आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन अन्नसंस्कृतीचा ऐवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानववंशशास्त्राच्या अभ्यासात कुठल्याही कालखंडाचा विचार करताना अभ्यासकांचा पहिला प्रश्न असतो, ‘लोक तेव्हा काय खायचे?’ माझ्या दर सहा एक महिन्यानंतर होणा-या कुठल्यातरी चर्चेमध्ये हा विषय निघतोच आणि एक आवडता विषय म्हणून, मग मी त्यावर रात्र रात्र बोलत बसतो किंवा ऐकत राहतो. ‘अन्न’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून मग त्याच्या अनुषंगाने येणारी संस्कृती, राजकारण, समाजकारण, बंडाळ्या, तह आणि इतर कितीतरी गोष्टी आणि तर्क मग सहजसोप्या दृष्टिकोनातून पाहणे शक्य होते. या बाबतीत अलीकडच्या काळात माझे ज्येष्ठ मित्र संजीव खांडेकर आणि वैशाली नारकर यांच्याबरोबर वर्गलढा आणि अन्नसंस्कृती यांचे परस्परसंबंध जोडताना बरीचशी उद‌्बोधक आणि मजेशीर चर्चा मी केली आहे.

मानव उत्क्रांतीच्या प्रारंभीच्या टप्प्यात हंटर्स म्हणजे, ‘पुरुष’ जेव्हा शिकार करायला जायचे आणि गॅदरर्स ‘स्त्रिया’ आणि लहान मुले वस्तीजवळ राहून उपयुक्त वस्तू गोळा करीत राहायच्या. तेव्हा खाद्यसंस्कृतीतील वर्गलढ्याची पहिली बीजे पेरली गेली असावीत, असे संजीव सांगतो. ‘हंटर्स’ हे वस्तीपासून दूर शिकार करीत असल्याने शिकार केलेले जनावर वस्तीवर घेऊन येईपर्यंत, त्या मांसातील पोषणमूल्यांच्या दृष्टीने उत्तम भाग वाटेतच मटकावून टाकीत. त्यामुळे ते परतल्यानंतर वस्तीला अन्न मिळे, पण ते पोषणदृष्ट्या उत्तम दर्जाचे असण्याची शक्यता कमी झालेली असे.

उत्क्रांतीची सुरुवातच अशी भेदभावाने सुरू झाल्याने मग वर्गलढे आणि त्यातून वाट्याला येणारी अन्नाची प्रतवारी ही गेल्या काही हजार वर्षांच्या संस्कृतीचा पाया आहे, असे म्हणता यायला हवे. दुर्दैवाने, सांस्कृतिक संदर्भ सध्या केवळ राजकीय अस्मितांसाठी जास्त उपयुक्त असल्याने ‘अन्न’ आणि ‘इतिहास’ असा परस्परसंबंध लावण्यास लोक तितके उत्सुक नसतात. आग्य्रातला ताजमहाल पाहणे, हा एक सुंदर अनुभव आहे. तो चांदण्या रात्री पाहणे अजूनही सुंदर अनुभव असावा. पण हा ताजमहाल बनविण्यासाठी बत्तीस हजार कारागीर अहोरात्र काम करीत होते. म्हणजे, मग कितीतरी वर्षे हे लोक त्या कन्स्ट्रक्शन साइटच्या आसपास वस्ती करून राहात असतील. पण हे कारागीर नेमके काय खायचे?
संगमरवरावर छिन्नी-हातोड्याने काम करून दमल्यानंतर दुपारची भाकरी वा बिर्याणी त्या दगडांच्या आसपास बसूनच खायचे का? ताजमहाल हा एक चमत्कार आहे आणि चमत्काराला नमस्कार केला जातो. आपल्याकडे नमस्कार करण्यासारख्या गोष्टींचाच तेवढा अभ्यास केला जातो आणि बहुश्रुतांत पसरविला जातो. त्यामुळे ताजमहालाची रसभरीत वर्णने करताना कुणी चुकूनही त्याच्या निर्माणकार्यात गुंतलेल्या हातांच्या वा पोटांच्या कथा सांगत नाही.

मूठभर उच्चवर्णीयांनी तारस्वरात सांगितलेल्या चमत्कारांच्या इतिहासापलीकडे हजारो वर्षांपासून कष्टक-यांच्या आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या लोकांच्या खूप मोठ्या अ-चमत्कारिक इतिहासाकडे अजून आपले लक्ष गेलेले नाही. या इतिहासात कुतूहल म्हणून काही क्षण जरी डोकावून पाहिले, तर बरीचशी उपयुक्त माहिती आपल्याला मिळते. भारतातल्या बहुजनांच्या अन्नसंस्कृतीबद्दल कॉलिन टेलर-सेन यांचे ‘फिस्ट‌्स अँड फास्ट्स’ आणि शाहू पाटोळे यांचे ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ ही दोन अद‌्भुत पुस्तके या आठवड्यात माझ्या हातात आली. ही पुस्तके वाचल्यानंतर हजारो वर्षांच्या मानवी इतिहासाशी कनेक्ट होताना मला झालेल्या जाणिवा खरंच खूप सुखद होत्या. यापैकी कॉलिन टेलर यांचे पुस्तक इसवीसनपूर्व साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या भारतातली जीवनशैली, पीकपाणी, अन्नधान्ये, फळफळावळ, मसाले यांचा मागोवा घेत थेट अन्नाचे धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ देऊन आधुनिक काळापर्यंत येऊन थांबते. या पुस्तकात शिल्पकला, चित्रकला, राजेरजवाड्यांच्या चालीरीती, बदलत गेलेल्या राजकीय संदर्भात भारतीय लोकांच्या जेवणावर आणि समाजमनावर झालेल्या परिणामांचे मनोरंजक आणि अतिशय विस्तृत विवेचन केलेले आहे. शाहू पाटोळे यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ची सुरुवातच चातुर्वर्ण्याच्याही पलीकडे असणा-या पाचव्या वर्णातील महार आणि मातंग जातीत जन्माला आलेल्या लोकांच्या परिस्थितीचा मागोवा घेत झाली आहे. सामाजिक विषमतेतून गुराढोरांशी संबधित कामे करणा-या या वंचितांच्या खाद्यसंस्कृतीचा मागोवा त्यांनी घेतला आहे. यात प्राण्याच्या मांसाचे निरनिराळे अवयव, त्यांच्या चवी, बनविण्याची पद्धत, त्यांच्या दर्जातील फरकामुळे, किमतीमुळे तयार होणारे शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी याविषयी परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

लोक चुलीतला विस्तव उसना कसा आणत, गरिबांच्या घरी गव्हाच्या पोळ्या फार क्वचित बनविल्या जात असल्याने त्यांच्याकडे लाटणेदेखील नसे, कुंभाराकडची चूल परवडत नसल्याने स्त्रिया स्वतःचे ज्ञान आणि सोशल स्किल्स वापरून आपली चूल आपणच कशा बनवत, याबद्दल पुस्तकात सविस्तर भाष्य आहे. समाजव्यवस्थेतल्या तळागाळाशी असलेल्या या जातींवर झालेल्या अन्यायाचे स्वरूप मांडण्याऐवजी या प्राप्त परिस्थितीत जगण्यासाठी येणारे पोटापाण्याचे प्रश्न या जातींनी कसे कल्पकतेने सोडविले, याबद्दल पाटोळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. यातला अभ्यास हा वस्तुनिष्ठ असल्याने हे पुस्तक ख-या अर्थाने अ‍ॅकॅडेमिक स्वरूपाचे झाले असून ते अभ्यासग्रंथाचा दर्जाचे आहे.

ज्या खाद्यसंस्कृतीवर हे पुस्तक लिहिले गेले आहे, त्याच्या वर्तमान काळातही मला डोकवावेसे वाटले. एरवी कत्तल केलेल्या प्राण्यांच्या टाकाऊ रक्तापासून बनविलेले रक्ती, वजरी, चरबीत शिजवलेल्या ‘चान्या’, गव्हाचे पीठ साखरेच्या पाण्यात भिजवून तळलेल्या ‘बलच्या’ या लहान असताना माझ्याही खाण्यात आल्या. लहानपणी आई, मावशी आणि माझी आजी ‘काळाई’ हे पदार्थ बनवून मायेने मला खाऊ घालायच्या. या काळाईच्या हाताला अशी काही चव होती, की तिने एरवी गुरांना खायला म्हणून आणलेल्या चा-यातल्या काही कोवळ्या पानांना चमचाभर तेलात मीठ आणि लाल मिरची टाकून परतलेल्या भाजीलाही स्वर्गीय चव येत असे.
मी काँग्रेसी समाजवाद मागे पडताना आणि खुल्या अर्थव्यवस्थेने बाळसे धरण्याच्या विचित्र कालखंडात जन्माला आलो. देशाचा आर्थिक विकास झाला, तसा माझाही झाला आणि एका काळानंतर हलक्या दर्जाचे मांसपदार्थ वा कनिष्ठ दर्जाचे अन्न मी नाकारू लागलो. कुठल्याशा अर्थाने ते मला मागासलेले आणि गुलामीचे लक्षण वाटते होते. काळ आणखी पुढे सरकला आणि नशिबाचा भाग म्हणून, माझी आर्थिक परिस्थिती आणखी सुधारताना मला अमेरिकन जीवनशैली जगण्याचा अनुभवही घेता आला. या जीवनशैलीत मग मी सरसावून डुकराचे मांस ‘हॅम’ आणि ‘बेकन’ म्हणून आरामात खाऊ लागलो, रक्तीची जागा ब्लड सॉसेजेसने घेतली आणि वजरीला मी वजरी न म्हणता ‘जिब्लेट्स’ म्हणत त्याची करी मिटक्या मारीत खाऊ लागलो. भारतातल्या जातीव्यवस्थेची आणि लाचारीची ओळख म्हणून, श्रीमंत झाल्यावर नाकारलेले अन्न पुढे मी श्रीमंत देशातील मध्यमवर्गीयांचे अन्न म्हणून आरामात खाऊ लागलो...

rahulbaba@gmail.com
बातम्या आणखी आहेत...