आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Dilip Kumar's Autobiography By Priyanka Dahale, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इसे शोहरत नहीं कहते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘गुजारिश है हवाओं की हमें सूरज से मिलवाओ
हमें भी रौशनी के काफिलों के साथ ले आओ
हमें मालूम है अपनी हदें, हम कैसे कुछ बोले
खिली हो धूप तो, नाचीज दीपक कैसे मुंह खोले’
गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या कवितेचे अत्यंत प्रसन्न वातावरणात अभिनेता आमिर खानने वाचन सुरू केले आणि गेली सहा दशके ज्या अभिनेत्याच्या अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक प्रकारचे उत्थान पर्व अनुभवले, त्या युसूफ खान सरवर खान पठाण ऊर्फ दिलीपकुमार यांची छबी या ओळींमधल्या अर्थांमधून उपस्थितांसमोर उलगडू लागली. निमित्त अर्थातच उदयतारा नायर लिखित ‘द सबस्टन्स अ‍ॅँड द शॅडो’ या बहुप्रतीक्षित पुस्तकाच्या प्रकाशनाचे होते...पडद्यावरचे आणि पडद्यामागचे असे दुहेरी जीवन जगताना कलाकाराला स्वत:च्या तत्त्वांना कायम तावून-सुलाखून घ्यावे लागते. वास्तव आयुष्यातील जगण्याच्या संघर्षाबरोबर पडद्यावरील आभासी जगण्याशीही संघर्ष करावा लागतो. मोहंमद युसूफ खान ते दिलीपकुमार अशी ओळख निर्माण करणा-या दिलीपकुमार यांच्याकडे अशा संघर्षाकडे पाहण्याची डोळस दृष्टी होती. म्हणूनच त्यांच्या अभिनयाची कारकीर्द समृद्ध तर होत गेलीच, शिवाय त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील समृद्ध होत गेले. याचीच प्रचिती त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात येत होती.
‘देवदास’, ‘मधुमती’, ‘मुघल-ए-आझम’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमधून सशक्त अभिनय करणा-या दिलीपकुमार यांच्या अर्धांगिनी व ज्येष्ठ अभिनेत्री सायराबानो यांनी आत्मचरित्र लेखनापासून सोहळ्याचे नियोजन-आयोजन करण्यापर्यंत घेतलेला पुढाकार नजरेत भरणारा होता. सायराबानो यांनी सुरुवातीलाच आत्मचरित्र लेखनामागची भूमिका आणि त्यातील आशयाबाबत मनोगत व्यक्त करताना पुस्तकातील घटना-प्रसंग ज्या परिप्रेक्ष्यात लिहिले आहेत, त्यानुसारच त्यांचा अन्वयार्थ लावण्याची विनंती केली. त्यातून त्यांचा सावधपणा दिसून आलाच; पण कलावंतांच्या गतजीवनातल्या घडामोडींवरून मनं कलुषित होऊ नयेत, याची काळजीही दिसली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, कार्यक्रमाचे ठिकाण एक पंचतारांकित हॉटेल असूनही या सोहळ्याचे व्यासपीठ मात्र अत्यंत साध्या नेपथ्याने सजलेले होते. त्यात बॉलीवूडचा एरवी जाणवणारा भडकपणा नव्हता की इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा अनाठायी प्रभाव नव्हता. मात्र दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीमुळे प्रकाशन सोहळ्यास आपसूकच झळाळी आल्याचे अनुभवास आले. माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा यांचे दीपप्रज्वलन करणे असो वा त्यांचे जिव्हाळपूर्ण शब्दांत मनोगत व्यक्त करणे असो; या छोट्या छोट्या गोष्टींमुळे 91 वर्षे वयोमान असलेल्या, पण अजूनही तितकेच उमदे दिसणा-या दिलीपकुमार यांच्या नव्या पिढीशी असलेल्या नात्याची प्रचिती आली. त्यांचे एकेकाळचे सहकारी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांनी दिलीपकुमार यांच्याशी साधलेल्या संवादाने दिलीपकुमार यांच्याशी निगडित कितीतरी पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला. सायराबानो सबंध कार्यक्रमात दिलीपकुमार यांची सावली होऊन वावरत असल्या तरीही, कार्यक्रमात उपस्थित नव्या-जुन्या पिढीतले सर्वच कलावंत आस्थेने दिलीपकुमार यांची काळजी घेताना दिसत होते. त्या अर्थाने आलेला प्रत्येक जण दिलीपकुमार यांची सावली होऊन तेथे वावरत होता. त्याचप्रमाणे धर्मेंद्र आणि अमिताभ या दोन दिग्गजांच्या नम्र चेह-यावर जसा दिलीपकुमार यांच्याबद्दल आदरभाव जाणवत होता; तसाच सभागृहात उपस्थितांच्या एकूणच देहबोलीतून, वावरातून पुरेपूर विनम्रपणा झळकत होता. महानायक अमिताभ यांच्याशी बोलताना प्रियांका चोप्राच्या चेह-यावरील भारावलेले भाव लपत नव्हते. वैजयंतीमाला यांच्या चेह-यावर तर गतकाळातील अनुभवांचा बोलपटच सरकतो आहे, असे जाणवत होते. मात्र या सगळ्यातही, उत्सवमूर्ती दिलीपकुमार यांच्या चेह-यावर एक प्रकारची स्थितप्रज्ञता जाणवत होती. अपार मायाळू आणि नम्र अशा भावनांनी त्यांच्याभोवती सगळे जमले असताना दिलीपकुमार यांचा चेहरा मात्र निर्विकार होता. अल्झायमरच्या आजाराची वेदना त्या निर्विकारपणात दडलेली होती. पण म्हणून त्यांच्यापाशी येणारा प्रत्येक कलाकार मूक होऊन थांबत नव्हता. त्यांच्याशी एकतर्फी का होईना संवाद साधत होता. अमिताभ यांनी दिलीपकुमार यांना हाताला धरून व्यासपीठावरील खुर्चीवर बसवले असताना, दिलीपकुमारांचा चेहरा जरी शांत असला तरी उपस्थितांनी दोन दिग्गजांमधील हा स्नेहभाव आपल्या नजरेत, कॅमे-यात टिपण्याची संधी सोडली नव्हती...
हिंदी चित्रपटसृष्टीचा इतका पराकोटीचा आदर प्राप्त केलेल्या या नायकाच्या चरित्रलेखनाचा हा प्रवास समर्थपणे शब्दांत टिपलेल्या ज्येष्ठ पत्रकार व लेखिका उदयतारा नायर यांच्या बोलण्यातून आदर ओसंडून वाहणे स्वाभाविक होते. सरतेशेवटी सायराबानो उपस्थित जुन्या पिढीतील कलावंतांसोबतच नव्या पिढीतल्या कलाकारांचेही ऋण व्यक्त करण्यास विसरल्या नव्हत्या. प्रसून जोशी यांची प्रतीकात्मक कविता आणि आमिर खानचे अभिवाचन ही त्या ऋणाची परतफेडच होती.
‘चमकती चीज को छूने को दुनिया पास आती है
हो शोहरत पास जिसके सुर में सुर मिलाती है
मगर सूरज उतरता है तो भीड छंटती जाती है
कहीं सजदे कहीं इज्जत, इबादत मुस्कुराती है
इसे शोहरत नहीं कहते बस उसका नूर कहते है
बुलंदी भी नहीं कहते करम भरपूर कहते हैं...
priyanka.dahale@dainikbhaskargroup.com