आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Digonistic Of Dengu By Dr.Sanjay Janwale

डासांचा प्रतिबंध हाच डेंग्यूवर सोपा इलाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या या विषाणूंचा फैलाव एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांच्या मादीपासून होतो. हे डास दिवसा चावतात. या डासाचे आयुष्य साधारण ३ ते ४ आठवडे असते. हे डास सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. एडिस इजिप्ती डासांच्या पाठ व पायांवर पांढ-या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना टायगर मॉस्क्युटी असे संबोधतात, हे डास घरामध्ये अंधा-या जागी असतात. तथापि घराबाहेरील थंड व अंधा-या जागेमध्येही त्यांचे वास्तव्य असते. डासांच्या अवस्था अंडी, अळी, कोष व पूर्ण डास अशी असून त्यापैकी पहिल्या तीन अवस्था पाण्यामध्ये असतात.

या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील साठलेले स्वछ पाणी उदा. रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कुलर्स, कारंजी, फुलदाण्या इत्यादी ठिकाणी होत असते. घराच्या परिसरातील टाकलेल्या निरुपयोगी वस्तूंमध्ये साठलेले स्वच्छ पाणी उदा. नारळाच्या करवंट्या, डबे, बाटल्या, प्लास्टिकची भांडी, रिकाम्या कुंड्या, टायर्स अशा ठिकाणीही या डासांची उत्पत्ती होत असते. डेंग्यू तापाच्या रुग्णांस एडिस इजिप्ती डासांची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंग्यू तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणपणे ८ ते १० दिवसांत डासांच्या शरीरात डेंग्यू ताप होऊ शकतो. एकदा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंग्यू ताप होऊ शकतो. एकदा दूषित झालेला डास तो मरेपर्यंत दूषित राहतो.

निदान
- फ्लू किंवा इन्फ्ल्युएन्झा तापामध्येदेखील ताप, सर्दी, अंग दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात. डेंग्यू फीव्हरची खास वेगळी लक्षणे नसल्यामुळे निदान करणे कठीण जाते. अंग खूप दुखणे, हाडापर्यंत ताप गेल्यासारखे वाटणे, अंगावर लालसर पुरळ दिसणे, शरीराच्या विविध भागांतून रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास डेंग्यू फीव्हरची शक्यता डोक्यात ठेवायला हरकत नाही.
- हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंमुळे होत असल्याने ते मलेरियाच्या पॅरासाइटसारखे रक्तात दिसत नाहीत. त्यामुळे साध्या चाचण्यांनी डेग्यू फीव्हरचे अ‍ॅन्टिबॅडिजची चाचणी करता येते. संशयित रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची स्थानिक स्तरावर डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे तपासणी करता येते. अशा रुग्णांमध्ये थोंब्रोसायटोपिनिया आढळून येतो. तसेच रक्तातील हिमॅटोक्रिटही वाढलेला असतो.
उपचार
विषाणूमुळे होणा-या या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणेच (उदा. गोवर, कांजण्या ) डेंग्यू फीव्हरचा उपचार हा लक्षणांवर असतो. भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे, हलका व समतोल आहार या बाबी उपचारांमध्ये महत्त्वाच्या असतात. जास्त ताप आल्यास पॅरासिटामोलची गोळी दिली जातो. सर्व अंगावर पुरळ उठलेले असल्यास व रुग्ण शॉकमध्ये असल्यास अशा रुग्णास रुग्णालयात भरती करून उपचार केले जातात. मात्र या रुग्णांना अॅस्पिरीन, ब्रुफेन इत्यादीसारखी औषधे देऊ नयेत.
 डेंग्यू हा प्रामुख्याने शहरी रोग आहे, परंतु आता खेडेगावातही त्याचे लोण पोहाचले आहे.
खेड्यातील अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची प्रवृती व अफाट बांधकामामुळे बांधलेले पाण्याचे हौद यामुळे एडिस डास आता शहरापासून लांबही पोहोचला आहे.
 गेल्या काही वर्षात आपल्याकडे डेंग्यू फीव्हरच्या साथीचे प्रमाण वाढले आहे. तसेच डेंग्यूत आणखी तीव्र आजार दिसू लागले आहेत. डेंग्यू हेमोरेजिक फीव्हर (dhf) व डेंग्यू शॉ सिन्ड्रोम (dss) अशा आजारात रक्त गोठविणा-या पेशींची संख्या खूप घटते आणि त्यात रोगी दगावण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तींना साध्या डेंग्यूची बाधा काही वर्षांपूर्वी झाली आहे. त्या व्यक्तींना डेंग्यूची परत बाधा झाली तर dhf / dss होण्याची शक्यता जास्त असते. सध्यातरी डेंग्यूवर औषध किंवा लस नाही. डासांची वाढ रोखणे हा डेंग्यूवर उत्तम उपाय आहे.
प्रतिबंधासाठी कीटकनाशक फवारणी
> पिपात साठवलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलून कोरडे करा आणि स्वच्छ पाणी भरा.
> घराच्या फुलदाणीतील पाणी दर आठवड्यातून एकदा तरी बदला.
> आठवड्यातून १ दिवस कारंजी कोरडी ठेवा, साठणा-या पाण्याची जागा नेहमी स्वच्छ करा.
> जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बाटल्या इत्यादी वस्तू यांची त्वरित विल्हेवाट लावा.
> पाण्याच्या सर्व टाक्यांची झाकणे एकसंध घडीव लोखंडाची घट्ट बसणारी, गोल आकाराची असावीत.
> राज्यात मागील काही वर्षांत तापाच्या साथीमध्ये, त्याही विशेषत डेंग्यू ताप, यासारख्या विषाणूजन्य तापाच्या साथी व रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तापाबरोबर अंगावर पुरळ दिसत असल्यास किंवा नाकातून व हिरड्यांतून रक्त येत असल्यास डेंग्यू फीव्हरचीच शक्यता लक्षात ठेवावी व रक्ताची चाचणी करून आजाराचे निदान पक्के करावे. लहान मुलांना डास चावण्यापासून संरक्षण मिळाले पाहिजे.
> पावसाळ्यात सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होण्याची व्यवस्था करणे, वापरात नसलेले पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या यात पाणी साठू न देणे, कीटकनाशकाची नियमित फवारणी करणे, मच्छर अगरबत्ती कॉइल व मॅट, लिक्कीडेटर यांचा वापर काही प्रमाणात डासांवर नियंत्रण करू शकतो.
> डेंग्यूवर लस नसली तरी, रक्तदात्याच्या रक्तातील प्लेटलेट्स देऊन डेंग्यूवर उपचार करता येतो. पण त्याहूनही अधिक डेंग्यूवर प्रतिबंध हाच जास्त खात्रीचा उपाय आहे. पाणी उघड्यावर साठू न देणे, शक्य असल्यास पाण्यात गप्पी मासे सोडणे, धुराळणी करणे या व यासारख्या जमेल त्या पद्धतीने डासांचा प्रतिबंध करणे हाच एकमेव डेंग्यूवर साधा, सोपा इलाज आहे. सामुदायिक कृती व शासनाची मदत यांच्या जोरावर डेंग्यूशी सामना सहज शक्य आहे.

अस्लो व्हायरस विषाणूमुळे...
1. सर्वसाधारण डेंग्यू फीव्हर : यामध्ये थंडी भरून ताप येणे, डोके दुखणे, सांधे व अंग दुखणे ही लक्षणे दिसून येतात. हाडाचा ताप break bone fever असे देखील या तापाचे वर्णन केले जाते. यात डोळ्यांचे स्नायू दुखावयास लागतात. खांदे, कोपर, मनगट, गुडघा, घोट, लहान सांधे दुखू लागतात. हालचाल मंदावते. रुग्ण विषण्ण होतो. क्वचित प्रसंगी चिडचिडेपणाही येतो. कधी कधी यकृतावर सूज येते व कावीळची लक्षणे दिसू लागतात. पोटात दुखणे, उलट्या होणे, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. सात ते आठ दिवसांनंतर उतार पडावयास सुरू होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. एकूण हा आजार दहा दिवस राहतो.
2. हेमोरेजिक डेंग्यू फीव्हर : एकापेक्षा जास्त प्रकारच्या विषाणूंची लागण झाल्यास डेंग्यू फीव्हरचा हा प्रकार पाहण्यास मिळतो. वर उल्लेखिलेल्या सर्व लक्षणाशिवाय यामध्ये सर्व अंगावर लालसर डाग उमटणे, नाकातून व हिरड्यातून रक्त येणे, रक्ताची उलटी होणे शौचावाटे रक्त जाणे ही लक्षणे दिसू लागतात.
3. डेंग्यू शॉक सिन्ड्रोम : यात प्रकृती अतिशय ढासाळलेली असते. नाडी क्षीण होत जाणे, ब्लड प्रेशर कमी होत जाणे, रक्तपुरवठा नीट न होणे यासारखी लक्षण दिसू लागतात. व्यवस्थित इलाज न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. डेंग्यूच्या विषाणूंमुळे प्रथम चपट्या पेशी व नंतर पांढ-या पेशी मरतात. त्यामुळे रक्त गोठणे व रोगप्रतिकार या क्षमतांमध्ये विलक्षण घट होते.