आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक ऋषींचं स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पटले होते. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा गाभा असलेली भारतीय संस्कृती जगात एकमेव आहे. डॉ. कलाम यांना ते उमजले होते. त्याशिवाय क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि गीता एकाच वेळी त्यांच्या मनात रुजली नसती. डॉ. कलाम आधुनिक ऋषीच होते. ऋषी द्रष्टे असतात.
डॉ. होमी भाभा यांनी भारताच्या अणूयुगाची पायाभरणी केली होती. त्याच डॉ. भाभा यांना इलेक्ट्रॉनिक्सचेही महत्त्व पटले होते. भारताच्या प्रगतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा राहणार असल्याचे त्यांनी अोळखले होते. म्हणूनच त्यांनी त्यानुसार अणूऊर्जा आयोग, अवकाश मोहीम याप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्ससंदर्भातही स्वतंत्र कार्यक्रम सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. वैज्ञानिक प्रगतीमध्ये सगळ्या शाखांचा विकास एकमेकांच्या विकासाशी गुंतलेला असतो. अणूऊर्जा, अवकाश, उपग्रह, क्षेपणास्त्र आदींच्या संशोधनात इलेक्ट्रॉनिक्सची भूमिका मोठी राहणार होती. त्यामुळे मी जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स कमिशनच्या कामाची सुरुवात केली, तेव्हा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयोगशाळा हव्यात, अशी भूमिका मांडली. के. बी. पी. नंबियार यांनी ही सूचना उचलून धरली. ते स्वतः इंपिरियल कॉलेजमधून शिकून आले असल्याने त्यांना संशोधन आणि विकासाचे महत्त्व पटलेले होते. त्यांनी मला विचारले, की ही प्रयोगशाळा तू सांभाळणार का? त्या वेळी मी ३२-३३ वर्षांचाच होतो. पण मी ती जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीहून त्रिवेंद्रमला जायचे ठरवले. त्रिवेंद्रमला जाऊन प्रयोगशाळेची उभारणी सुरू केली.

ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण असे की, त्याच वेळी विक्रम साराभाई स्पेस कमिशन सुरू झालं होतं. रोहिणी उपग्रहाच्या यशस्वी उड्डाणानंतर आपण स्पेस लाँच व्हेईकल तयार करण्याच्या तयारीला लागलो होतो. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्त्व होते. विक्रम साराभाई सेंटर थुंबा येथे आहे. त्रिवेंद्रमपासून थोडेसेच दूर. थुंबा येथे जाण्यासाठी रोज बसची ये-जा व्हायची. तेथे काम करणारे बहुतेक जण शहरात राहायचे. थुंबाचे संचालक असलेले डॉ. कलामसुद्धा सहकाऱ्यांबरोबर राहता यावे म्हणून त्यांना दिलेले निवासस्थान सोडून शहरातल्या छोट्या लॉजमध्ये राहण्यासाठी आले. त्यांचे राहणीमान खूपच साधे होते. आहाराच्या आवडीनिवडी नाहीत. ते पूर्ण शाकाहारीच होते. प्रयोगशाळेतल्या प्रत्येकाशी संपर्क-संबंध राहण्यासाठी त्यांनी मुक्काम लॉजमध्ये हलवला होता.
थुंबाच्या प्रयोगशाळेत त्यांनी नवी कार्यसंस्कृती आणली. ती अशी की, २४ तास काम. प्रयोगशाळा चोवीस तास खुली ठेवली. कामासाठी संशोधकांनी कधीही यावे आणि कितीही वेळ काम करावे, असे स्वातंत्र्य तेथे होते. पुढे हीच संकल्पना मी पुण्याच्या "सीडॅक'मध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. थुंबा येथे डॉ. कलाम यांचे काम सुरू असतानाच आम्ही इलेक्ट्रॉनिक्सकडे लक्ष देऊ लागलो होतो. डॉ. कलाम यांच्याशी संबंध आला तो याच निमित्ताने. अनेक छोट्या-मोठ्या उपकरणांसाठी आपण त्या वेळी परावलंबी होतो. डॉ. कलाम यांचा प्रश्न असायचा की, आपण आपल्याला आवश्यक ते आपण स्वतः का तयार करू शकत नाही? त्या वेळी देशात परकीय चलनाची कमतरता होती. सर्व तंत्रज्ञान देण्याची अनेक देशांची तयारी नसायची. अशा वेळी मटेरियल्स, रेझिटर्स, कपॅसिटर्स, ट्रान्झिस्टर्स आदींची निर्मिती आम्ही सुरू केली. आम्ही तयार केलेली उपकरणे डॉ. कलाम वापरू लागले. अवकाश कार्यक्रमातील उपकरणांची गरज अत्यंत काटेकोर असते. विशिष्ट तापमान, दाब सहन करू शकणारी "स्पेस क्वालिफाईड' उपकरणे तयार करण्याचे आव्हान आम्ही पेलत होतो. "आपण तयार करू शकतो', हा डॉ. कलाम यांनी आमच्यात रुजवलेला आत्मविश्वास त्यामागे होता. त्यासाठी ते अनेकदा संवाद साधत, काय हवे ते सांगत. देशातल्या इलेक्ट्रॉनिक्स विकासाला चालना देण्याचे काम डॉ. कलाम यांच्या प्रेरणेतून झाल्याची माहिती फार थोड्या लोकांना आहे.

संशोधन आणि विकास क्षेत्रात संघभावना किती महत्त्वाची असते, याची शिकवणसुद्धा डॉ. कलाम यांच्याकडूनच मिळाली. महात्मा गांधीजी म्हणायचे, "बी द चेंज यु वाँट टू सी.' डॉ. कलाम यांचे वर्तन असेच होते. संस्कृतमध्ये "योजकः दुर्लभः' असे म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ. कलाम स्वतः मोठे महायोजकच होते. त्या काळच्या संशोधन संस्थांमध्ये आमच्याकडे येणारे अभियंते बऱ्याचदा नवखे, अननुभवी असत. त्यांच्याकडून विशिष्ट काम करून घेणे सोपे नसायचे. मात्र सामान्य लोकांना आत्मविश्वास देऊन असामान्य काम करून घेण्याची कला त्यांच्यात होती. इलेक्ट्रॉनिक्ससंदर्भातल्या आमच्या चर्चा सतत सुरू असायच्या. त्यांच्या गरजांप्रमाणे देवाणघेवाण होऊ लागली. कंपोनंट्स, मॉड्यूल्स तयार करून घेण्यासंदर्भात बोलणे व्हायचे. वास्तविक १९८०च्या दशकात डॉ. कलाम हे स्वतः देशपातळीवरचे प्रस्थापित शास्त्रज्ञ होते. माझी नुकतीच सुरुवात झाली होती. परंतु, आमच्या चर्चांमध्ये कोणतेही दडपण ते येऊ देत नसत. जुना मित्र असल्याप्रमाणे खांद्यावर हात टाकून, अगदी सहजतेने ते संवाद साधायचे.

भारताच्या अवकाश कार्यक्रमाला चांगले यश मिळू लागले. काही अपयशेही पचवावी लागली. परंतु, डॉ. कलाम यांचे गुरू सतिश धवन त्यांना नेहमी सांगायचे - "इफ यू फेल आय विल टेक द रिस्पॉन्सिबिलीटी. इफ यु सक्सीड टीम वुईल टेक द क्रेडीट.' हा गुरुमंत्र डॉ. कलाम यांनी अंगी बाणवला होता. अभियंत्याला भविष्य दिसावे लागते. आपल्या टीमची बलस्थाने, कमकुवत दुवे समजायला लागतात. डॉ. कलाम यांच्याकडे हे गुण होते. प्रत्येकाचे गुण ओळखून त्यानुसार त्याच्याकडून कामगिरी करून घेण्यात ते तरबेज होते. स्वतः घेतलेल्या निर्णयांबद्दल ते ठाम असायचे. एकदा निर्णय झाला की, त्याबद्दल कसलाही किंतु त्यांच्या मनात उरायचा नाही. ते निराश झाले आहेत, संतापले आहेत, असे कधीच कोणाकडून एेकायला मिळाले नाही. इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायरही तेथे होते. ते डॉ. कलाम यांचे लाडके होते. नायर यांना त्यांनीच घडवले.

त्रिवेंद्रम येथे डॉ. कलाम यांच्यासोबत सात वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते "डीआरडीओ'ला गेले. पुढे आमचा संबंध आला दिल्लीमध्ये. आम्ही दोघे अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांवर काम करत होतो. देशाच्या वैज्ञानिक विकासाबाबतचे धोरण, नियोजन ठरवण्याचे काम अामच्याकडे असायचे. त्या वेळी मी अनुभवले की, देशभरातल्या वेगवेगळ्या शाखांच्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. कलाम यांच्याबद्दल अतीव आदर असायचा. डॉ. कलाम यांच्याशी बोलताना पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधत असल्याचा भाव त्यांच्यात दिसे. डॉ. कलाम यांची देशाप्रती असलेली समर्पित वृत्ती आणि शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे ज्येष्ठत्व याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. याचे प्रतिबिंब त्यांना मिळणाऱ्या आदर आणि प्रेमभावनेत दिसायचे. "सीडॅक'मध्ये महासंगणकाचे काम सुरू असताना ते दोनदा येऊन गेले. त्या वेळचा त्यांचा संवाद आम्हा सर्वांचा उत्साह वाढवणारा ठरला होता.

देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेली कामगिरी नवी उंची गाठणारी ठरली. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन या माजी राष्ट्रपतींप्रमाणेच त्यांनी देदीप्यमान कामगिरी केली. लोकांमध्ये मिसळणारा राष्ट्रपती त्यांच्या रूपात देशाने अनुभवला. या पदाची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली असली तरी या पदाचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. त्यांचे वर्तन पूर्वीसारखेच साधे होते. राष्ट्रीय विकासाला दिशा देण्याची भूमिका राष्ट्रपती म्हणून त्यांनी घेतली. ट्वेंटी-ट्वेंटीच्या कार्यक्रमाबद्दल ते बोलू लागले. अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ लागले. विज्ञान-तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये नेण्यासाठी देशभर फिरून त्यांच्याशी ते संवाद साधू लागले. राष्ट्रप्रेम आणि विज्ञाननिष्ठा रुजवण्याचे अभिनव प्रयोग राबवत अक्षरशः लाखो लोकांपर्यंत ते पोहोचले. राष्ट्रपती म्हणून त्यांची ही कामगिरी अतुल्य आहे. राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यावर तर त्यांनी हा संवाद आणखी वाढवला.

उच्चकोटीचे शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्द व्यतीत केल्यानंतर, लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही विषयांवर एकमत असणारे आम्ही दोघेच शास्त्रज्ञ होतो. "संपूर्ण समर्पण'(सरेंडर) हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला. शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्ये काम करतात, विविध प्रकारचे संशोधन करतात; मात्र या सगळ्यामागचे ईश्वरीय तत्त्व कोणते आहे? मी शोध लावला म्हणजे काय? या सगळ्यामागच्या ऊर्जातत्त्वाचा म्हणजेच ईश्वराचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ईश्वर माझ्यातच वसला आहे, येथील चराचरात तो आहे, यावर त्यांचा विश्वास होता. ती प्रेरणा, त्या चेतनेचा, निर्मिकाचा शोध ते घेत होते. "क्वांटम मेकॅनिक्स'चे तत्त्व पूर्ण समर्पणाशिवाय समजणारच नाही. अभिमान, अहंकाराला येथे जागा नाही.

डॉ. कलाम मुस्लिम असल्याने त्यांच्या भारतीय तत्त्वज्ञानाबद्दलचे प्रेम आणि गीताप्रेमाबद्दल वेगळा विचार होतो. पण ते स्वतःच त्यांच्या रामेश्वरमधल्या दिवसांबद्दल नेहमी सांगायचे. त्यांचे वडीलभाऊ मशिदीत इमाम होते. शिक्षक कट्टर हिंदू होते आणि त्यांच्या घराशेजारीच चर्च होते. रामेश्वरमध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे सर्वधर्मीय राहतात. या वातावरणात ते वाढल्याने सगळ्यांशीच त्यांचा जवळून संबंध यायचा. शिक्षकांमुळे त्यांचा गीतेशी परिचय झाला. परंतु, त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये धर्म आड येण्याचे कारण नव्हते. विज्ञानाला धर्माशी घेणे-देणे नसते. डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या "टान्सेंडर्स' या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांच्याशी माझी अखेरची भेट झाली होती. हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असेच आहे. गीता, बायबल, कुराण या सगळ्या धर्मग्रंथांमधले दाखले त्यांनी यात दिले आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात ज्या द्वैत-अद्वैतापलीकडच्या अतिताची चर्चा हजारो वर्षांपासून आहे, त्याबद्दलच त्यांनी विवेचन केले आहे. सगुण-निर्गुणावर त्यांचे भाष्य आहे.

अध्यात्म आणि विज्ञान हे वेगळे नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, हे डॉ. कलाम यांना पटले होते. याची अनुभूती त्यांच्याबरोबरच्या चर्चांमधून मी घेतली आहे. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा गाभा असलेली भारतीय संस्कृती जगात एकमेव आहे. अाध्यात्मिक ज्ञान अनेक वैज्ञानिकांना समजत नाही. डॉ. कलाम यांना ते उमजले होते. त्याशिवाय क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि गीता एकाच वेळी त्यांच्या मनात रुजली नसती. विज्ञान आणि अध्यात्म या दोघांना एकत्र घेऊन डॉ. कलाम यांची विचारदृष्टी पुढे चालली होती. अध्यात्माचा संबंध कोणत्याही धर्माशी नाही, हे येथे आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे.

डॉ. कलाम हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. ते आधुनिक ऋषीच होते. ऋषी द्रष्टे असतात. डॉ. कलामही द्रष्टे होते. आतापुरता विचार त्यांनी केला नाही. उपग्रह-क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात डॉ. कलाम यांची दीर्घकालीन नियोजनाची दृष्टी दिसून येते. देशापुढे ठेवलेल्या ट्वेंटी-ट्वेंटी व्हिजनमधून त्यांच्या द्रष्टेपणाचे दर्शन होते. भारत प्रगत झाला पाहिजे, एवढेच नव्हे तर बलवान झाला पाहिजे, हे स्वप्न त्यांनी पाहिले. अर्थव्यवस्था गती घेत असताना त्या प्रगतीची फळे तळागाळात पोहोचली पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. भारत विश्वगुरु म्हणून पुढे यावा, ज्ञानाधिष्ठीत संस्कृतीचे जगात नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडेच आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच, त्या दृष्टीने भारताचे भविष्य असलेली उद्याची पिढी, विद्यार्थी घडवण्यासाठी ते देशाच्या कानाकोपऱ्यात जात होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच त्यांना मृत्यू यावा, हा तर दुर्लभ असा ईश्वरी योग म्हणावा लागेल. विश्वगुरु म्हणून भारताचे अस्तित्व प्रस्थापित करणे हीच डॉ. कलाम यांना आदरांजली ठरू शकेल.

शब्दांकन - सुकृत करंदीकर
बातम्या आणखी आहेत...