आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Delhi Polls And Its Meaning By Suhas Kulkarni

'आप'के साइड इफेक्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांचा दारुण पराभव झालेला असल्याने या दोन्ही पक्षांना निवडणुकीने दिलेल्या संदेशाचं वाचन करण्याची सर्वाधिक गरज असणार आहे. परंतु, पराभवातून काहीही शिकायचं नाही, असा विडाच जणू काँग्रेसने उचलला आहे आणि त्यामुळे त्यांचा पाय अधिकाधिक रुतत चालला आहे. दुसरीकडे, भाजपचा विजयरथ गेले वर्षभर चौखूर उधळत असल्याने त्यांनाही दिल्लीसारख्या छोट्या राज्याच्या पराभवाबद्दल चर्चा करण्यात किती वेळ घालवायचा, असं वाटू शकतं. त्यामुळे हे दोन पक्ष निवडणूक निकालाचा संदेश समजून घेतील-न घेतील; भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने या संदेशात जे अर्थ सामावलेले आहेत, ते आपण पाहायला हवेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदेशाच्या तपशिलात जाण्याआधी काही वस्तुस्थिती निदर्शक बाबींची नोंद करायला हवी.

एक, या निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकण्याचा राष्ट्रीय विक्रम आम आदमी पक्षाने केला आहे.
दोन, केंद्रात सत्तेवर असताना आणि आठ महिन्यांपूर्वीच दिल्लीत लोकसभेच्या सातपैकी सात जागा जिंकणा-या भारतीय जनता पक्षाला ७० पैकी फक्त तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. तीन, विधानसभेच्या सलग तीन निवडणुका जिंकून दिल्लीवर पंधरा वर्षं राज्य केलेल्या काँग्रेसला ७० पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाची जेवढी मतं कमी झाली, त्यापेक्षा कमी मतं या निवडणुकीत त्यांना मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना २५ टक्के मतं मिळाली होती, ती १५ टक्क्यांनी घटून त्यांचं मतदान १० टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.

या तीन निरीक्षणांमधून स्पष्ट होणारा पहिला प्राथमिक संदेश असा आहे की, नवनिर्मित आम आदमी पक्षाचा निर्विवाद विजय झाला असून काँग्रेस व भाजपचा सपशेल पराभव झाला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, एखाद्या पक्षाचा एवढा मोठा विजय समाजातील सर्व स्तर एकवटल्याशिवाय होऊ शकत नाही. सर्व वर्ग-जाती-धर्म अशा पक्षामागे एकवटायचे तर त्या पक्षाबद्दल वादातीत आकर्षण वाटणं आवश्यक आहे. या परीक्षेत भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष लोकांनी नापास केलेले दिसतात. काँग्रेस हा उतरती कळा लागलेला पक्ष असल्याने त्याच्या बाबतीत असं टोकाचं आकर्षण न वाटणं समजून घेता येऊ शकतं; परंतु भाजप हा चढत्या लोकप्रियतेचा पक्ष असल्याचं सांगितलं जात असूनही दिल्लीकरांनी त्याला नाकारलेलं दिसतं. असं का घडलं असावं?

निकालातून व्यक्त होणा-या संदेशाचा दुसरा टप्पा इथे सुरू होतो. भाजपने आणि विशेषतः नरेंद्र मोदींनी ‘देशाच्या मनात जे आहे तेच दिल्लीच्या मनात आहे’, असं प्रचारकाळात ठणकावून सांगितलं होतं. हे निरीक्षण निकालांद्वारे सपशेल खोटं ठरलं. आठच महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळालेल्या असल्याने मोदींची लाट पक्षाची नय्या पार करून टाकेल, असं मानलं जात होतं. हा आडाखाही निकालांमुळे चुकलेला दिसतो आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्माला आलेल्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीने यापूर्वीच डोक्यावर घेतलं होतं. परंतु, त्यांच्यावर अद्वातद्वा आरोप करून, त्यांना लागू-गैरलागू प्रश्न विचारून, त्यांना बंदर-बेइमान-चोर-विषारी-नटवरलाल अशा असभ्य भाषेत ललकारून निवडणूक जिंकता येईल, असा भाजपचा होरा होता. हा होराही मतदारांनी खोटा पाडला आहे. किरण बेदी, शाजिया इल्मी, विनोदकुमार बिन्नींसारख्या केजरीवालांपासून दुरावलेल्या सहका-यांना पक्षात आणून आम आदमी पक्षाबाबत संभ्रम निर्माण करता येईल, असा कयास भाजपने केला होता. तोही मतदारांनी नाकारला आहे. किरण बेदी या देशभर लोकप्रिय असलेल्या पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्या लोकप्रियतेवर भाळून मतदार (विशेषतः महिला) भाजपकडे खेचले जातील, अशी ‘रणनीती’ मास्टर स्ट्रॅटेजिस्ट मानल्या जाणा-या पक्षाध्यक्ष अमित शहांनी आखली होती; पण मतदारांनी खुद्द किरण बेदींनाच पराभूत करून या रणनीतीचा चोळामोळा करून टाकला. या उदाहरणांतून एक संदेश स्पष्टपणे पुढे येत आहे की, जनतेला गृहीत धरून किंवा भ्रमित करून यापुढे निवडणुका जिंकता येतीलच, असं नाही. आजमितीला आपल्या देशात काँग्रेस, भाजप आणि अनेक प्रादेशिक पक्ष मतदारांना गृहीत धरूनच निवडणुकांची रणनीती आखत असतात. दिल्लीच्या निकालांनी या राजकारणाला जोरदार ब्रेक बसणं अपरिहार्य दिसत आहे.

या निवडणूक निकालाच्या तिस-या संदेशाचा संदर्भ व्यापक आहे. हा निकाल काँग्रेसच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षमतेविरुद्ध जसा आहे, तसाच भाजप आणि मोदींच्या दिखाऊ आणि हवाहवाई वृत्तीविरुद्धही आहे. विकासाचे मोदीकृत नारे ऐकून आठ महिन्यांपूर्वी याच जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात आपल्या पदरात काहीच पडत नाही, या जाणिवेने लोकांनी त्यांना खड्यासारखं बाजूला सारलं आहे. ‘आश्वासनं पाळावी लागतील, नुसत्या गप्पा ऐकून घेतल्या जाणार नाहीत,’ असा जबरी संदेश मतदारांनी या निकालाद्वारे केवळ मोदींनाच नव्हे, तर सर्वच पक्षांना दिला आहे. १० लाखांचा सूट घालून आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचा एकेरी उल्लेख करून आपण भाळणार नाही, असाही एक मर्मघाती टोला लोकांनी हाणला आहे. पक्षापक्षांतील मनमर्जी वागणा-या नेत्यांना हा कडक इशाराच म्हणायचा! मोदी आणि अमित शहा यांच्या श्रीमंती थाटाच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणापेक्षा प्रामाणिक आणि साधेपणाची कास धरलेल्या आम आदमी पक्षाला लोकांनी स्वीकारलेलं दिसतं. भाजप आणि काँग्रेससारख्या बड्या पक्षांऐवजी वीज-पाणी-घरं-सुरक्षितता-शिक्षण-आरोग्य या प्रश्नांवर ठोस उपाय देऊ पाहणारा आम आदमीसारखा नवखा पक्ष लोकांना जवळचा वाटला आहे. सरकारी पैसा वर्ल्ड क्लास सिटीवर उधळण्याऐवजी सामान्य माणसांचं जिणं सुखकर होण्यासाठी वापरण्याचा आम आदमी पक्षाचा इरादा लोकांनी स्वीकारला आहे. लोकांमध्ये जाऊन, लोकांचा कल समजून घेऊन त्यानुसार त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची आम आदमी पक्षाची आगळीवेगळी शैलीही लोकांनी डोक्यावर घेतली आहे. लोकांना जात-धर्म-पंथ-वर्ग यांच्या आधारे एकमेकांविरुद्ध न लढवता त्यांची भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि अपप्रवृत्तीविरुद्ध एकजूट घडवून आणणं लोकांना आनंदवून गेलं आहे.

आम आदमी पक्षाने भारतीय राजकारणातील अशा लुप्त झालेल्या अनेक चांगल्या परंपरांना उजाळा दिला आहे. त्याला ज्या उत्स्फूर्तपणे दिल्लीकरांनी प्रतिसाद दिला आहे, त्यातून एका नव्या राजकीय संस्कृतीचा जन्म होण्याची शक्यता आहे. भाजप-काँग्रेससह सर्व पक्षांना आपापली कालबाह्य होत असलेली गृहीतकं आणि ठोकताळे बदलण्यासाठीही हा निकाल भाग पाडणार आहे. दिल्लीतील या अभूतपूर्व विजयामुळे उद्यापासून लगेच राज्याराज्यांत आम आदमी पक्षाची हवा वाहू लागेल आणि पाठोपाठ जिकडे तिकडे हा पक्ष सत्ता काबीज करू लागेल, असं नाही; परंतु या पक्षाने जे नवं, लोकांना थेट जबाबदार असणारं प्रामाणिक राजकारण सुरू केलं आहे, त्याचा दाब सर्वच पक्षांवर पडणार आहे. हे नवं सकारात्मक राजकारण स्वीकारा, अन्यथा आम्ही तुम्हाला नाकारू, असा खणखणीत इशारा दिल्लीचा निकाल देत आहे. हा आवाज सामान्य मतदारांचा असल्याने स्वत:चे भवितव्य सुरक्षित राखू पाहणारा कोणताही पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, हे उघड आहे. त्यातूनच देशाच्या राजकारणात काही विधायक बदल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आम आदमी पक्षाने दिल्लीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे हे सर्व साइड इफेक्ट्स
असणार आहेत...

suhas.kulkarni@uniquefeatures.in