आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Dayanand College's Marathi Department

सामाजिक भान जपणारे मंडळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या इतकेच नाही तर शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक व महाविद्यालयीन क्षेत्रात ज्याचे नाव आदराने घेतले जाते, त्या दयानंद महाविद्यालयाची स्थापना 1940 मध्ये झाली. 1945 मध्ये मराठी विभाग सुरू झाला, तर 1952 पासून मराठी वाङ्मय मंडळाचे कार्य सुरू झाले ते आजतागायत यशस्वीपणे चालू आहे. प्रा. डॉ. शं. गो. तुळपुळे, प्रा.डॉ. त्र्यं. वि. सरदेशमुख, प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे, प्रा. डॉ. सुमती निरगुडे आणि आता मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळाचे कार्य चालू आहे. वाङ्मय मंडळाच्या कार्याची सुरुवात भित्तिपत्रकाने झाली. याशिवाय काव्यवाचन, काव्यगायन अशा कार्यक्रमांचेही उत्साहात आयोजन केले गेले. 1965 मध्ये अक्षरगंध हे भित्तिपत्रक सुरू करण्यात आले. त्यात शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे, प्रेमकविता यांचा समावेश असायचा. दयानंद महाविद्यालयाच्या या मराठी वाङ्मय मंडळाचा विशेष म्हणजे त्यांनी प्रथमपासूनच सामाजिक भान राखले. या अंतर्गत सामाजिक जाणिवांच्या कविता छंदबद्ध पद्धतीने लिहून घ्ोतल्या जात. प्रा.डॉ.नरेंद्र कुंटे यांच्याकडे मराठी वाङ्मय मंडळाचे काम आल्यानंतर त्यांनी आपल्या उपक्रमात बरेच वैविध्य आणले.

1980 च्या दशकात त्यांनी गद्य आणि भाषेला महत्त्व दिले. याशिवाय हस्ताक्षर सुंदर असावे, काव्यवाचन, सादरीकरण तसेच आवाजाला व्यावहारिक मूल्य देण्याचा प्रयत्न केला. यासाठी सोलापूर आकाशवाणीच्या अधिका-याकरवी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करविले. प्रा. कुंटे यांच्यानंतर प्रा. डॉ. सुमती निरगुडे यांनी अक्षरगंध हा भित्तिपत्रकाचा उपक्रम सुरू केला. त्यांनी संतचरित्राला व ललित निबंधाला महत्त्व दिले. दयानंद महाविद्यालयाचे सध्याचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. ते म्हणाले की, भित्तिपत्रक लेखनासाठी मुलांचा प्रतिसाद नाही, त्यामुळे विविध विषयांवर गटचर्चेच्या माध्यमातून आम्ही काम करतो. सामाजिक घडामोडी, चांगली पुस्तके, चित्रपट, कविता, गाणी यासह अगदी राज्यशास्त्र व अर्थशास्त्रावरही आम्ही दर पंधरा दिवसांतून चर्चा करतो. मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलही मराठी वाङ्मय मंडळातर्फे आम्ही चर्चा घडवून आणली. ललित लेखनाबरोबरच समाजाविषयीचे भान सजगतेने देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे प्रा.डॉ.शिंदे म्हणाले. प्रा. डॉ. देविदास गायकवाड यांच्यासह सोलापुरातील सर्व साहित्यिक व कवींचे मोठे सहकार्य लाभले. मराठी वाङ्मय मंडळाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण सूट देण्यात आली असून त्यातूनच त्यांची प्रतिभा फुलते. या उपक्रमांसाठी वर्षभर 35 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात. भित्तिपत्रकासाठी तृतीय वर्षाचा विद्यार्थी हा कार्यकारी संपादक असतो, त्याला द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सहायक संपादक म्हणून काम पाहतो. एकूण सात विद्यार्थ्यांचे संपादक मंडळ काम करते. सोलापूरच्या महाविद्यालयीन क्षेत्रात दयानंद महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे कार्य असेच बहरत राहो ही शुभेच्छा.