आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागचा 'मसान' !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगेच्या तीरावर वसलेलं वाराणसी म्हणजेच काशी ही या देशाची अाध्यात्मिक व सांस्कृतिक राजधानी... शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा अशा अनेक गोष्टींचा संगम असलेल्या काशीबाबत म्हणूनच आपल्याकडे ‘काशीस जावे नित्य वदावे’ असे म्हटले जात असते. बॉलीवूडदेखील त्याला अपवाद नाही. म्हणूनच आतापर्यंत हिंदी पडद्यावर बनारसच्या पार्श्वभूमीवर अनेच चित्रपट येऊन गेले. सत्यजीत रे यांच्या ‘अपराजितो’पासून धनुषच्या ‘रांझणा’पर्यंत... मात्र देशाच्या याच अाध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानीची एक काळी बाजूदेखील आहे आणि ही काळी बाजू उजेडात आणण्याचा बॉलीवूडमध्ये जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा आपल्याकडच्या संस्कृतीरक्षकांनी तो हाणून पाडला. मग तो वाराणसीच्या विधवांच्या प्रश्नावरचा दीपा मेहता दिग्दर्शित ‘वॉटर’ असो, वा नव्याने येऊ घातलेला सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’... वाराणसीच्या विधवांचे शोषण, वाराणसीमधला वेश्या व्यवसाय आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेला चरस-गांजाचा व्यवहार...
या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मसान’ हा चित्रपट तसा सुदैवीच म्हणायला हवा. वाराणसीमधील सामाजिक, लैंगिक आणि जातीच्या उतरंडीवर आधारित ‘मसान’वर सध्या कौतुकांचा वर्षाव होतोय. कान फिल्म फेस्टिव्हल गाजवल्यानंतर आता ‘मसान’ने इथल्या व्यवस्थेला अस्वस्थ करून सोडलंय.

बनारसच्या हरिश्चंद्र घाटावर चिता जाळणे हा ज्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे, त्या डोम समाजाची व्यक्तिरेखा ‘मसान’मध्ये दाखवण्यात आली आहे. जातीच्या उतरंडीत सगळ्यात खालच्या स्तरावर असलेला हा डोम समाज आपल्या चातुर्वर्ण्याचाच एक भाग असल्याने कदाचित संस्कृतीरक्षकांना ‘मसान’मध्ये काहीही वावगं वाटलं नसावं. विधवांचे शोषण किंवा अमली पदार्थांचा व्यवसाय या गोष्टी बनारसच्या परंपरेला बाधा आणणा-या ठरतात, मात्र चिता जाळणारा डोम समाज हा त्या परंपरेचाच एक भाग असल्याने त्यांनी या चित्रपटाला विरोध केला नसावा.

हरिश्चंद्र घाटावर पेटत असलेल्या असंख्य चिता... हातातल्या बांबूने कवटी फोडणारा डोम समाजाचा तरुण नायक... प्रेताच्या अंगावरचे कफन चोरून पळ काढणारी लहान मुलं... खच पडलेल्या प्रेतांमधून पळत असलेल्या लहानग्या चोरांना पकडून केली जाणारी बेदम मारहाण... चिता जाळण्यासाठी आपला नंबर कधी येईल या विवंचनेत असलेला डोम राजा... गंगेच्या पाण्यात सूर मारून कोण अधिकाधिक पैशांची नाणी शोधून काढतो यावर चाललेला जुगार... चाळणीत मृताची राख घेऊन सोन्या-चांदीचे कण शोधणारे हात... आजपर्यंत पडद्यावर कधीच न दिसलेल्या अशा अनेक प्रसंगांना फक्त स्पर्श करून दिग्दर्शक नीरज घायवान पुढे निघून गेला आहे. कदाचित चित्रपटाची मर्यादा आणि कथानक त्याला कारणीभूत असू शकतील. परंतु तरीही हे पैलू प्रकाशझोतात आणून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना एक वेगळे जग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, याबद्दल त्याचे कौतुक करावेच लागेल...

वाराणसीचे हे भयावह, भीषण, दाहक वेगळे जग प्रत्यक्षात आहे तरी कसे...?
वाराणसीच्या याच घाटावर म्हणे सत्यवचनी हरिश्चंद्र हा डोम राजाच्या नोकरीला होता. त्याची पत्नी तारामती जेव्हा सर्पदंशाने मृत झालेल्या आपल्या मुलाचे, रोहितचे शव घेऊन या घाटावर आली, तेव्हा हरिश्चंद्र राजाने तारामतीकडूनही कर मागितला होता आणि तो कर भरण्यासाठी पैसे नसल्याने तारामतीने आपल्या मुलाच्या शवासह चितेत उडी टाकली होती. शेवटी स्वर्गातून देवलोक प्रकटले आणि त्यांनी राजा हरिश्चंद्राला आशीर्वाद देऊन पत्नी-मुलासह त्याचे सगळे गतवैभव परत केले... आणि म्हणूनच इथला डोम समाज आपण राजा हरिश्चंद्राचे वंशज असल्याचे सांगत असतो.

असे असतानाही जिथे जीवनाचा शेवट होतो तिथे त्यांच्या जगण्याचा प्रारंभ होतो. जोपर्यंत कुणी मरत नाही तोपर्यंत त्यांच्या पोटाचा मार्ग मोकळा होत नाही. मयताच्या अंगावरचे कपडे, दागिने आणि मयताला जाळल्यानंतर मिळणारी दक्षिणा हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन... वाराणसीच्या मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाटावरची ही पिढ्यान््पिढ्या सुरू असलेली विदारक परिस्थिती आणि या ज्वाळांच्या दाहकतेत होरपळून निघत असलेला इथला डोम समाज...

धर्म, कर्म आणि मोक्ष नगरी म्हणून सबंध जगभरात डंका पिटणा-या या वाराणसी नगरीत आजही डोम समाज अस्पृश्यच... मुझे अगर बाजार में एक गिलास पानी भी पीना होता है तो मै उस गिलास को छू नही सकता हूं, जिससे मै पानी पी रहा होता हूँ, पिलानेवाला मुझे उपर से पानी पिला देता है... स्थानीय लोग यहां तक की मेरे पडोसी मुझे घर के अंदर नही आने देते है और न ही मेरे घर में कोई आता है... हरिश्चंद्र घाटाच्या परिसरात राहणा-या संजीत डोमची ही कैफियतच डोम लोकांचे समाजातील स्थान स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ज्या डोम राजाशिवाय वाराणसीच्या घाटांवरचे अंत्यसंस्कार पूर्ण होऊच शकत नाहीत, त्या फक्त नावाचेच राजे असलेल्या डोम समाजाला कुठल्याच मंदिरात प्रवेश दिला जात नाही, यापेक्षा अधिक लाजिरवाणी बाब काय असू शकेल?

काशीच्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर अहोरात्र चिता जळत असतात. मोक्षप्राप्तीसाठी इथे देशाच्या कानाकोप-यातून अंत्यसंस्कारासाठी किंवा अस्थिविसर्जनासाठी लोक येत असतात. असे म्हणतात की, या घाटांवरची चितेची आग आजतागायत कधीही विझलेली नाही. नवीन चिता पेटवण्यासाठी आगकाडीचा इथे कधीच वापर केला जात नाही, कारण तशी वेळच येत नाही... दिवसरात्र जळणा-या प्रेतांच्या वासाने या घाटांना कायम वेढलेलं... हा वास धुसरसाही नाकात शिरला तर आपण अस्वस्थ होतो, तर डोम समाजाला या वासाची इतकी सवय झाली आहे की, त्याचं अस्तित्वही त्यांना जाणवत नाही. संजीत डोम म्हणतो, इथे अनेकदा शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह आणले जातात, प्रचंड दुर्गंधी येते. ती जाणवू नये, यासाठी आम्ही दररोज किमान आठ बाटल्या दारू पिऊनच ही कामं करत असतो.
बालपण हरवून बसलेली डोम समाजाची लहान मुलं हे या घाटांवरचे आणखी एक विदारक सत्य.

भटजींचे मंत्रोच्चार, नातेवाइकांचा आक्रोश, अंत्यसंस्काराची लगबग आणि अशा परिस्थितीचा अचूक फायदा उचलत गिधाडाप्रमाणे सावजावर तीक्ष्ण नजर ठेवून असलेली ५ ते १५ वर्षे वयोगटातली ही मुलं... प्रेताच्या अंगावरचे कफन हे त्यांचे सावज... प्रेतयात्रा जेव्हा घाटावर पोहोचते, तेव्हा ही मुलं त्याच्या आजूबाजूलाच फिरकत असतात आणि ज्या क्षणी खांद्यांवरचे प्रेत खाली जमिनीवर ठेवले जाते, त्याच क्षणी विजेच्या चपळाईने ही मुलं प्रेताच्या अंगावरचे कफन घेऊन असा काही पळ काढतात, की कुणाच्या लक्षात येण्या अगोदरच ते गायब झालेले असतात. ज्या दुकानातून नातेवाइकांनी कफन विकत घेतलेले असते, त्याच दुकानात ते कफन विकून चार पैसे मिळाले की पुन्हा दुसरे कफन चोरण्यासाठी पुढची व्यूहरचना आखण्यास घाटावर हजर... आणि पकडले गेल्यास लाथा-बुक्क्यांनी मार खाण्यासही तयार...
डोम समाजातला प्रत्येक जण घाटावर चिता जाळण्याचेच काम करत असल्याने इथे त्यांनी आपापसातच कामाची वाटणी केली आहे. म्हणजे, आज जर एखाद्या डोमाचा नंबर लागला तर त्या दिवशी घाटावर जितक्या चिता जळतील त्या सगळ्यांचे उत्पन्न त्याचेच. मात्र असा दिवस पुन्हा उगवतो तो मात्र थेट वर्ष-दोन वर्षानंतरच... अशा वेळी पोटाची आग विझवण्यासाठी मग ही मुलं चितेच्या आगीशी खेळत हा कफन चोरण्याचा धंदा करतात.

‘मसान’ चित्रपटामध्ये लहान मुलं गंगेच्या पात्रात उड्या मारतात आणि पाण्याखालून कोण किती नाणी शोधून काढतो यावर जुगार खेळला जातो, असे एक दृश्य आहे. पडद्यावर वरकरणी हा फक्त खेळ वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यामागचा खेळ खूपच भयंकर आहे. ज्या क्षणी चितेची किंवा अस्थिविसर्जनाची राख पाण्यात सोडली जाते, त्याच क्षणी मुलांचे घोळके पाण्यात उड्या टाकतात. पाण्याखालची वाळू हाडांच्या अणकुचीदार तुकड्यांनी भरलेली... पाण्यातल्या वनस्पतींना कुजलेले कपडे अडकलेले... पायाखाली वळवळणारे असंख्य कीटक... सतत पाण्यात अस्थी सोडल्यामुळे एक प्रकारची दुर्गंधी... आणि अशा घाण पाण्यात उड्या टाकणारे लहानगे जीव... कशासाठी, तर जो इतरांपेक्षा लवकर पाण्याच्या बुडाशी पोहोचेल, त्याच्याच हाती काहीतरी ‘घबाड’ लागेल. हे घबाड म्हणजे नाण्यांची चिल्लर किंवा एखादा सोन्या-चांदीचा किरकोळ दागिना. कुणी पाटीची चाळण पाण्यात बुडवून राख वर काढतंय, तर कुणी हातातल्या लोहचुंबकाला पैसा चिकटतो का ते पाहतोय... अस्थींबरोबर सोडलेले पैसे, सोन्या-चांदीचे कण शोधण्यासाठी मग या घाटावर मुलामुलांमध्ये सुरू होतं युद्ध... सगळ्या प्रकारच्या मानवी मूल्यांच्या नरडीला नख लावून चालतं राहावं असं हे चित्र... शिक्षणाचा पत्ता नाही... बापाचा चिता जाळण्यासाठी नंबर येईलच याची शाश्वती नाही... मग घरची चूल पेटणार तरी कशी? आठ-दहा तास सतत घाणेरड्या पाण्यात राहून त्वचेची काय अवस्था होत असेल या पोरांची... अनेकांच्या उघड्या शरीरावर भाजले गेल्याचे डाग दिसतात. कोवळ्या वयातच अनेकांच्या हातापायांना भेगा पडलेल्या दिसतात...

माणुसकी आणि आत्मसन्मानाची राख करून कसं जगलं जातं, हे पडद्यावरच्या ‘मसान’मध्ये दिसणार नाही. तर त्यासाठी पडद्यामागचा ‘मसान’ पाहायची इच्छा असणे गरजेचे आहे. याच विषयावर २००८मध्ये प्रख्यात माहितीपटकार राजेश जाला यांचा ‘चिल्ड्रेन ऑफ दी पायर’ हा माहितीपट प्रसिद्ध झाला होता. डोम समाजातील सात लहान मुलांच्या आयुष्याचा एक कॅनव्हास त्यांनी या माहितीपटामधून असा काही उभा केला होता, की पाहणा-यांना त्याचे चटके बसलेच पाहिजेत. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरीदेखील याच अंगाने जाणारी... परंतु कादंबरी असो की माहितीपट, त्याला मर्यादित असा वाचक आणि प्रेक्षक आहे. चित्रपट या माध्यमाचे तसे नाही. कान चित्रपट महोत्सवात ‘मसान’ चित्रपटाला तब्बल पाच मिनिटांपर्यंत उभं राहून अभिवादन केलं गेलं... आज ‘मसान’वर कौतुकाचा वर्षाव होतोय... त्याला आणखी अनेक पुरस्कार मिळतील... काही दिवसांत चित्रपट पडद्यावरून खाली उतरवला जाईल... पुढे काय? विकिपीडियावर बनारस घाटाचे रसभरीत वर्णन आढळते. रोज संध्याकाळी या घाटावर होणारी गंगा आरती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु मेलेल्या माणसाच्या राखेवर जिवंत माणसाचं आयुष्य तरंगत राहणार नाही, याची काळजी कोण घेणार... जगण्याच्या संघर्षात मेलेल्यांच्या जगात धावण्याची ही मॅरेथॉन कोण थांबवणार... महासत्ता होण्यासाठी प्रचंड वेगाने निघालेल्या समाजाचा विकासाचा मार्ग पडद्यामागच्या मसानपर्यंत कधी पोहोचणार...?
savitaprashant23@gmail.com
बातम्या आणखी आहेत...