संघाला जिंकून देऊ शकला असतास, त्यावर तो तसे सांगणा-या खेळाडूंवरच हसायचा आणि म्हणायचा, मी एखादा फटका खेळेपर्यंत माझे मलाच ठाऊक नसते, की मी कोणता फटका खेळणार आहे. आता मात्र तसे नाही. मी अधिक काळ जबाबदारीने खेळून खेळपट्टीवर उभा राहिलो तर संघाला जिंकून देऊ शकतो, हे मलाच पटले आहे. आणखी एका गोष्टीचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. एकदा तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत गेला होता.

तेथे भारतीय संघाचा सराव सुरू होता. तेथे त्याने पाहिले की त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा कमी गुणवत्ता असणारे खेळाडू भारतीय संघातर्फे सराव करीत होते. तो मात्र कुंपणाबाहेरून त्यांचा सराव पाहत होता. त्याला त्या वेळी जाणीव झाली की, खरं तर या खेळाडूंच्या आधी आपण तेथे असायला हवे होते. बस्स! त्याने मनाशी खूणगाठ बांधली. फक्त एकच संधी मिळाली तरी मी त्याचं सोनं करीन. त्यानंतर घडला तो इतिहास होता. त्याच्या विचारांना खतपाणी घालणारी पत्नी त्याला मिळाली. एकेकाळी ‘पेज थ्री’ पार्टीचा हीरो म्हणून ओळखला जाणारा बेदरकार शिखर धवन लग्नानंतर एक संसारी सद््गृहस्थ बनला. त्याला जबाबदारीची प्रथमच जाणीव झाली. वयाने प्रौढ आणि दोन मुली असलेल्या ब्रिटिश, बंगाली युवतीशी तो विवाहबद्ध झाला. आएशा मुखर्जी ही स्वत: एक मुष्टियोद्धा होती. रिंगमधला संघर्ष तिने जवळून पाहिला होता. शिखरमधील गुणवत्ता आएशाला दिसली होती. त्या गुणवत्तेला ‘ट्रॅकवर’ आणण्याचे काम तिने केले. शिखर धवनने त्या वेळी सर्वप्रथम आपल्या फलंदाजीतील बचाव भक्कम केला. तो रणजी सामना खेळत असला की आएशा स्टँडमध्ये बसून त्याला प्रोत्साहन द्यायची. एक हक्काचा प्रेक्षक त्याला सतत प्रोत्साहित करीत असायचा. मैदानातून शिखर प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर हात उंचावून, कधी बॉक्स मारून तिचे लक्ष वेधायचा. त्याच्या पत्नीने चमत्कार केला. जो फलंदाज दोन-चार फटक्यांचा आणि मूठभर धावांचा म्हणून ओळखला जायचा, तो मोठमोठ्या धावसंख्या रचायला लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत सेहवागच्या जागी त्याला चंदिगड कसोटीत संधी मिळाली तेव्हा हा काय सेहवागची जागा घेणार, असाच सर्वांचा समज झाला होता. परंतु त्यानंतर शिखरने आपल्या बॅटच्या तडाख्याने त्या टीकाकारांना आणि नंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बदडून काढले. शिखरला कसोटी पदार्पणात ठोकलेल्या वेगवान शतकाबद्दल माहिती नव्हती. जेव्हा इतरांनी त्याला त्याच्या पराक्रमाबद्दल सांगितले, तेव्हा त्याला कळले. मात्र सर्वांच्या अभिनंदनापेक्षाही त्याला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले, ज्या वेळी त्याच्या मुलीने त्याला त्याचा पराक्रम सांगितला. एका कौटुंबिक संघर्षातून लाभलेले समाधान त्या वेळी त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. जो समाज त्याच्याबद्दल हेटाळणीचे सूर काढत होता, तोच समाज त्याचे अभिनंदन करायलाही आता पुढे आला होता. त्या कौतुकाने शिखर भारावला नाही. त्याआधी त्याने त्या सर्वांची कटुताही अनुभवली होती. तीन वर्षांची त्याची प्रतीक्षा फळाला आली होती. प्रथम दर्जाचे क्रिकेट तो गेली 10 वर्षे खेळत होता. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर यश त्याला वाकुल्या दाखवत होते. तमाम विश्वाला आपली ताकद दाखविण्याची संधी तो शोधत होता. चंदिगडच्या कसोटीच्या एका डावाने त्याला ती संधी मिळाली. आत्मविश्वास मिळाला. याआधी तो शतके झळकवायचा, परंतु चेतेश्वर पुजाराकडून तो बरेच काही शिकला. चेतेश्वरची धावांची भूक पाहिल्यानंतर त्याने स्वत:च्या फलंदाजीबाबतची भूमिकाही बदलली. मोठी धावसंख्या आणि धावांचे सातत्य याचे महत्त्व मला चेतेश्वरकडून उमगले, असे तो म्हणतो.

स्थानिक क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट; सौराष्ट्राकडून खेळतानाही चेतेश्वर शतक, द्विशतक, त्रिशतकासाठी खेळायचा आणि भारताकडूनही शिखरला चेतेश्वरच्या या दृष्टिकोनातून आणखी एक गुरू सापडला. संघात टिकून राहण्यासठी सातत्य हवे. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर मोठ्या धावसंख्येसाठी खेळायचे. त्यासाठीची त्याची मानसिकता तयार झाली. एक परिपक्व शिखर धवन सज्ज झाला.

ही झाली क्रिकेटपटूची परिपक्वता. प्रत्यक्ष जीवनात तो त्याआधीच परिपक्व झाला. एकदा हैदराबादमध्ये क्रिकेट खेळताना ओठावर चेंडूचा आघात झाला होता. त्या वेळी त्याला तेथे ‘प्लास्टिक सर्जरी’ करावी लागली. त्याच वेळी त्याला दिल्ली संघातही जावे लागले. दिल्ली संघाचा प्रशिक्षक विजय दहिया याने त्या वेळी एक फतवा काढला होता की, संघातील प्रत्येकाने मिशी ठेवायची व वाढवायची. शिखरनेही त्या वेळेपासून मिशी ठेवली. त्याची व्यक्तिरेखा मिशीमुळे अधिक उठून दिसायला लागली. त्याने ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. योगायोगाची गोष्ट अशी की त्यानंतर त्याचे पहिले कसोटी शतक झळकले. त्या वेळी त्याच्या फटक्यांपेक्षाही प्रसिद्धिमाध्यमांमध्ये त्याच्या या मिशीबाबतच अधिक चर्चा झाली.

काही क्रिकेटपटूंसारखे तो ठरवून वागत नाही. त्याचा ‘रानटी’ दृष्टिकोन सर्वांना थक्क करणारा आहे. त्याची देहयष्टी आणि वर्तणूक लक्षात राहण्याजोगी आहे. दिल्ली संघात तो ‘गब्बर’ या टोपणनावाने परिचित आहे. गब्बरसारखी शक्ती, आवेश त्याच्यात आहे, म्हणूनच त्याला सहका-यांनी हे नाव दिले आहे. जेव्हा त्याला क्रिकेटपटू म्हणून फारसे कुणी ओळखत नव्हते, तेव्हाही हातावर, बाहूंवर, मनगटांवर ‘टॅटू’ गोंदवून घेण्याची त्याला भारी हौस होती. नवे ‘टॅटूज’ गोंदविले की ते सर्वांनी पाहावे, असे त्याला वाटायचे. मग तो बाह्या वर करून ते सर्वांना पाहता येतील याची खात्री करूनच मग फलंदाजीला उतरायचा. त्यामुळे त्याचे अधिक लक्ष फलंदाजीपेक्षाही आपला ‘टॅटू’ सर्वांना व्यवस्थित दिसत आहे ना, याकडेच अधिक असायचे.

मोटरबाइक ही त्याची दुसरी आवड होती. बाइकवर स्वार होऊन रुबाबात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर यायचा. एकदा एका माजी खेळाडूने त्याला हटकले आणि फुरसतीने विचारले, की बेटा, ये बाइक कितने की खरीदी आपने? या प्रश्नावर अपेक्षित असलेले स्फोटक उत्तर शिखरने दिले. ‘पच्चीस लाख रुपये की.’ त्यावर तो खेळाडू म्हणाला, ‘मग तू मर्सिडीज गाडीच का विकत घेत नाहीस?’ त्यावर उत्तर आले, ‘ती पण खरेदी करीन.’ अशा खोचक प्रश्नांची शिखरला सवय झाली आहे. मदतीपेक्षा हेटाळणी करणारेच त्याला अधिक भेटले. त्यातूनच तो शिकत गेला. वेस्ट इंडियन शैलीचे क्रिकेट खेळणा-या शिखरची जीवनशैलीही कॅरेबियन बेटांवरच्या जीवनशैलीशी मिळतीजुळती आहे. परिणामांची चिंता न करता तो फटके खेळतो आणि मैदानाबाहेरचे आयुष्यही जगतो. मात्र त्या आयुष्याला वळण लावणारी पत्नी आणि दोन मुली त्याला जबाबदारीची सातत्याने जाणीव करून देत असतात. मैदानावरील जबाबदारीची जाणीव संघात त्याचे दिल्लीचे सहकारी आणि भारतीय संघाचा कप्तान, प्रशिक्षक करून देत असतात.