दिव्या दत्ता हिने बॉलीवूडमध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. ती एक प्रतिभाशाली अभिनेत्री असल्याचे समीक्षकांनी कधीच मान्य केले आहे. दिव्याचे नाव घेताच ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘शहीद-ए-मोहब्बत’ आदी चित्रपटांची नावे आठवू लागतात. या चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला होता. त्याशिवाय ‘वीर-झारा’, ‘दिल्ली-6’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांसाठी तिचे सहअभिनेत्री या गटामध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही झाले होते.
दिव्या दत्ताचा ‘छोटे सरकार’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तिचीच भूमिका असलेला ‘अग्निसाक्षी’ हा चित्रपट झळकला होता. हा चित्रपट लोकप्रिय होण्याचे सारे श्रेय अलगद मनीषा कोईरालाच्या पदरात जाऊन पडले होते. त्या सुमारास राजू मवानी दिग्दर्शित ‘राम और श्याम’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असलेल्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये माझे जाणे झाले होते. डॅनी, ओम पुरी, टिनू आनंद यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात दिव्या व कंचन या अभिनेत्रींना मात्र फारसा वाव नव्हता. अंगप्रदर्शन ही त्यांच्या भूमिकांची मागणी होती. या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या दोन्ही नायकांकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले होते. हिंदी चित्रपटांचे नावाजलेले लेखक राजिंदर सिंह यांचा नातू व दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांचा पुत्र माणेक बेदी व ‘फिल्मालय’चे संस्थापक शशधर मुखर्जी यांचा नातू व काजोलचे काका रोनू मुखर्जी यांचा पुत्र सम्राट मुखर्जी हे दोन्ही नायक त्या वेळी चर्चेचा विषय बनले होते. या कलाकारांची मुलाखत आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. मी तयार केलेले प्रश्न दिव्या दत्ता ‘राम और श्याम’मधील नायक माणेकला विचारणार होती. याच पद्धतीने कंचन काही प्रश्न आपला नायक सम्राटला विचारणार होती. आपल्या नायिकांच्या प्रश्नांना दोन्ही नायकांनी दिलेली उत्तरे आम्ही प्रसिद्ध करणार होतो. वेगळ्या पद्धतीने मुलाखत घेण्याची ही कल्पना या सर्वच कलाकारांना पसंत पडली होती. ‘राम और श्याम’च्या चित्रीकरणादरम्यान मिळणा-या मोकळ्या वेळात हे कलाकार आगळ्या पद्धतीने परस्परांच्या मुलाखती घेतील, असे मला सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन दिवस उलटले तरी या कलाकारांना मोकळा वेळ मिळण्याची काही चिन्हे दिसेनात. कोणालाही मुलाखत देण्यासाठी ‘वेळ’ होत नव्हता! हे असे सुरू असताना दिव्या दत्ता माणेक बेदीच्या जवळ जाऊन बसली आणि त्याला म्हणाली, ‘अभिनय क्षेत्रात मी तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. हे लक्षात घेता प्रसारमाध्यमे आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत, हे तुला सांगावेसे वाटते.
माध्यमे चित्रपट रसिकांच्या मनात आपली एक प्रतिमा तयार करत असतात. त्याच प्रसारमाध्यमांकडे आपण गेले तीन दिवस कानाडोळा करत आहोत. उद्या जर याच प्रसारमाध्यमांनी आपल्याकडे कानाडोळा केला, तर कलाकारांना कोणी हिंग लावून विचारणार नाही!’ माझी जी फरफट सुरू होती ती लक्षात आल्याने डॅनी, कंचन, दिव्याने आपल्या परीने मुलाखत पार पडण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले होते. या सर्वांच्या मुलाखती पार पडल्यानंतर मी दिव्या दत्ताला धन्यवाद दिले. त्या वेळी तिने सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. या सगळ्या घटनेला अठरा वर्षे उलटून गेली, पण आजही जेव्हा कधी दिव्या दत्ताशी दूरध्वनीवर वा प्रत्यक्ष बोलण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तिच्या बोलण्यातला तो विनम्र स्वर अजूनही कायम आहे, याची जाणीव होते. तो स्वर मग जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करतो...
dpsingh@dainikbhaskargroup.com