आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Declining Of Biodeversity By Shahaji Pawar

जैवसंपदेचा अक्षम्य नाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘काय नरकट वास इतुया. दुसरं काय, भावशाच्या म्हशीचा मुडदा टाकला आसल. आमच्या काळात हजारोंशी गिधाडं हुती. घटका-चार घटकात जनावराचा मुडदा फस्त करायची. उरल्या हाडावर कोल्हे-रानकुत्रे तर्र... तुमच्या दवापाण्यानं (डायक्लोफिनेक) गिधाडं नेली. झाडाझुडपावर फिरविलेल्या नांगरा-कु-हाडीनं कोल्ह्या-लांडग्याचे संसार मोडले. आता भोगा करमाची फळ...’
शेताला जाताना दिंडेगावचा रानबा आपल्याच थोरल्या नातवाला उद्वेगाने मनातली खदखद सांगत होता. कधीकाळी स्वच्छ हवा अन् शुद्ध पाण्याचा सुकाळ असलेला त्याचा गाव पाखरांच्या किलबिलाटानं जागा व्हायचा. आता चिमणीच्या चिवचिवाटालाही रानबाचे कान पारखे झाले आहेत. रानबाचे हे निरीक्षण भलेही त्याच्या गाव-शिवारापुरते सीमित असेल, पण अख्ख्या विश्वाचे हेच आर्त ‘वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड’ व ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात उमटलंय. नैसर्गिक अधिवासांवर आलेल्या मानवी अतिक्रमणांमुळे गेल्या चार दशकांत वन्यजिवांची प्रचंड वाताहत झाली आहे. स्वार्थाच्या या धगीने जमीन, वाळवंट, नद्या-सागरांनाही सोडलेले नाही. हा अहवाल तयार करताना जगभरातील ३ हजार ३८ प्रकारच्या भूचर, जलचर व उभयचर प्रजातींचे निरीक्षण-परीक्षण करून पर्यावरणातील सद्य:स्थितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार लिव्हिंग प्लॅनेट बनवून प्रजातींच्या संख्येतील घट वा वाढ नोंदवण्यात आली आहे. यानुसार, समशीतोष्ण कटिबंधातील जैवविविधतेत ३६, उष्णकटिबंध ५६, तर लॅटिन अमेरिकेतील जैवविविधतेत तब्बल ८३ टक्के घट आढळली आहे. गरीब देशांत घटीचे प्रमाण ५८, तर मध्यम उत्पन्न गटातील देशांत १८ टक्के दिसून आले आहे. अर्थात, प्रगत राष्ट्रांत जैवविविधेतेत १० टक्के वाढ झाल्याचा दाखला मिळाला असला तरीही जागतिक पातळीवर एकूणच झालेला नाश म्हणजे, अशाश्वत विकासाची ही फलश्रुती असल्याचे अहवाल सांगत आहे. लागवडीपेक्षा कितीतरी अधिक पटीने वृक्षतोड होत आहे. पावसातून मिळणा-या पाण्यापेक्षा नद्या अन् भूजलातला उपसा प्रचंड आहे.
जंगले अन् सागरांनीही हात टेकावेत एवढा कार्बन डायऑक्साइड वातावरणात फेकला जातोय. या सा-याने पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचे हा अहवाल सांगत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वर्तमान वापर पाहता संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीच्या आकारापेक्षा दीडपट मोठ्या नैसर्गिक संपत्तींनी युक्त अशा नव्या पृथ्वीची गरज अहवालाने वर्तवली आहे. त्यात अमेरिका व इंग्लडमध्ये होत असलेला नाश भरून काढण्यासाठी अडीच ते चारपट मोठी पृथ्वी लागेल, अशी मार्मिक टिप्पणीही अहवाल करतो. पण अशी जैवविविधतेने संपन्न पृथ्वी आणायची कोठून?
जैविक प्रणालीचा गाभा असणा-या नद्या रसायनमिश्रित पाण्याने आजारी पडल्या आहेत. त्यातील जलचरांचेही आरोग्य बिघडले आहे. १९७० नंतर गोड्या पाण्यातील जलचरांच्या संख्येत ७५ टक्के घट आढळली आहे. नदीपात्रावर उभारलेल्या बांधांनी नद्यांचे तुकडे झाल्याने तिचे नैसर्गिक प्रवाहीपण हरवले आहे. पाण्याच्या आरोग्यातही बिघाड झाला आहे. सिंचनासाठी होत असलेला अमर्याद जलउपसा, प्रदूषणयुक्त पाणी, बांधामुळे अडलेले स्थलांतर मार्ग, आजार व अमर्याद मासेमारीमुळे युरोपियन ‘ईल’ मासा संकटग्रस्त झाला आहे. ‘हेलेबेडर सेलेमेडर’ या मत्स्य प्रजातीचीही जवळपास पूर्णपणे वाताहत झाली आहे. भारतातील गंगा नदीत कारखान्यांतून सोडल्या जाणा-या अब्जावधी लिटर्स रसायनयुक्त पाण्याचा उल्लेखही अहवालात ठळकपणे करण्यात आला आहे. गेल्या ४०-५० वर्षांच्या कालावधीत लोकसंख्या चार, तर पाणी वापर सात पटीने वाढला आहे. तहानलेल्या जगात मानवजात वावरत असल्याचे वास्तव अहवालाने मांडले आहे.
विकासाच्या नावावर आलेली व येत असलेली वनराईवरील संक्रांत, माळराने, गवताळ प्रदेशाचा ऱ्हास व अमर्याद शिकारींमुळे १९७० नंतर सुमारे ४० टक्के वनचरांचा सफाया झाला आहे. हस्तीदंताच्या हव्यासातून झालेल्या शिकारींमुळे पूर्व व मध्य आफ्रिकेतील आफ्रिकन जंगली हत्तींची संख्या अवघी ६ टक्के उरली आहे. २०११ ते १२ सालात हस्तीदंतासाठी हत्ती मोठ्या संख्येत मारले गेले. शिवाय जंगलतोडही झाल्याने हे अरिष्ट ओढवले आहे. नैसर्गिक वसतिस्थानाच्या अभावामुळे बांगलादेशातील ‘हुलाक गिबन’ माकडांचा १९८६ ते २००६ या कालावधीत ५० टक्के सफाया झाला आहे. युरोपात आढळणारा गवताळ युरोपीयन विषारी अजगर तसेच विषारी सापांच्या आठ प्रजाती शेवटच्या घटका मोजत आहेत. शिकारीमुळे घानातील आफ्रिकन सिंहांची संख्या ४० टक्के घटली आहे. विनाशाच्या गर्तेत समुद्री जीव-वनचरांप्रमाणे समुद्री जलचरांची संख्या ४० टक्के घसरली आहे. त्यात समुद्री कासव पहिल्या क्रमांकावर आहे. शिकार, अधिवासांची मोडतोड व मासेमारांचे जाळे या प्रजातीच्या जिवावर उठली आहेत. या संकटाने कासवांची संख्या ८० टक्के घटवली आहे. मेडेटेरियन सागरात आढळणारा आखूड चोची कॉमन डॉल्फिन अर्मयाद मासेमारीमुळे संकटात आला आहे. दक्षिण जॉर्जिया येथील पाहणीत भटक्या अलबेट्रॉस पक्ष्यांची संख्या ५० टक्के घटल्याचे आढळले आहे.
बॉम्बे नॅचरल सोसायटीचे पक्षी अभ्यासक सुजित नरवडे म्हणतात, आपण एक प्रकारे मृत्यूच्या कराल दाढेत वसुंधरेला घेऊन जात असल्याचे अहवाल सूचित करतोय. तरी कृतिशील सजगता आपल्यात जागायला हवी. महाराष्ट्रात अजूनही आपण अपेक्षित पर्यावरण साक्षरता आणू शकलो नाही. वृक्षतोड, खारफुटीचा नायनाट, भराव टाकून उभारल्या जाणा-या इमारती व औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने सागरी किनारपट्टी धोक्यात आली आहे. सातपुड्याच्या रांगांना कोळसा खाणींनी वेढले आहे. दख्खनची समृद्ध माळराने तुकड्या-तुकड्यात विभागली जात आहेत. पश्चिम घाट व सातपुड्याच्या पर्वतरांगांत राखीव वनक्षेत्राचा अभाव असल्याने ती माळराने अशाश्वत विकासासाठी जणू खुलीच आहेत. अधिवासाची वाताहत, शिकारी तसेच अन्य कारणांमुळे महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या ४८ प्रजाती संकटग्रस्त झाल्या आहेत. गिधाड, माळढोक, तणमोर अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अर्थात, या संकटातही आशेचा किरण अभ्यासकांना दिसतो आहे. ‘२०१५मध्ये जागतिक पर्यावरणाविषयक करारासाठी सर्व राष्ट्रे एकत्र येतील, तेव्हा शाश्वत विकासाची धोरणे बनवण्यासाठी मोठी मदत होईल. ती या निसर्गनाशाची चक्रे उलटी फ‍िरवण्यास आपणास संधी प्राप्त करून देईल’, असा आशावाद वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे प्रमुख व्यवस्थापक डेव्हिड नुसबॉम मनी बाळगून आहेत. निरोगी व सुखकर भविष्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे, ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. फुले-पाखरे, नद्या-सरोवरे हे वसुंधरेचे अलंकार आहेत. या अलंकारांविना अस्तित्वात असलेली पृथ्वी तुम्ही स्वीकाराल? याचे उत्तर नकारार्थी आहे.
‘वन्यजिवांचे हित
केंद्रस्थानी यावे’
हा अहवाल ठरावीक प्रजातींच्या संख्येवर आधारलेला आहे. त्यामुळे, सर्वच प्रजातींचे सर्वंकष चित्र समोर येत नाही. या विश्लेषणात भारतातल्या वन्यजिवांचा समावेश नाही. त्यासाठी भारतीय प्रजाती निवडून त्यांचा दीर्घकालीन अभ्यास होणे गरजेचे आहे. वन्यजिवांची गरज लक्षात घेऊन व त्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून वन्यजीव कायद्याची अंमलबजावणी करणे ही आजची पहिली गरज आहे.
- सुजित नरवडे,
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
shahajipawar71@gmail.com