आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसम अतिसाराचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळपासून ‘रन्स’ काढून तो अगदी हैराण झाला होता. घशाला कोरड पडली होती, पायात गोळे येत होते. खूप थकवा वाटत होता. पोटात काही ठरत नव्हते. आठ-दहा वेळा तरी शौचास पाण्यासारखे पातळ झाले होते. घरात असलेली कुठली तरी औषधाची गोळी त्याने घेतली होती, पण फारसा काही फरक पडला नव्हता. काही वेळाने त्याची स्थिती थोडी अधिकच बिकट झाली. ग्लानी येऊ लागली. घरच्यांनी डॉक्टरांकडे नेले. तेथे शिरेतून सलाईन सुरू करावे लागले.
एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल की, आपण चर्चा करतोय अतिसार किंवा डायरियाची.
पावसाळा चालू झालाय. दूषित पाणी, दूषित अन्न, सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य, ऊन-पावसाचा खेळ हे सारेच घटक अनेक आजारांसाठी पोषक आहेत. या आजारांमध्ये आघाडीवर अर्थातच पोट बिघडणे हा प्रकार. पावसाळ्याच्या निमित्ताने जरी आपण डायरियाची चर्चा करत असलो, तरी तसा हा बारोमास त्रास देणारा आजार. पण अर्थातच पावसाळ्यात याचा उपद्रव मोठा.
हृदयरोग, कॅन्सर, एड्ससारखा बोलबाला डायरियाचा नाही. तसा हा वरवर किरकोळच वाटणारा आजार. म्हणूनच वाचून आश्चर्य वाटेल, पण जगातील चार टक्के मृत्यू डायरियाच्या नावावर असतात आणि लहान मुलांमध्ये तर हे प्रमाण तब्बल १८ टक्के आहे. दरवर्षी साधारण १० लाख कोवळ्या जिवांचा बळी डायरिया घेतो.
दूषित अन्न, पाणी यांखेरीज लहान मुलांमधील कुपोषण हेही एक महत्त्वाचे कारण डायरिया होण्यामागे आहे. कुपोषणामुळे डायरियाची शक्यता वाढते, डायरियामुळे कुपोषण वाढते, असे दुष्टचक्र चालूच राहते.
बहुतांश वेळा विविध जंतूंमुळे डायरियाचा प्रादुर्भाव होतो. उदा. ई-कोलाय, व्हिब्रिओ कॉलरे यांसारखे जीवाणू, रोटाव्हायरस हा विषाणू व काही कृमी डायरियाचे प्रमुख सूत्रधार असतात. हे जंतू पाण्यात, अन्नात, विष्ठेत सहज वाढतात. अनेक मार्गांनी त्यांचा प्रसार होत राहतो. ते आपल्या शरीरात शिरकाव करतात. मग ‘गॅस्ट्रोएंटरायटिस’, ‘फुड पॉयझनिंग’ होते व पोट साफ बिघडून जाते. काही वेळा इतर आजारांत प्रवासामुळे हवा-पाणी-अन्न बदलल्याने, काही अँटिबायॉटिक्सचा साइड इफेक्ट म्हणून किंवा मानसिक तणाव, काळजी यामुळेही पोट बिघडून डायरिया होऊ शकतो.
भरपूर प्रमाणात, वारंवार व पाण्यासारखे पातळ शौचास होणे (लुज मोशन्स) हे डायरियात मुख्य लक्षण. उलट्या, पोटात कळ, कधी शौचात रक्त पडणे अशी लक्षणेही दिसतात. बरेचदा हे सर्व मध्यम स्वरूपात असते, आपोआप नियंत्रणातही येते. काही वेळा मात्र जुलाब थांबत नाहीत व परिस्थिती गंभीर होऊ लागते.
आता प्रश्न हा आहे की, नेमके डायरियात जीवघेणे आहे तरी काय? अर्थातच शरीरातील पाणी व क्षार (सोडियम, पोटॅशियम इत्यादी) यांची झपाट्याने खालावणारी पातळी, म्हणजेच डिहायड्रेशन, शुष्कता, निर्जलीकरण हेच धोकादायक असते. जितके जास्त प्रमाणात व जास्त वेळा शौचास होईल, तितका डिहायड्रेशनचा धोका अधिक. शरीरातील पाण्याची पातळी १०% हून कमी होणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रणच ठरू शकते.
मग डायरियाची ही झटपट होणारी घोडदौड रोखायची कशी? जागतिक आरोग्य संघटनेनुसार या ‘स्वनियंत्रित’ आजारावर औषधांचा मारा करण्याची गरज नाही. काही विशिष्ट केसेसमध्ये इन्फेक्शन आटोक्यात आणण्यासाठी अँटिबायॉटिक्स जरूर वापरावी लागतात, पण उपचारांचा पूर्ण रोख हा शरीरातील कमी होणारे पाणी व क्षार यांची भरपाई करणे, म्हणजे निर्जलीकरणापासून पुनर्जलीकरणाकडे (डिहायड्रेशनकडून रिहायड्रेशनकडे) असावा. डिहायड्रेशनची लक्षणे ओळखणे व त्याचे गांभीर्य माहीत असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही माहिती असेल तर डायरिया सोबतची अर्धी लढाई आपण जिंकली समजा.
म्हणूनच डिहायड्रेशनच्या स्टेजेस जाणून घेणे महत्त्वाचे. जर जुलाब व्हायला नुकतीच सुरुवात झाली असेल, तर ओठ शुष्क होणे, तहान लागणे, बेचैनी, डोळे खोल जाणे अशी लक्षणे दिसतात. जुलाब होतच राहिले तर पायात कळा, मूल रडले तरी डोळ्यात पाणी न येणे, त्वचा कोरडी, सुरकुतलेली दिसणे, लघवी होण्याचे प्रमाण कमी होत जाणे, अंग गरम जाणवणे, चक्कर येणे, त्वचा चिमटीत पकडून सोडून दिली की, ती पूर्ववत होण्यास वेळ लागणे अशी लक्षणे दिसतात. नंतरच्या अवस्थेत मूत्रविसर्जन पूर्ण बंद होते, रुग्ण शुद्ध हरपून कोमामध्ये जाऊ शकतो. हे सर्व अगदी झटपट, काही तासांमध्येही घडू शकते. लहान मुलांमध्ये हा धोका अर्थात अधिकच असतो.
हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी पुनर्जलीकरण, जलसंजीवनीचा उपाय जुलाब सुरू झाल्यापासूनच करायचा.यात मुख्यत: मीठ, साखर, पाणी हे मिश्रण तोंडावाटे घ्यायचे. यालाच ‘ओरल रिहायड्रेशन सॉल्ट’(ORS) म्हणतात. डब्ल्यूएचओ व युनिसेफने प्रमाणित केल्यानुसार यात मीठ, साखर व इतर क्षार असतात. बाजारात हे पावडरच्या स्वरूपात वा तयार द्रावणाच्या स्वरूपात मिळतात. इलेक्ट्रॉल, पुनर्जल, ओआरएस, वालाइट वगैरे अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पावडर उकळून थंड केलेल्या पाण्यात वा ते शक्य नसेल तर मिनरल वॉटरमध्ये विरघळवून द्रावण तयार करायचे. लेबलवरील सूचनेनुसार ही जलसंजीवनी रुग्णास एकदम मोठा घोट न देता, चमचा-चमचा सातत्याने देणे योग्य. प्रत्येक जुलाबानंतर लहान मुलांना निदान पाव ते अर्धा कप आणि मोठ्यांना अर्धा ते एक कप द्रावण प्यायला हवे. हे द्रावण २४ तासांच्या आतच वापरायचे असते. घरीही आपण हे मिश्रण बनवू शकतो. ते साधारण असे असावे- १/२ (अर्धा) सपाट चमचा मीठ, ६ सपाट चमचे साखर, १ लिटर उकळून थंड केलेले पाणी. यात साखर व मीठ प्रमाणापेक्षा जास्त घालू नये. अधिक साखरेमुळे अतिसार कमी होण्याऐवजी वाढू शकतो. ज्या रुग्णांना मूत्रपिंडाचे विकार आहेत, त्यांनी ओआरएसच्या वापराबाबत डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. डिहायड्रेशनमुळे शुद्ध हरपत आहे, अशी रुग्णाची स्थिती असेल तर त्याला तोंडावाटे काहीही न देता सरळ डॉक्टरांकडे न्यावे. अतिगंभीर स्थिती असल्यास ओआरएस न देता शिरेतून इंजेक्शन चालू करावी लागतात.
उपयुक्त जीवाणूंचा पुरवठा करणारी प्रोबयॉटिक्स (उदा. स्पोरलॅक, सोलिब इत्यादी), झींक (Zinc) उत्पादनेही डायरिया रोखण्यास उपयुक्त ठरतात. काही औषधे आतड्याची हालचाल (anti-motility) कमी करत डायरिया आटोक्यात आणतात. उदा. डायफिनॉक्सिलेट, लोपेरामाईड इ. पण ही सर्व औषधे प्रिस्क्रिप्शन प्रकारातली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची. लहान मुलांमध्ये ही वापरणे सहसा योग्य नसते.
सारांश, पुनर्जलीकरण हा सोपा, स्वस्त, गुणकारी उपचार आहे. पण तरीही डायरियाने होणा-या मृत्यूची आकडेवारी भयावह आहे. डिहायड्रेशनने फार झपाट्याने मृत्यू ओढवू शकतो. म्हणून रिहायड्रेशन चालू करून त्वरित वैद्यकीय सल्ला घेतला, तर पुढचे गंभीर प्रसंग टाळता येतील. विशेषत: लहान मुलांच्या पालकांनी व सांभाळ करणा-या सर्व व्यक्तींनी ‘डिहायड्रेशन-रिहायड्रेशन’चे संजीवक सूत्र लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
अनेक रुग्ण मीठ, साखर, पाणी या उपायांना महत्त्व देत नाहीत. स्ट्राँग गोळ्या, इंजेक्शन द्या, असा आग्रह असतो. ही मानसिकता बदलायलाच हवी. आणि हो, डायरिया होऊच नये, यासाठी अशुद्ध पाणी, अन्नाचा वापर टाळणे, भाज्या, फळे स्वच्छ धुऊन घेणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, हात स्वच्छ धुणे, संतुलित अाहार या अगदी शालेय पाठ्यपुस्तकांत शिकलेल्या मूलभूत बाबीही आपण लक्षात ठेवूयाच!
symghar@yahoo.com