आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Defence Stratagy By Parag Purohit, Divya Marathi

सागरी दरारा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांततेसाठी प्रथम सामर्थ्यवान असण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीची आयएनएस कोलकाता ही अत्याधुनिक स्टिल्थ विनाशिका राष्ट्राला अर्पण करताना अलीकडेच व्यक्त केली. आयएनएस कोलकाता ही कोलकाता श्रेणीतील पहिली विनाशिका आहे. या स्टिल्थ विनाशिकांच्या बांधणीचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट-15 ए’ नावाने राबविला जात आहे. त्याद्वारे कोलकाता, कोची आणि चेन्नई या विनाशिकांची बांधणी मुंबईच्या माझगाव गोदीत करण्यात येत आहे.
कोलकाता श्रेणीतील युद्धनौका नौदलाच्या पश्चिम विभागात कार्यरत असणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने अरबी समुद्रापासून सुएझ कालव्यापर्यंत विस्तारलेले असणार आहे. ‘प्रोजेक्ट-15 बी’द्वारे दाखल होणा-या ‘बंगळुरू’ श्रेणीतील विनाशिका नौदलाच्या पूर्व विभागात कार्यरत असणार आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र दक्षिण चीन सागरापर्यंत विस्तारलेले असणार आहे. त्यातील पहिली विनाशिका 2018पर्यंत भारतीय नौदलात सामील होणार आहे. दरम्यानच्या काळात ‘नाविक राजनया’च्या (नेव्हल डिप्लोमसी) माध्यमातून ‘कोलकाता’ श्रेणीतील युद्धनौका मलाक्काची खाडी आणि त्यापलीकडे जातील. यातून होणारे शक्तिप्रदर्शन भारतीय नौदलासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. हिंदी महासागरातील भारतीय नौदलाचा प्रभाव टिकवून ठेवण्यात आणि चीनच्या या महासागरातील वाढत्या नाविक हालचालींवर लक्ष ठेवण्यात ‘कोलकाता’सारख्या विनाशिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सध्या चीनकडे स्टिल्थ विनाशिका नसल्या तरी भविष्यात त्या चिनी नौदलात येण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, चीनने स्टिल्थ लढाऊ नौका बांधण्यास एव्हाना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोलकाता’च्या सामिलीकरणामुळे भारतीय नौदलाचा आत्मविश्वास वाढण्यासही मदतच होणार आहे.
व्यापारी, आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने चीनने अलीकडील काळात आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. परंतु त्यासाठी चीनला हिंदी महासागरातून जाणा-या जलमार्गांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे या मार्गांच्या सुरक्षेसाठी चीनने हिंदी महासागरात अत्यंत धूर्तपणे नौदलाच्या हालचाली वाढविलेल्या आहेत. भारताच्या शेजारील देशांमध्ये तळ विकसित करून हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ नौदल असलेल्या भारतीय नौदलाला आव्हान देण्याचा डाव चीनकडून खेळला जात आहे. त्याचबरोबर सोमाली चाचांपासून आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी चीनसह जगातील प्रमुख देशांनी आपल्या युद्धनौका एडनच्या आखातात तैनात केल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय नौदलाची चिंताही वाढली आहे. या वर्षी चीनने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केलेली अणुपाणबुडी दक्षिण हिंदी महासागरात पाठविली होती. भविष्यात चीनकडून विमानवाहू जहाजेही हिंदी महासागरात धाडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविकत: जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदी महासागरातील जलवाहतूक सुरळीत चालू राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातच जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, आग्नेय आशिया देशांसाठी या जलमार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण बनले आहे. त्यामुळे त्या देशांनी भारताशी नाविक सहकार्य वाढविले आहे. परिणामी हिंदी महासागरातील जलवाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालू ठेवण्याची आंतरराष्‍ट्रीय जबाबदारी भारतीय नौदलावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर, कोलकाता श्रेणीतील विनाशिकांमुळे भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय दरारा वाढविण्यास मदत होणार आहे.
या दशकाच्या अखेरीपर्यंत भारतीय नौदलात दोन विमानवाहू युद्ध ताफे (कॅरियर बॅटल ग्रुप) कार्यरत केले जाणार आहेत. त्यात कोलकाता श्रेणीतील युद्धनौकांचाही समावेश असणार आहे. त्या वेळी विमानवाहू जहाजाचे संरक्षण, ताफ्यातील अन्य युद्धनौका-पाणबुड्यांचे संरक्षण, विविध युद्धनौकांमध्ये समन्वय अशा विविध भूमिका ‘कोलकाता’ एकाच वेळी पार पाडणार आहे. कोलकाता श्रेणीतील युद्धनौकांची प्रहारक्षमता त्यांच्यावर बसविलेल्या 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांमुळे नि:संशयपणे वाढलेली आहे. ब्रह्मोस हे प्रामुख्याने जहाजभेदी क्षेपणास्त्र असून जगातील एकमेव क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या बळावर हिंदी महासागरातील भारताच्या राष्टÑहितांना आव्हान देणा-या कोणत्याही देशाच्या नौदलाचा या विनाशिका प्रभावीपणे प्रतिकार करू शकतील. यावर बराक-1 व बराक-8 ही जमिनीवरून हवेतील लक्ष्यांवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रेही बसविण्यात आलेली आहेत. त्याद्वारे शत्रूच्या विमानांना, क्षेपणास्त्रांना आणि हेलिकॉप्टर्सना या युद्धनौकेजवळ येण्याआधीच नष्ट करणे शक्य होणार आहे. शत्रूच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांवर हल्ला चढविण्यासाठी यावर आधुनिक पाणतीर (टोर्पेडो) आणि रॉकेट्सही बसविलेली आहेत. चीनने दक्षिण चीन सागरातील हैनान बेटावर पाणबुड्यांचा भूमिगत तळ सुरू करून, भारताच्या सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेच; शिवाय आग्नेय आशियातील भारताच्या सामरिक हितांसाठीही हा तळ बाधक ठरत आहे. अशा परिस्थितीत कोलकाता विनाशिकेची पाणबुडीविरोधी क्षमता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एकीकडे, अरबी समुद्रात पाकिस्तानकडून भारताच्या सुरक्षेला कायमच आव्हान देण्याचे प्रयत्न होत आहेत. अलीकडील काळात पाकिस्तानच्या युद्धनौकांचा त्याच्या सागरी सीमेबाहेर वावर वाढला आहे. अशा परिस्थितीत ‘कोलकाता’च्या मदतीने पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवर नियंत्रण मिळणे शक्य होणार आहे. कोलकाता श्रेणीतील युद्धनौका स्टिल्थ युद्धनौका असल्याने शत्रूच्या रडारवर त्यांचे अत्यंत कमी प्रमाणात सिग्नेचर उमटतात. शत्रूच्या रडारवर ही एक छोटीशी नौका असल्याचा भास होतो. अत्याधुनिक संपर्क साधनांच्या मदतीने हिंदी महासागर किंवा त्याही पलीकडे संचार करत असताना या विनाशिकेचा उपग्रहाच्या साहाय्याने मुख्यालयाशी संपर्क राखणे शक्य होणार आहे. त्याच वेळी आसपासच्या परिसरात असलेल्या भारताच्या इतर युद्धनौकांशी संदेशांची आणि माहितीची देवाणघेवाण आणि विश्लेषण करण्यासाठी एक माध्यम म्हणून ‘कोलकाता’चा उपयोग होणार आहे. या देवाणघेवाणीत शत्रूला शिरकाव करता येऊ नये, याचीही विशेष काळजी घेता येणार आहे. अलीकडील काळात आग्नेय आशिया आणि जपान, दक्षिण कोरिया यांच्याबरोबर भारताचे संबंध बळकट होत आहेत. या क्षेत्रातील देशांशी संबंध विकसित करणे, भारताच्या आर्थिक-सामरिक हितसंबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आज चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांच्या वाढत्या हालचालींमुळे भारताला वरचेवर आव्हान मिळू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात आलेली आयएनएस कोलकाता प्रभावी अस्त्र ठरणार आहे. पण येत्या तीन-चार वर्षांमध्ये भारतीय नौदलात सामील होणा-या फ्लीट सपोर्ट शीपच्या मदतीने तिचा पल्ला आणि प्रभाव आणखी वाढविणे शक्य होणार आहे. स्टिल्थ विनाशिका स्वदेशात बांधण्याचा भारतीय तज्ज्ञांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. कोलकाता श्रेणीतील युद्धनौकांच्या आरेखनातील सुबकतेनेही जगभरातील नाविक तज्ज्ञांना प्रभावित केले आहे.
‘कोलकाता’वर अजून ब-याच यंत्रणा बसविणे बाकी आहे. येत्या काही महिन्यांत त्या सर्व यथास्थित बसविल्या जातील. तरीही आताच्या स्थितीत हिंदी महासागरातील सर्वसमावेशक विनाशिका अशी ओळख निर्माण करण्यात आयएनएस कोलकाता यशस्वी ठरली आहे.
parag12951@gmail.com