आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञाताकडे... !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेत होते, तेव्हाची एक गोष्ट. दीपाली नावाची एक गर्भवती मुलगी तपासणीसाठी नियमित येत असे. मॅडम माझं बाळ स्वप्नात येतं माझ्या आणि हात हलवून मला टाटा करतं, असं तिने दोन-तीन वेळा सांगितलं. आम्ही ते सहज गंमत म्हणून ऐकून घेतलं. कामाच्या आणि अभ्यासाच्या ताणात ते विसरूनदेखील गेलो. एके रात्री आली, ती प्रसववेदना घेऊन. बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकूच येत नव्हते. मागच्या आठवड्यात, बाळ फारसं हालचाल करत नव्हतं, म्हणाली ती. तेव्हा सोनाग्राफीची सोय कुठेच नव्हती. प्रसूती झाली. बाळ मृतावस्थेत होतं! बाळाने स्वप्नात येऊन तिला टाटा करण्याचा असा अर्थ होता तर! काय असावा हा संकेत? की उगीच मनाचे खेळ फक्त?
आजही या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. पण दीपालीची प्रसूती झाल्यावरचा मृत बाळाचा तो विचित्र स्पर्श आठवला; की मात्र शरीरात रक्ताऐवजी बर्फाची नदी अवतरते, असंच मला वाटतं. नवीन जीव जन्माला येण्याचा आनंद आनंदासोबत उत्साह घेऊन येत असतो. आणि हाच जीव मृत झाला, की तत्क्षणीच त्याची प्रचंड भीती वाटू लागते. बाईच्या जिवंत शरीरात बाळाचे मृत शरीर, ही कल्पनाच नातेवाइकांना फार भयंकर वाटते. आणि मग त्या परिस्थितीत बाळाच्या मृत्यूचे दु:ख थोडे बाजूला पडून, बाईची सुखरूप सुटका महत्त्वाची ठरते. मृत्यू गूढ तितकाच भीतिदायक असतो! काही वर्षांनंतरची अजून एक घटना. मी भोकरला रविवारी जात असे. खेड्यातून एक बाई आणली गेली. प्रचंड ताप. नववा महिना. बाई जवळपास पांढरी पडलेली. बाळ पोटातच मृत झालेलं. प्रसूतिचं चिन्ह दिसेना. नांदेडला आणून सिझेरियन केलं. सिझेरियनपूर्वीच ती म्हणाली, ‘बाई मी चालले बरं आता.’ मला दचकल्यासारखं झालं! ऑपरेशननंतर थोडी सुधारली. ताप उतरला. अचानक पुन्हा ‘आता नको इंजेक्शन बाई मी जाते.’ असंच म्हणत, ती पुढे चोवीस तासात उपचारांना न जुमानता गेलीच कायमची.
कळत असेल का माणसांना आपला शेवटचा प्रवास? शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्टपणे स्वत:चं नाव ती नीट सांगत होती; गंगाबाई असं. सहज बाहेर जाणार असल्यासारखं ‘मी जाते’ असं म्हणत होती, अन् तशीच गेली! तिचे नातेवाईक आजदेखील माझ्याकडे येतात. विषय निघाला की मला पुन्हा बर्फाची नदी शरीरात आकारास येतेय, असंच वाटतं क्षणभर.
काय असेल, तिचा हा अनुभव नेमका? कोणत्या प्रदेशात ती जाऊन आली असावी?
तिचं नाव मनकर्णाबाई. एक उतारवयाची सुभद्राबाई. गर्भाशय बाहेर पडायचं तिचं. तपासणी करून शस्त्रक्रिया करून टाकू, असं मी तिला सांगितलं, तर पटकन टेबलवरून उतरली आणि म्हणाली, ‘ऑपरेशन नाही बाई, मला जायचं हाय.’ मी विचारलं, ‘कुठे जायचं आहे? जाऊन आल्यावर करू ऑपरेशन.’ तर म्हणाली, ‘वापस यायचं नाही. विठोबाजवळ जायचं हाय आता.’ मी हसले. ‘तसं तर सगळ्यांनाच जावंच लागणार आहे गं बाई, पण तुला गरज आहे ऑपरेशनची’, असं बोलणं सहजपणानं झालं तिच्याशी. दोन-तीन महिन्यानंतर तिची मुलगी आली, बाळंतपणासाठी; तर ही बाई दिसली नाही. आई कधी येणार, विचारलं मी तर ती मुलगी म्हणाली, ‘आई कुठली येणार आता? गेली मागच्या महिन्यात.छातीत दुखलं आणि नांदेडला पोहोचेपर्यंत रस्त्यातच जीव गेला तिचा.’
इतक्या सहजपणानं स्वत:च्या मृत्यूची चाहूल कशी लागली असेल, या लोकांना? कळतच नाही. एलिझाबेथ रॉस नावाच्या एका बाईनं मरणासन्न अवस्थेतील पाचशे व्यक्तींच्या सहवासात राहून मृत्युपूर्व मानसिकतेचा सखोल अभ्यास केलेला आहे. ज्या व्यक्तींना आपला मृत्यू नजीक येऊन ठेपला, हे माहीत असतं; ती माणसं पाच अवस्थांमधून जातात, असा तिचा अभ्यास सांगतो. पहिली प्रतिक्रिया अर्थातच नकाराची असते. त्यानंतर त्रागा, कटुता, मग नंतर इतक्यात नको मरण; थोडे दिवस अजून हवेत, अशी अवस्था अन् शेवटी हतबलतेने, नाइलाजाने मृत्यू या कटू सत्याला सामोरे जातात लोक. हृषीकेश मुखर्जींचा अविस्मरणीय चित्रपट ‘आनंद’. यातला नायक मात्र अपवाद. तो अशा पाच अवस्थांमधून न जाता हसतखेळत मृत्यू स्वीकारतो. अर्थातच, असे ‘आनंद’ दुर्मिळ असतात. पण मी जे प्रसंग अनुभवले आहेत, ते फारच विलक्षण आहेत. ही माणसं काही आध्यात्मिक प्रकृतीची नव्हेत, की फार कुठला अभ्यास केलेली नव्हेत; साधी सरळ माणसं, पण अनुभव मात्र अगदी विचार करायला भाग पाडणारे असे. माणसं मृत्यूचं नाव घेणंदेखील टाळतात. मृत्यू हेच खरे तर अंतिम सत्य आहे. परंतु ते कुणीच स्वीकारत नाही. मृत्यूबद्दल विचारदेखील करणं माणसाला नकोसं वाटतं. पण माणसाच्या जीवनाला जो काही अर्थ प्राप्त होतो, तो मात्र या मृत्यूमुळेच. मृत्यूबाबतचं गूढ मात्र उकलत नाही. तो कधी येणार, कसा येणार, कळतच नाही. माझ्या अनुभवात आलेले हे सगळे प्रसंग मला आणखीन कोडं घालणारे. गेली तीस वर्षे हा व्यवसाय करताना सृजनाचे सोहळे आणि अनाहूत मृत्यूचे वेगवेगळे आविष्कार पाहावेच लागले. या व्यवसायातील तो अटळ भाग आहे. सगळ्या डॉक्टरांना अशा क्षणांना सामोरं जावंच लागतं. तरीही मृत्यू या घटिताची सवय मात्र होतच नाही. खरं तर मृत्यूची ही घटना म्हणजे केवढे मोठे उपकार आहेत मानव जातीवर!
‘मौत तो एक बेजरर शै है।
घाव जो भी है, जिंदगी का है।’
vrushaleekinhalkar@yahoo.com