आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वीकाराचे फळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यसनाधीन व्यक्ती व्यसन करून आल्यानंतर मी तसे काही केले आहे, अथवा काही चूक केली आहे, याचा स्वीकार करत नसते. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेते. नंतर नंतर तो बेडर वृत्तीचा बनून उघडपणे व्यसन करून व्यसनाच्या आहारी जातो. ते सोडविण्यासाठी त्याला अनेक सायास करावे लागतात. परंतु, अशा व्यक्तींना उपचार देताना स्वीकाराची जाणीव जर आपण करून दिली तर ती व्यक्ती व्यसनमुक्त होण्यास मदत होते.

साधारण तीन-चार वर्षांपूर्वी भिकाभाई नावाचे एक प्रथितयश व्यापारी व्यसनमुक्त होऊन गावी गेले. अर्थात, त्यांचा-माझा फोनवर सतत संपर्क होताच. सुरुवातीस प्रत्यक्ष घरातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यांचे पूर्वायुष्य लक्षात घेऊन आर्थिक व्यवहार पूर्णत: त्यांच्या हातात दिलेला नव्हता. मुलीच्या व मुलाच्या विवाह जुळवणीत मागील सवयीचा विषय वारंवार अडचणीत आणत होता. तेव्हा त्यांना रिहॅब आणि सहनशीलता- थेरपीचा खूप उपयोग झाला. ज्यामध्ये समोरील व्यक्तीने कितीही खालच्या थराला जाऊन, अपशब्द वापरून, क्वचित प्रसंगी हात उचलला तरीदेखील मनावर संयम राखण्याची कला शिकविली जाते. त्यामुळे कठीणात कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग सुलभ होऊन समोरच्याची चूक त्याच्या लक्षात येऊन तो लज्जित होतो. थोड्या कालावधीनंतर समाज, घर, परिवार, नातेवाईक मंडळी त्याचा ‘सोबर’ म्हणून आनंदाने स्वीकार करतात.

साधारणत: आठ वर्षांपूर्वी मनोज नामक तरुण रिहॅबमध्ये दाखल झाला. सुरुवातीचे आठ दिवस आपण व्यसनी आहोत, हे स्वीकारण्यासच तो तयार नव्हता. परंतु थोड्या दिवसानंतर त्याची व्यसनमुक्ती उपचाराबद्दल जिज्ञासा वाढत गेली. इतरांचे अनुभव ऐकत असताना त्याला त्याच्याबद्दलचे घडलेले प्रसंग आठवत गेले, व स्वत:तील दोष समजू लागले. एका क्षणी त्याने आपण व्यसनाधीन आहोत, हे वास्तव स्वीकारले. तसेच स्वत:तील गुण-दोष, निराशा, हेकेखोरपणा टाळून सुधारण्याचा निश्चय केला. गुणदोष सुधारत असताना मागील आयुष्यात केलेल्या चुका व त्यामुळे झालेले दुष्परिणाम हे त्याच्या लक्षात येत गेले. हे लक्षात येत असताना त्याला स्वत:मधील दोष कशा प्रकारे सुधारतील, हेही समजू लागले. परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी, हे समजले. चार महिन्यांनंतर तो संमती घेऊन घरी भेटण्यास गेला, त्या वेळेस मी त्याला वागणूक कशी ठेवावी, याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे तो वागला. परंतु तीन दिवसांनंतर तो परत रिहॅबमध्ये आला. ‘मी बदललो म्हणजे पूर्ण जग बदलले’, असा बहुधा त्याचा भ्रम होता. परंतु असे काही झाले नव्हते. तेव्हा मी त्याला एकच आठवण करून दिली की, तुला जगाप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणावा लागेल. म्हणजे तुला संयम ठेवून सर्व गोष्टींचा स्वीकार करावा लागेल.

याप्रमाणे पुन्हा मनोजने नवीन जोमाने उपचार केले. त्यातून बाहेर पडून त्याने सुरुवातीला त्याला आवडणा-या खाजगी इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना त्याच्यातील व्यवसाय करण्याची महत्त्वाकांक्षा वाढली. त्याच दृष्टीने त्याने नोकरी करत असतानाच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना त्याला समाजामधून योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणजेच, समाजाचा त्याच्यावर अजून पूर्णपणे विश्वास बसलेला नव्हता. तरी पण त्याने संयम बाळगून एकेरी लढत चालू ठेवली. त्यामध्ये तो यशस्वी होऊन, चांगला व्यावसायिक बनला. लग्नासाठी प्रयत्न चालू केले, त्यातसुद्धा तो यशस्वी होऊन त्याचे लग्न झाले व समाजामध्ये त्याला पुन्हा मानाचे स्थान मिळाले. आजमितीला त्याला एक मुलगा आहे, आपला व्यवसाय तो चांगल्या प्रकारे सांभाळतोय. एकूणच त्याने संयम बाळगल्यामुळे समाजाने त्याचा स्वीकार केला. यावरून मला असे सांगावेसे वाटते की, समाज नेहमी चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतोच, पण त्यासाठी संयम महत्त्वाचा ठरतो. त्या अर्थाने स्वीकाराची तयारी आणि संयमी वृत्ती माणसाला दुष्टचक्रातून सोडवण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरते.
nileshsoberlife@gmail.com