आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्तीचा खेळकर मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या रिहॅबमध्ये हेमेक्स पटेल नावाचा तरुण दाखल झाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. तरुण, गोरापान व बांधेसूद शरीराचा हेमेक्स मनमोकळा तर होताच; पण स्वभावाने अतिशय खेळकर, सतत हसणारा आणि हसविणाराही होता. त्याचा असा स्वभाव बघून माझ्या मनात विचार आला, माणसाचे व्यसन अशाच खेळकर पद्धतीने आटोक्यात किंवा संपुष्टात आणता आले तर? आणि मी त्या प्रयत्नात लागलो.

याविषयी अभ्यास करताना जाणवत गेले की, मन प्रसन्न व हलके केल्यावर, सहजरीत्या दडपण न घेता हसतखेळत कोणतीही गोष्ट सांगितली की, ती दुस-याच्या मनात खोलवर रुजते. कायमस्वरूपी लक्षात राहते. त्यासाठी विशेष सायास करावे लागत नाहीत. मग आमच्या सेंटरमध्ये हा प्रयोग मी राबवण्यास प्रारंभ केला...
एक दिवस हेमेक्स नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आला. येताना व्यसन करून आला होता. सोबत येताना आणखी दारू त्याने आणली होती. आई-वडील व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक होते. श्रीमंतीत वाढलेल्या हेमेक्सला वाईट संगतीमुळे व्यसनाची सवय लागली होती. त्याचे लग्न झालेेले होते. त्याला व्यसन करून आलेले बघितल्यावर नेहमीप्रमाणे पत्नीचा संताप झाला. त्याला तिने समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्या खेळकर स्वभावानुसार आजदेखील तो तशाच पद्धतीने वागत होता. परंतु ही बाब हसण्यावारी नेण्याची नाही, हे पत्नीने वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्या बोलण्यास मस्करीत घेऊन हेमेक्स आपल्याच व्यसनात मश्गुल राहिला. शेवटी पत्नी चिडली. ‘मीच संपवून घेते स्वत:ला कायमची. तुमच्या आयुष्यातून निघून जाते, मग हवे तसे व हवे तेवढे व्यसन करा’, असे म्हणून हेमेक्सला केवळ घाबरवण्यासाठी रॉकेलची कॅन घेऊन अंंगावर ओतू लागली. ते झाल्यावर आगपेटी आणून पुन्हा एकदा त्याचे लक्ष वेधण्याचा तिने प्रयत्न केला. त्याला वठणीवर आणण्याच्या इराद्याने काडी ओढली आणि अचानक साडी पेटली. भराभर जळू लागली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. हेमेक्सला हे धक्कादायक चित्र समोर दिसताच तो तिला वाचवण्याचे प्रयत्न करू लागला. तिला शेजा-यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत ती ७० ते ८० टक्के भाजली होती.
महिनाभर तिच्यावर उपचार चालू होते. त्या दरम्यान तिने त्याला आता तरी तुझ्या व्यसनाला आग लावशील का, असा शेवटचा प्रश्न करून जगाचा
निरोप घेतला...
पत्नीच्या जाण्याने खेळकर असणारा हेमेक्स आता मात्र उदास होऊ लागला. सतत तोच तोच विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला. शेवटी, सहनशीलता संपली आणि तो पुन्हा एकदा तो व्यसनाधीन झाला. घरच्या लोकांनी आमच्या रिहॅबचा फोन नंबर शोधून त्याला दाखल केले.
आठ/दहा दिवसांत तो बोलण्याच्या अवस्थेत आला. त्याने त्याची ही सर्व शोकांतिका सांगितली. निश्चयी स्वरात म्हणाला, ‘सर, माझ्या पत्नीने माझ्या व्यसनाला विनाकारणच गंभीरपणे घेतले. मी व्यसन करतो म्हणजे फार मोठा गुन्हेगार आहे, असा समज तिने करून घेतला आणि संसाराचा सारीपाट उधळला, नाही का?’
हेमेक्सच्या बोलण्यात अजूनही खेळकरपणा होता, पण परिणामांबाबतची बेफिकिरीही होती. हा त्याचा अवगुण होता आणि सगळ्यात मोठा गुणही. मी विचार केला, असे अनेक हेमेक्स पुन्हा घडायचे थांबवायचे असतील तर हसतखेळत व्यसनमुक्त होता येते, हा ठाम विचार समाजात रुजवण्याची हीच योग्य वेळ आहे. झालेही तसेच. व्यसनी व्यक्तींना व्यसनाचे गांभीर्य न दाखवता त्याच्यापासून होणा-या ‘परिणामांचे गांभीर्य’ हसतखेळत मनावर रुजवले, तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळतोच. हेमेक्सच्या बाबतीत तेच घडले...
हसतखेळत व्यसनमुक्त झालेल्या आणखी एका तरुणाची ही कथा. तालुक्याच्या गावी राहणारा जितेंद्र पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी अर्जफाटे करून आज ना उद्या आपणास कॉल येईल, ही आशा धरून वाट पाहत होता. असाच निराश अवस्थेत भटकत असताना त्याच्याचसारख्या नोकरीच्या शोधात असलेल्या पण व्यसन करणा-या मित्रांची ओळख झाली. तो त्यांच्या समवेत राहू लागला. त्याचे त्यालाच कळले नाही की, आपण कधी व्यसनाधीन झालो. त्याच्या लक्षात आले, त्याला बराच उशीर झाला होता. जो-तो त्याला त्याच्या बरोबरीच्या मित्रांचे नोकरी-व्यवसायविषयक गुणगान गाऊन टोचून बोलत होता. ज्यामुळे अधिक नैराश्यग्रस्त होत चाललेला जितेंद्र अधिकच अबोल होत गेला.
व्यसनाचा परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन भ्रमिष्टासारखा वागू लागला. शेवटी त्याचादेखील परिणाम न झाल्याने त्याला रिहॅबमध्ये दाखल केले गेले. रिहॅबमध्ये इतरांसोबत जितेंद्र राहू लागला. त्याला हसत्या-खेळत्या वातावरणात प्रसन्न वाटू लागले. त्याला व्यसनाचे गांभीर्य न दाखविता त्याच्यापासून होणा-या परिणामांचे गांभीर्य हसतखेळत समजावून सांगितले, जे त्याच्या अंतर्मनाला भिडून कायमचे लक्षात राहिले. एकेदिवशी मी त्याला नोकरीसाठी अर्ज करण्याविषयी सुचवले. त्याने अर्ज केला. खरोखरीच त्याला प्रामाणिक प्रयत्नांचे फळ मिळाले. तो सरकारी पदावर नियुक्त झाला. आज तो सुखासमाधानाने आयुष्य जगत आहे. त्याचा खरा आनंद मलासुद्धा झाला. हसतखेळत मनुष्य व्यसनमुक्त होऊ शकतो, यावर माझा
विश्वास दृढ झाला.
nileshsoberlife@gmail.com