Home »Magazine »Rasik» Article On Delip Padgaonkar

ग्लोबल मराठी माणूस (कुमार केतकर)

कुमार केतकर | Jan 06, 2013, 04:29 AM IST

  • ग्लोबल  मराठी माणूस (कुमार केतकर)

संगीतापासून स्वादिष्ट स्वयंपाक करण्यापर्यंत, साहित्यापासून सौंदर्यशास्त्रापर्यंत, राजकारणापासून तत्त्वज्ञानापर्यंत, मार्क्सपासून फ्रॉइडपर्यंत आणि बालगंधर्वांपासून इटालियन चित्रपट दिग्दर्शक रॉबर्टो रोसेलिनीपर्यंत तितकीच उत्कंठा आणि शिकण्याचा उत्साह कुठून येतो? दिलीप पाडगावकरांविषयी हा प्रश्न मला नेहमी पडतो. माझ्या सुमारे 40 वर्षांच्या ओळखीत मी नेहमी त्यांची अचाट ऊर्जा आणि कमालीचे कुतूहल ओसंडून वाहताना पाहिले आहे. वर्ष-दीड वर्षात दिलीप सत्तरीत प्रवेश करेल; पण मला खात्री आहे, त्याची ऊर्जा तितकीच उदंड असेल.


ज्या काळात पत्रकारितेतही ‘स्टार सिस्टिम’ उदयाला येत होती, त्या काळात वयाच्या फक्त 44व्या वर्षी पाडगावकर ‘द टाइम्स आॅफ इंडिया’ या देशातील सर्वात प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाचे (पहिले मराठी!) मुख्य संपादक झाले. शामलाल आणि गिरीलाल जैन यांसारख्या मातब्बर आणि ख्यातनाम संपादकांनंतर पाडगावकरांकडे ‘टाइम्स’ची सूत्रे आली होती.


शामलाल यांनी स्वत: दिलीपला त्या अगोदर 20 वर्षे म्हणजे, 1968मध्ये पॅरिसला विशेष वार्ताहर म्हणून नेमले होते. शामलाल यांच्यासारख्या अक्षरश: अफाट व्यासंगी संपादकाने दिलीपला (त्याच्या फक्त 24व्या वर्षी) पॅरिस आणि नंतर युरोपहून वार्तापत्रे लिहिण्यासाठी नियुक्त करावे, हाच खूप मोठा सन्मान होता. शामलाल व्यासंगासाठी तर गिरीलाल वादग्रस्त भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते. (आता त्या दोघांसारखे अवघ्या मीडियात कुणीही नाही!)
शामलाल आपल्या लेखनातून वैचारिक आणि बौद्धिक अजेंडा देशासमोर ठेवायचे. पुढे गिरीलाल जैन राजकीय आणि धोरणात्मक दृष्टिकोन मांडायचे. दोघांच्या विचारसरणीत आणि व्यासंगशैलीत फरक होता, पण त्यांच्या संपादकत्वाचा दर्जा अभिजात होता. म्हणूनच त्यांच्यानंतर ‘टाइम्स’च्या संपादकपदाची सूत्रे दिलीपकडे यावीत, याला वृत्तपत्रसृष्टीत आणि एकूणच ‘इंटेलेक्च्युअल एस्टॅब्लिशमेंट’मध्ये विशेष महत्त्व होते.


त्या काळी खासगी टीव्ही चॅनल्स नव्हते. ‘डीडी’ ऊर्फ दूरदर्शनचा विस्तार आजच्यासारखा सर्वव्यापी नव्हता. वृत्तपत्रांना राजकीय आणि वैचारिक वर्तुळात अनन्यसाधारण स्थान होते. सुरुवातीच्या काळात पंडित नेहरू आणि शामलाल-गिरीलाल यांच्या काळात इंदिरा गांधी ‘टाइम्स’च्या भूमिकेला गांभीर्याने घेत असत. मतभेदांमध्ये विखार नसे. एक प्रकारची वैचारिक लोकशाही राजकारण्यांचा वर्ग पाळत असे. (आणीबाणीत त्याचा संकोच झाला, पण जनता पक्ष सत्तेत असताना गिरीलाल जैन यांनी मोरारजी देसाई सरकारवर शरसंधान करून इंदिरा गांधींचे समर्थन केले. त्यामुळे तर गिरीलाल जैन कमालीचे वादग्रस्त झाले होते. असो.)


दिलीप पाडगावकर संपादक झाले, तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. (दिलीप आणि राजीव दोघांचा जन्म 1944चा). पॅरिसहून 1973मध्ये दिलीप भारतात (तेव्हा मुंबईत) टाइम्सचे ‘असिस्टंट एडिटर’ म्हणून आले. माझ्यासारख्या ‘टाइम्स’च्या वाचकांना दिलीपची ओळख होती, ती पॅरिस आणि युरोपच्या वार्तापत्रांमधून. तो काळ बंडखोरीचा होता, प्रस्थापितविरोधाने भारलेला होता, नवीन साहित्यप्रवाह, समांतर चित्रपट, प्रतिकारवादी नाटके, प्रयोगशीलता, क्रांतिकारक मानसिकता, चे गव्हेरा, कॅस्ट्रो, रेजिस डेब्रे, माओ, हो चि मिन्ह आणि व्हिएतनाम युद्ध, विद्यार्थी आंदोलने अशा अनेक गोष्टींनी युरोप ढवळून निघत होता.


पॅरिसमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या आणि तशाच बंडखोर वृत्तीने झपाटलेल्या दिलीपला वातावरण आणि मूड युरोपमध्ये गवसला. ‘1968 जनरेशन’ म्हणून जी पिढी ओळखली जाते, ती पॅरिसमधील विद्यापीठांमध्ये बंडाचे झेंडे फडकावू लागली होती. कामगार कारखाने ताब्यात घेऊ लागले होते. तरुण मुले-मुली ‘दुस-या फ्रेंच क्रांती’साठी सिद्ध होत असल्यासारखे दृश्य होते. दिलीपने ते सर्व उत्तेजक आणि प्रक्षोभक वातावरण ‘टाइम्स’च्या वार्तापत्रांमधून आमच्यासमोर उभे केले होते. छापील माध्यमातून ‘स्टार’ उदयाला येत होता. टीव्ही, इंटरनेट, मोबाइल, आयपॅड असे काही नसलेल्या त्या काळात ‘टाइम्स’ ही एक विद्यापीठ सदृश ‘इन्स्टिट्यूशन’ होती, शामलाल हे त्या विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि दिलीपसारखे पत्रकार उगवते तारे होते.


या उगवत्या ता-याशी माझी भेट 1973मध्ये त्या ‘टाइम्स’ इमारतीतच झाली. दिलीपकडे शामलाल यांनी ‘टाइम्स’च्या रविवार पुरवणीचे काम सोपवले होते. दिलीपने मराठी दलित व समांतर साहित्यावर विशेषांक काढायचे ठरवले होते. त्या वेळेस मी ‘टाइम्स’मध्ये नोकरी करत असतानाच ‘सत्यचित्र’ नावाच्या एका पाक्षिकाचेही काम पाहत होतो. तीन-चार वर्षे अगोदर ‘दलित पँथर’ची स्थापना झालेली असल्यामुळे ‘सत्यचित्र’मधून त्यांच्या बंडखोर व चैतन्यशील साहित्याला आम्ही उचलून धरत असू. ‘सत्यचित्र’ हे पाक्षिक तसे समांतर बंडखोरवादी पाक्षिक. दिलीप तेव्हा दलित साहित्यातील नव्या प्रयोगांचा शोध घेत होता आणि आमची ओळख झाली. पॅरिस व युरोपमधील बंडखोरीच्या वातावरणाने आम्हाला जोडलेले असले तरी तो ‘स्टार’ होता आणि आम्ही शामलाल यांचे भक्त. (शामलाल व्हिएतनामी जनतेच्या संघर्षाच्या बाजूने, अमेरिकेच्या विरोधात आणि बौद्धिक बंडखोरीच्या बाजूने लेखन करत असत. त्यामुळे तोही आम्हाला जोडणारा एक धागा होता.)


दिलीपने पुढे पाच-सात वर्षे ‘टाइम्स’मध्ये काढल्यानंतर तो पुन्हा पॅरिसला गेला, ते ‘युनेस्को’मध्ये नोकरी करण्यासाठी. तो परत आला आणि अल्पावधीत 1988मध्ये संपादक झाला. ते ‘टाइम्स’चे दीडशे वर्षेपूर्तीचे वर्ष होते. ‘टाइम्स’ आपली परंपरा टिकवत-टिकवतच कात टाकू लागला होता. ‘टाइम्स’चे मालक अशोक जैन यांचे तरुण चिरंजीव व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेऊ लागले होते. परंपरेने आलेली प्रतिष्ठा, शामलाल यांचा व्यासंगी वारसा, गिरीलाल यांचा वादग्रस्त पवित्रा, हे सर्व खांद्यावर आलेल्या दिलीपसमोर मोठेच आव्हान होते. प्रतिष्ठा तर टिकवायची, पण नवे प्रवाहही दैनिकात आणायचे; व्यासंगी दबदबा टिकवायचा, पण तरुण पिढीला आकर्षून घेण्यासाठी बॉलीवूड आणि फॅशनलाही स्थान द्यायचे; बैद्धिकता आणि वैचारिकता जपायची, पण ‘मार्केट’ही सांभाळायचे; अशा परस्परविरोधी जबाबदा-या दिलीपवर आल्या. वृत्तपत्रांची व्यवस्थापन शैली बदलू लागली होती. त्याचा संपादकीय धोरणांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत होती. अशा वादळी लाटांवर वृत्तपत्रसृष्टी असताना दिलीपकडे कॅप्टनपद आले होते.


दिलीपने खरे म्हणजे सविस्तर आत्मचरित्र लिहायला हवे. ते एका पिढीचे आत्मचरित्र असेल - उद्बोधक आणि प्रक्षोभकही. कारण 1968 ते अगदी आजपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा ‘टाइम्स’ या मुख्य वृत्तपत्रसमूहाशी जवळचा संबंध राहिला आहे. राजीव गांधी, नरसिंह राव, सोनिया या सर्वांशी त्याचे निकटचे (राजकीय-वैचारिक) नाते राहिले होते. डावे, उदारमतवादी, सेक्युलर विचारांचे उघड व धाडसी समर्थन केल्यामुळे अनेकांशी ‘शत्रुत्व’ आणि ‘हेट-मेल’ नाते निर्माण झाले आहे. परंतु दिलीपने मूळ वैचारिक व बौद्धिक पीळ सोडलेला नाही. त्या बौद्धिकतेला त्याने जोड दिली आहे ती फ्रेंच भाषेची. मी दिलीपबरोबर पॅरिसच्या रस्त्यांवरून भटकलो आहे. रेजिस डेब्रे या एकेकाळच्या माझ्या ‘आयडॉल’बरोबर दिलीपनेच माझी भेट करून दिली होती. दिलीप पॅरिसमध्ये तितक्याच लीलयेने फिरतो, जितक्या सहजतेने तो दिल्लीत वावरतो आणि आता अगदी पुण्यातही.


तसा त्याचा पुण्याशी संबंध अगदीच जुना; शाळेपासूनचा. म्हणजे पॅरिसला जाईपर्यंत दिलीप पुणेकरच होता. त्यामुळे निवृत्तीनंतर तो पुण्यात येणे म्हणजे कमिंग बॅक टू रूट्स्! निवृत्ती अर्थातच नावापुरती. कारण लेखन, जगभर भटकंती, परिसंवाद-चर्चा, टीव्ही पॅनल्सवरच्या मुलाखती, पुस्तक लेखन, काश्मीरसंबंधातील सरकारने नेमलेल्या समितीचे काम, त्याचा (वादग्रस्त) अहवाल, बालगंधर्वांविषयी पुस्तक लिहिण्याचा मानस आणि त्याच वेळेस जर्मन भाषा अधिक चांगली शिकण्याचा ध्यास, हे सर्व एकाच वेळेस चालू आहे. एकाच वेळेस इतक्या क्षेत्रात वावरणे सोपे नाही. पण ते दिलीपला अगदी लीलया साध्य होते.


दिलीपला फ्रेंच त्याच्या मातृभाषेपेक्षा अधिक उत्तम अवगत आहे, असे म्हटले तर त्यात फारशी अतिशयोक्ती नाही. परंतु याच ‘फ्रेंच भाषक’ दिलीपने मला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बालगंधर्वांची गाणी (सुरेलपणे!) ऐकवली आहेत. न्यूयॉर्क मॅनहटनमध्ये रात्री 12-1 वाजता बालगंधर्वांचे शब्द व सूर रस्त्यावर (ब-यापैकी जोरात) गायले जाण्याचा तो पहिला व शेवटचा प्रसंग असावा. एकोणिसाव्या शतकातील अखेरचा व विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हे महाराष्ट्रातील ‘रेनेसाँ’ आहेत, हे दिलीप एखाद्या प्रबंधाप्रमाणे सांगू शकतो. त्यामुळे त्याचे मराठीपण आणि पुणेकरगिरी अगदी शाबूत असली तरी त्याच्या जगभरच्या भटकंतीमुळे व युरोपच्या बौद्धिक विश्वाशी त्याने स्वत:ला जोडून घेतल्यामुळे दिलीप सर्वार्थाने ‘ग्लोबल मराठी’ झाला आहे.


त्याच्या जागतिकतेचा आणखी एक संदर्भ म्हणजे तो चिनी खाद्यपदार्थ आणि फ्रेंच, सारस्वतांची सोलकढी व फिश करी अशा जगभरच्या स्वयंपाक व जेवणशैलीचा एक तज्ज्ञ आहे. तो ‘टाइम्स’चा संपादक होऊन देशातील (त्या वेळच्या!) दुस-या सर्वात महत्त्वाच्या पदावर गेला नसता तर संजीव कपूर या जगप्रसिद्ध स्वैपाक्याच्या पोटावर पाय आला असता. दिलीपने ती जागा त्याच्यासाठी सोडून दिली!


दिलीपचा संस्थात्मक प्रवास जरी ‘टाइम्स’शी अजूनही जोडला गेला असला तरी त्याचा सामाजिक-वैचारिक प्रवास मात्र दिल्लीच्या प्रतिष्ठित ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’पासून ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’पर्यंत आला आहे. ज्या सहजतेने तो पॅरिस-दिल्ली-मुंबई या मेट्रो संस्कृतीत रुळला, त्याच सहजतेने त्याने आता पुणे शहरात आपले जीवन नव्याने वसवले आहे.


हे सर्व इतक्या स्वाभाविकपणे त्याला जमले, याचे मुख्य कारण त्याची पत्नी लोतिका. तीसुद्धा त्याच्याप्रमाणेच उद्योगी, कलासक्त, सामाजिक प्रगल्भता असलेली, चित्रकला व शिल्प यांवर प्रेम करणारी, कमालीची आतिथ्यशील आहे. दिलीपचे चित्रकलाप्रेम त्यांच्या संग्रहावरून दिसतेच; पण त्याला खरा ओढा आहे तो पुस्तकांचा. ग्रंथप्रेमातून त्या दोघांनी जमवलेला त्यांचा ग्रंथसंग्रह ही त्यांची खरी सांस्कृतिक ओळख आहे.


दिलखुलास वृत्ती, गप्पांवर प्रेम, उत्साह, उमेद आणि ऊर्जा; आणि या सर्व स्वभाववैशिष्ट्यांना प्रगत, प्रगल्भ, सुसंस्कृत विचारांची व जीवनविषयक दृष्टिकोनाची अतूट जोड यामुळे दिलीप हे समृद्ध व्यक्तिमत्त्व घडले आहे. ते कसे घडले हे त्याने आत्मचरित्र लिहिले तरच आपल्याला अधिक कळू शकेल.
(महाराष्‍ट्र फाउंडेशन पुरस्कारांनिमित्त साप्ताहिक ‘साधना’ने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाच्या सौजन्याने...)

Next Article

Recommended