आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकलन: कलाम यांची शोकांतिका? ( प्रशांत दीक्षित )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रज्ञांमधील गुणसंपदेचे प्रगत देशात अवास्तव कौतुक होत नाही. ही गुणसंपदा तेथे गृहीत धरली जाते व त्या शास्त्रज्ञाच्या वैज्ञानिक कामगिरीवर चर्चा होते. या उलट आपल्याकडे गुणसंपदेची अफाट स्तुती होते व ‘ते महान संशोधक होते’ या एका वाक्यात वैज्ञानिक कामगिरीची बोळवण होते. डॉ. कलाम यांच्या जीवननिष्ठा या कलाम या व्यक्तीबरोबर झगझगीतपणे समाजासमोर येतात आणि त्या व्यक्तीबरोबरच काळाच्या पडद्याआड जातात. हीच कलामांची म्हणजेच भारताची शोकांतिका आहे...
डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या प्रतिक्रियांतून भारताचा स्वभाव दिसून आला. गेली कित्येक शतके हा स्वभाव आहे तसाच आहे. त्यात फारसा फरक पडलेला नाही.डॉ. कलाम हे मनाने अाध्यात्मिक, पण कृतीने वैज्ञानिक. कलामांना आध्यात्मिक म्हटल्यावर अनेकांना दचकायला होईल. कारण अध्यात्म म्हणजे बुवाबाजी, या पलीकडे अनेकांची समज गेलेली नाही. भक्तांना मनोराज्यात गुंगवत ठेवून स्वत:चा गल्ला भरण्याचे शास्त्र म्हणजे अध्यात्म, अशी समजूत झालेली आहे. अशी समजूत होण्यास तथाकथित बुवामंडळीही कारणीभूत आहेत. याच बुवामंडळींना पुढे करून बुद्धिवादीही भारताच्या अध्यात्मावर कोरडे ओढत असतात.

भारताच्या अध्यात्माची खरी ओळख असणारे मात्र कलामांना अाध्यात्मिकच समजतील. ‘मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिका नोहावे, लोकांप्रति’, असे ज्ञानेश्वरांनी अाध्यात्मिक माणसाचे वर्णन केले आहे. कलाम त्या वर्णनात बसतात. समाजाविषयी कमालीची कणव ही कलामांची एक प्रेरणा होती. समाजाच्या प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला किमान सुख मिळावे, त्याला कार्यक्षमतेने जगता यावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. ते श्रद्धावान होते व त्यांच्या कुटुंबाची रामेश्वरावर श्रद्धा होती. मुस्लिम असूनही ही श्रद्धा डळमळीत झाली नाही. ‘हिंदुइझम इज वे ऑफ लाइफ’, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी केली होती. त्यातून विकृत अर्थ काढण्याची धडपड डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूकडून चालते. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपण्णीचे उदाहरण म्हणून कलाम यांच्या आयुष्याकडे पाहता येईल.

ईश्वरावर श्रद्धा ठेवूनही चिकित्सक बुद्धीने विश्वाचा धांडोळा घेता येतो, याचे अनेक दाखले भारतीय परंपरेत मिळतात. सांख्य तत्त्वज्ञान यावरच आधारित आहे. कलाम हे या परंपरेतील होते. श्रद्धाशील असूनही कोणत्याही धर्माचे वा परंपरेचे झापड त्यांच्या बुद्धीवर चढले नाही. यामुळेच प्रत्येक समस्येवर ते वैज्ञानिक उत्तर शोधत राहिले. अणूबॉम्बविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होईल. पण अाध्यात्मिक विचाराच्या कलाम यांनी अणूबॉम्ब बनविण्यात पुढाकार कसा घेतला, असा प्रश्न पडतो. वाजपेयी यांनी अणूबॉम्बची चाचणी घेतली, हे देशातील ब-याच बुद्धिवादींना आवडले नव्हते. काँग्रेस व डावे पक्ष तर उघड विरोधात होते. कलाम यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी संधी न मिळण्यामागे हेही एक कारण होते. परंतु, कलाम यांचा दृष्टिकोन वेगळा होता. शांती हेच जगण्याचे मुख्य सूत्र असले पाहिजे, ही अाध्यात्मिक दृष्टी त्यांना मान्य होती. परंतु, ही शांती सामर्थ्यवान नसेल तर तिला कवडीची किंमत राहात नाही, हेही त्यांनी पाहिले होते. धार्मिक, राजकीय वा वैचारिक विचारांचे झापड त्यांनी जसे स्वत:वर बसविले नाही, तसेच शांतीसूत्रांचेही झापड बसवले नाही. परिस्थितीचे यथार्थ आकलन हा बुद्धिविशेष त्यांच्याकडे होता. शांततेची कवने गात व देशातील तसेच जगातील अण्वस्त्रविरोधी चळवळींमध्ये सामील होत, अनेक पुरस्कार मिळवित माध्यमांमध्ये लोकप्रियता मिळविणे कलाम यांना सहज शक्य होते. पण तो विचार त्यांना शिवलाही नाही. त्यांचे राष्ट्रीयत्व हे अन्य राष्ट्रांच्या विरोधी नव्हते. मात्र अन्य राष्ट्रे जेव्हा फक्त आणि फक्त सामर्थ्याची भाषा जाणतात, तेव्हा तोच मार्ग अनुसरला पाहिजे, हे त्यांना कळले होते. ही वैज्ञानिक दृष्टी होती. याच दृष्टीमुळे अणूऊर्जेबरोबरच अलीकडच्या काळात त्यांनी सौर ऊर्जेचे मिशन हाती घेतले. सौरऊर्जा ही देशाला वरदान ठरू शकते, ती स्वस्त करण्यासाठी अभियांत्रिकीचे प्रयोग झाले पाहिजेत, असे असे आवाहन ते गेली चार वर्षे सातत्याने करीत होते. मुंबई आयआयटीमध्ये झालेले त्यांचे भाषण या विषयासाठी ऐकण्यासारखे आहे.

प्रत्येक समस्येवर तंत्रज्ञानातून उत्तर शोधण्याची धडपड, श्रद्धेला बुद्धीची जोड, वैज्ञानिक धारणा आणि जगाचे भले व्हावे, या पलीकडे कोणताही छुपा वैचारिक, पंथीय वा धार्मिक अजेंडा न बाळगणारी मोकळी वृत्ती म्हणजे, डॉ. अब्दुल कलाम. ‘इस्रो’मधील कार्यातून ही वृत्ती बळकट झाली असावी. इस्रोचे वैशिष्ट्य असे की, ही संस्था थेट पंतप्रधानांच्या अखत्यारित येते. यामुळे तेथे राजकीय, सामाजिक, पंथीय वा धार्मिक हस्तक्षेप नसतात. राजकारण व समाजकारणात सर्रास वापरली जाणारी ही हत्यारे काही संस्थांसाठी तरी म्यान केली पाहिजेत, हे शहाणपण भारताच्या सुदैवाने, प्रत्येक पंतप्रधानांकडे होते. इस्रो, भाभा अणुसंधान केंद्र, आयुका अशा संस्थांमध्ये फक्त गुणवत्तेला अग्रस्थान मिळाले. परिणामी, केवळ याच संस्था आज जगात प्रतिष्ठा मिळवून आहेत. आणीबाणी हा इंदिरा गांधींचा सर्वात वाईट निर्णय असेल. पण इस्रोसारख्या संस्थांमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातले व सतीश धवन, कलाम, गोवारीकर यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाला वाव दिला. पुढे राजीव गांधी, नरसिंह राव, वाजपेयी यांच्यापर्यंत ही समज कायम होती. स्वत: मनमोहनसिंग हे राव यांच्या पठडीतील होते.
प्रगत देशांकडून कोणतीही मदत मिळत नसताना उपग्रहांची मोहीम यशस्वी करणे, हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही अवघड काम होते. सतीश धवन यांनी ते तडीस नेले व त्यामध्ये कलाम सहभागी होते. तपशिलाबाबत अचूकता हे कोणत्याही अवकाश मोहिमेचे अत्यावश्यक अंग असते. शिस्तबद्ध विचार केल्याखेरीज अवकाश मोहीम यशस्वीच होऊ शकत नाही. इस्रोमध्ये ही बौद्धिक शिस्त पाळली गेली. कलामांनी हीच शिस्त पुढे अन्य अनेक समस्यांबाबत राबविली. महासत्ता होण्याची ते बडबड करीत नव्हते, तर त्याचा आराखडा त्यांच्याकडे होता. तो आराखडा राबविण्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी तळमळीने बोलत होते.

इथेच डॉ. कलाम यांच्या शोकांतिकेचा प्रारंभ होतो. त्यांनी मांडलेल्या आराखड्यावर टाळ्या वाजविणा-या हातांची कमतरता नव्हती. त्यांच्या मांडणीवर बेहद्द खुश होणारे नेतेही होते. या सर्वांनी श्रद्धांजली वाहताना कलाम यांची वाहवा केली आहे. परंतु, कलामांच्या प्रेरणादायी शब्दसुमनांना वास्तवात आणण्याची, त्यावर प्रयोग करून अशा प्रयोगांना राष्ट्रीय स्वरूप देण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. प्रवचनांवर खुश होणारी भारतीय मानसिकता ही कलामांचाही पराभव करून गेली. इस्रोने जसे वास्तव यश दाखविले तसे यश अन्य क्षेत्रात मिळावे, ही कलामांची आकांक्षा होती.

खरे तर प्रत्यक्ष प्रयोग करीत, नवे नवे शोध लावण्याऐवजी व्याख्याने देत बसणे ही कोणत्याही जातिवंत वैज्ञानिकासाठी शिक्षाच म्हणावी लागेल. कलाम हे शिक्षक असले व लोकांना शिकविण्याची उदंड हौस त्यांना असली तरीही ते प्रयोगशील शिक्षक होते. भारतीय जनतेने त्यांच्यातील शिक्षकाला दाद दिली व प्रयोगशीलता बाजूला सारली.

या शोकांतिकेचा आणखी एक पैलू म्हणजे, भारतात व्यक्तिगत गुणांना संस्थात्मक स्वरूप येत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, नावीन्याचा ध्यास, समस्यांवर उत्तरे शोधण्याची जिद्द, जात-धर्म-पंथ-वैचारिक निष्ठा यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वृत्ती, असे गुण डॉ. कलाम, सतीश धवन, ई. श्रीधरन अशा काही व्यक्तींपुरते मर्यादित राहतात. संस्थांमध्ये हे गुण उतरत नाहीत. ‘मिसाईल मॅन’ म्हणून कलाम यांचा गौरव होतो, पण शंभर मिसाईल उभी राहात नाहीत. डीआरडीओमध्ये निर्माण झालेली शस्त्रे अद्याप लष्कराच्या वापरात आलेली नाहीत. लष्कराला अद्याप अन्य देशांवरच अवलंबून राहावे लागत आहे. दिल्ली मेट्रोपासून शिकून घेऊन अनेक शहरांत मेट्रो उभ्या राहात नाहीत. प्रत्येक ठिकाणी ई. श्रीधरन यांनाच पाचारण करण्यात येते.
प्रगत देश व भारत यांच्यामध्ये हा फरक आहे, तो आपण गंभीरपणे समजून घेतला पाहिजे. चमकदार शब्दांवर आपण फिदा होतो, पण कृती करण्यासाठी कंबर कसत नाही. कलाम यांचा साधेपणा, निगर्वी वृत्ती, संगीतावरील प्रेम, बालसुलभ औत्सुक्य, तीव्र बुद्धिमत्ता अशा गुणांचे कौतुक प्रत्येक श्रद्धांजली लेखात झाले आहे. हे गुण कौतुकास्पद आहेतच. परंतु, जगातील प्रत्येक मोठ्या वैज्ञानिकामध्ये हे गुण आढळतील. अणूविज्ञान व अवकाश तंत्रज्ञान यांचा जागतिक इतिहास पाहिला, तर या क्षेत्रातील बहुतेक सर्व शास्त्रज्ञांकडे हीच गुणसंपदा होती. हायझेनबर्ग, बोर यांच्यासारखे शतकापलीकडील शास्त्रज्ञ पाहा वा रिचर्ड फेनमन, डेव्हिड बोम यांच्यासारखे गेल्या पिढीतील पाहा. हीच गुणसंपदा त्यांच्यामध्ये दिसेल. पहिला अणूबॉम्ब निर्माण करणारा ओपनहायमर महत्त्वाकांक्षी असेल, पण अणूबॉम्बचा संहार अन्य अनेक शास्त्रज्ञांना कमालीचा अस्वस्थ करून गेला. ऑटो हान हा जर्मन शास्त्रज्ञ तर आत्महत्या करण्यास निघाला होता. युरेनियम अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला तर अणूचे विघटन होते, हा शोध ऑटो हान याने प्रथम लावला होता. त्यातूनच पुढे अणूबॉम्ब तयार झाला. आपल्या शोधामुळेच लक्षावधी नागरिकांना जीव गमवावा लागला, ही बोच त्याला कायम लागली. आपण पाप केले, अशी त्याची भावना झाली. करुणा या स्थायीभाव असल्याशिवाय असे होणे शक्य नाही.

मात्र, शास्त्रज्ञांमधील या गुणसंपदेचे प्रगत देशात अवास्तव कौतुक होत नाही. ही गुणसंपदा तेथे गृहीत धरली जाते व त्या शास्त्रज्ञाच्या वैज्ञानिक कामगिरीवर चर्चा होते. या उलट आपल्याकडे गुणसंपदेची अफाट स्तुती होते व ‘ते महान संशोधक होते’ या एका वाक्यात वैज्ञानिक कामगिरीची बोळवण होते. डॉ. कलाम यांच्या जीवननिष्ठा या कलाम या व्यक्तीबरोबर झगझगीतपणे समाजासमोर येतात आणि त्या व्यक्तीबरोबरच काळाच्या पडद्याआड जातात. गुण हे व्यक्तीतून संस्थेत परिवर्तित होत नाहीत. व्यक्तिपूजक भारतीय हा संस्थापूजक होत नाही. व्यक्तिपूजेच्या या प्रभावापासून देशातील कोणतीही विचारधारा मुक्त नाही. हीच कलामांची म्हणजेच भारताची शोकांतिका आहे.

prashant.dixit@dbcorp.in