आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Diplomate Jagatsingh Mehta, Indian Foreign Service, Divya Marathi

धडाडीचा मुत्सद्दी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारील देशांबाबत परराष्‍ट्रधोरण आखताना सीमारेषांचा विचार प्रामुख्याने करावा लागत असे. चीनसमवेत सीमारेषेबाबत बोलणी करण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांनी जगतसिंग मेहता यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीसमोरची आव्हाने व त्यांनी केलेले काम हे वास्तविक त्या वेळच्या भारताच्या परराष्‍ट्रधोरणाचे कसब होते. त्याप्रसंगी चीनसमवेत प्रदीर्घ चर्चा झाल्या. त्याचा 10 मोठ्या ग्रंथांएवढा अहवाल तयार झाला.

1962मध्ये चीनशी युद्ध होऊनही भारताने त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडले नाहीत, हे विशेष. हे युद्ध उभय देशांचे परराष्‍ट्रधोरण असफल झाल्यामुळे घडल्याचे जगतसिंग मेहता यांचे मत होते.
त्या वेळचे उभय देशांमधील वातावरण तणावपूर्ण असतानाही मेहता यांनी अत्यंत कुशलतेने राजनैतिक पातळीवर चीनशी सौहार्दाचे संबंध राहतील, यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. चीनमधील त्यांची कामगिरी बघता, आंतरराष्‍ट्रीय राजकारणाचा त्यांचा प्रकांड अभ्यास पाहता, आणि राजनैतिक पातळीवर शिष्टाई करताना त्यांनी जोपासलेला दृष्टिकोन पाहता, जगत मेहता यांचे नाव परराष्‍ट्रव्यवहार खात्यामध्ये आदराने घेतले जात होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मेहता यांनी आफ्रिकेतील टांझानियातही काम केले. ज्युलिएस न्येरेरे यांच्याशी असलेले पूर्ण मैत्रीचे संबंध भारत-टांझानिया मैत्री संबंधांतील एक महत्त्वाचे पर्व ठरले होते. टांझानियातून ते पुन्हा भारतात आले व इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्‍ट्रसचिव म्हणून काम पाहिले.


इतिहासाच्या एका टप्प्यावर बांगलादेशसोबतचा फराक्का धरण पाणीवाटपाचा प्रश्न गंभीर झाला होता. हुगळी नदीचे लाखो क्युसेक पाणी बांगलादेशमध्ये प्रवेश करताना, प्रचंड नुकसान करत होते. हा प्रश्न राजनैतिक पातळीवर सोडवण्यास जगत मेहता यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. सोव्हिएत रशिया आपल्याला शस्त्रास्त्रपुरवठा करत असल्याने व काश्मीरसंदर्भात युनोमध्ये व्हेटो अधिकार वापरत असल्याने आपण त्यांच्या उपकारात अडकलो, अशी खंत मेहता वारंवार व्यक्त करत. भारताने शीतयुद्धाच्या चौकटीतून बाहेर पडून सोव्हिएत रशियाशी वास्तववादी, व्यावहारिक संबंध प्रस्थापित करण्याची गरज होती, असेही त्यांचे प्रारंभापासून मत होते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि भारताच्या दृष्टीने भारतीय उपखंडात लष्करी सामर्थ्य वाढत असल्याचा तज्ज्ञांचा दावा होता; पण वास्तविक लष्करी सामर्थ्य नव्हे तर कडवा राष्‍ट्रवाद वाढत होता. पाकिस्तानच्या लष्कराने तालिबानच्या वाढत्या कारवायांकडे दुर्लक्ष केले होते. अमेरिकेनेच पहिल्यांदा तालिबानी संघटनांना भरघोस मदत दिली होती. मुजाहिदीन गटांना पाठिंबा दिला होता. ओसामा बिन लादेन पहिल्यांदा सीआयएच्या मदतीने अफगाणिस्तानात स्थिर झाला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या आदिवासी पट्ट्यात तालिबान फौजा अमेरिकी नाटो फौजांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या, त्या राष्‍ट्रवादाच्या जोरावर. या जळजळीत वास्तवाकडे जगत मेहता यांनी जाणकारांचे लक्ष वेधले होते.


दक्षिण आशियात वाढलेला दहशतवाद तीन प्रमुख गोष्टींमुळे फोफावला असल्याचे मेहतांचे ठाम मत होते. (1) 1979मध्ये तेहरानमध्ये अमेरिकी राजनैतिक अधिका-यांना ओलीस ठेवण्यात आलेली घटना, (2) 3 जानेवारी 1980 रोजी अफगाणिस्तानात घुसलेल्या सोव्हिएत फौजा आणि (3) 2001मध्ये न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला. या तिन्ही घटनांची संगती लावल्यास दक्षिण आशियात दहशतवाद कसा पसरला, याचा सहज बोध होऊ शकतो, असे त्याचे म्हणणे असायचे.


परराष्‍ट्रधोरण इतिहासाचे ओझे डोक्यावर घेऊन आखता येत नाही. त्याला बदलत्या काळाचे भान असणे गरजेचे असते. जनमताच्या दबावाला बळी पडून पाक व चीनसारख्या उपद्रवमूल्य असलेल्या शेजारील देशांशी राजनैतिक धोरण आखता येत नाही. 21व्या शतकातील राजनैतिक आव्हाने सोडवण्यासाठी चर्चेशिवाय अन्य दुसरा प्रभावी मार्ग नाही. जर एखादा प्रश्न सुटत नसेल तर तो प्रश्न चिघळू न देणे महत्त्वाचे आहे. भारतीय मुत्सद्दींनी आपली बहुविविधता व सहिष्णुता या मूल्यांचा आपल्या परराष्‍ट्रधोरणात प्रभावीपणे वापर केला पाहिजे, हेही त्यांनी त्या-त्या वेळी ठासून सांगितले होते. त्यांच्या या ठामपणामागे जितकी त्यांची बुद्धिमत्ता आणि अभ्यास होता; तितकाच पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा-राजीव गांधी, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी अशा बहुमुखी प्रतिभा असलेल्या नेत्यांसोबतचा अनुभवही झळकत होता. येत्या लोकसभा निवडणुकीपाठोपाठ भारताबरोबरच दक्षिण आशियाचाही कॅन्व्हासही बदलणार आहे. हा काळ ख-या अर्थाने भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी पाहणारा ठरणार आहे. अशा वेळी धडाडीचा मुत्सद्दी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जगत मेहतांचे नसणे प्रकर्षाने जाणवत राहणार आहे.
(संदर्भ- द ट्रिस्ट बिट्रेड : रिफ्लेक्शन ऑन डिप्लोमसी अँड डेव्हलपमेंट, वायकिंग-पेंग्विन-2010)


मेहतांचे परराष्ट्र सेवेमधील योगदान
माजी परराष्ट्र सचिव जगतसिंग मेहता यांचे 6 मार्च 2014 रोजी उदयपूर (राजस्थान) येथे निधन झाले. भारतीय परराष्ट्रनीतीच्या जगतातील एक चमकता तारा जणू निखळून पडला. मेहता यांचा जन्म 17 जुलै 1922 रोजी झाला. वडील मोहनसिंग भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते. मेहतांचे शिक्षण अलाहाबाद आणि केंब्रिज विश्वविद्यालयांमध्ये झाले. भारतीय परराष्ट्रातील सेवाकालात (1947 ते 1980) त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. सन 2002मध्ये त्यांना सामाजिक सेवेसाठीचा पद्मभूषण पुरस्कारसुद्धा लाभला होता. भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी काही काळ नौदलामध्ये व्यतीत केला होता. परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाल्यावर अल्पावधीतच त्यांनी पंडित नेहरूंचे लक्ष वेधून घेतले होते. मेहता 1957 ते 1961 या कालावधीत परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व विभागामध्ये कार्यरत होते. चीनबरोबरच्या अनेक सीमा-चर्चांमध्ये त्यांनी भारतातर्फे नेतृत्व केले होते. 1962 नंतरच्या चीनबरोबरच्या युद्धोत्तर कठीण काळामध्ये (1963 ते 1966) मेहतांनी ‘प्रभारी अधिकारी’ (चार्ज-डि-अफेअर्स) म्हणून बीजिंग येथे काम केले. याव्यतिरिक्त त्यांनी भारतीय उच्चायुक्त म्हणून 1970 ते 1974 या काळात टांझानियामध्ये काम केले. त्यांच्या सेवाकालात त्यांनी इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंडमधील भारतीय वकिलातीमध्येही विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. भारतीय परराष्ट्र सचिव म्हणून 1976 ते 1979 या काळात त्यांनी भरीव योगदान दिले. निवृत्तीनंतरच्या काळात ते टेक्सासमधील विश्वविद्यालयात ‘मानद प्राध्यापक’ म्हणून तसेच वुड्रो विल्सन सेंटरसारख्या अनेक संस्थांमध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. राजनैतिक संबंधांवर त्यांनी अनेक लेख, पुस्तके लिहिली. उदा.‘मिलिटरायझेशन इन द थर्ड वर्ल्ड (1985)’, ‘निगोशिएटिंग फॉर इंडिया (2006)’. आत्मकथनपर लिहिलेले त्यांचे पुस्तक ‘द ट्रिस्ट बिट्रेड’ त्यांच्या सेवाकालातील ब-याच घटनांवर प्रकाश टाकते. निवृत्तीनंतर उदयपूरमधील ‘सेवा-मंदिर’ या सामाजिक संस्थेद्वारे त्यांनी भरीव कार्य केले.
- विश्वास सकपाळ (कौन्सिल जनरल ऑफ इंडिया, सेंट पिटर्सबर्ग, रशिया)