आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधांचे अनन्यसाधारण वेळापत्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवाचगावाला जाऊन आलो. काल आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम होता. बाकी तब्येतीची तशी काही तक्रार नाही, फक्त ब्लड प्रेशरची एक गोळी रोज आहे... बरेच दिवसांनी भेटलेले एक परिचित खुशाली सांगत होते. ‘गेले चार दिवस बीपीची गोळी घेतलीच नाहीये यांनी. तसा काही त्रास नाही वाटत म्हणा...’ त्यांच्या सौ.नी माहिती दिली. चक्क चार दिवस गोळीला दांडी! ‘का?’ असं विचारता ‘काय ना, गोळ्या संपल्यात. केमिस्टकडे जायलाच नाही झाले’ असे उत्तर आले.

आता पाहा, बाकी सर्व करायला वेळ आहे; पण औषध आणायला वेळ नाही? नाही, इथे वेळ नसण्याच्या प्रश्न नसतो. गोळीचे महत्त्व, गोळीमुळे कसा रक्तदाब स्थिर राहतो, गोळी चुकल्यास काय विपरीत परिणाम होऊ शकतात, याबाबतीत असलेले अज्ञान, तर कधी दुर्लक्ष असे ‘औषधचुकार’पणाचे प्रकार अनेक. कधी डोस अधूनमधून विसरणे, काही दिवस सलग औषध न घेणे, स्वत:हूनच औषध कायमचेच बंद करणे, डॉक्टरांकडे फेरतपासणीस अजिबात न फिरकणे असे चुकारपणाचे अनेक नमुने.

औषधांचे वेळापत्रक न पाळल्याने यथावकाश कधीतरी इमर्जन्सी येऊन मग डॉक्टरांकडे धाव घेणे अनेक रुग्णांच्या बाबतीत होत असते. म्हणूनच का पाळायचे हे वेळापत्रक, याबाबतची ही चर्चा.
तोंडावाटे औषध घेतल्यावर ते जठर, आतडे येथे पोहोचते व तेथून रक्तात शोषले जाते. थोडी स्थानिक परिणाम करणारी औषधे सोडली तर बहुतांशी औषधांचा परिणाम होण्यासाठी त्यांचे रक्तात पोहोचणे आवश्यक असते. रक्तवाहिन्या म्हणजे औषधासाठी द्रुतगती महामार्गच. रक्तात शोषले गेलेले औषध मग विविध अवयवांपर्यंत पोहोचते. त्यातील एक अवयव हा त्याचे ईप्सित कार्यस्थळ (टार्गेट ऑर्गन) असतो. उदाहरणार्थ, मेंदू हे झोपेच्या गोळ्यांचे कार्यस्थळ, तर फुफ्फुसे हे दम्याच्या औषधांचे. कार्यस्थळी पोहोचून परिणाम साधण्यासाठी औषधांचे प्रमाण रक्तात एका किमान पातळीला पोहोचणे आवश्यक असते.

एकदा औषधाचा डोस घेतला, की काही काळ त्याची रक्तात पातळी योग्य राहते, पण औषधाच्या गुणधर्मानुसार काही तासांतच त्याचे यकृतात विघटन हो‌ऊन मूत्र/शौचमार्गाने ते बाहेर पडू लागते व रक्तातील पातळी कमी होऊ लागते. थोडक्यात, एका डोसची पुण्याई फार काळ टिकत नाही. नेमके म्हणूनच पुढचा डोस वेळेवर घ्यायचा म्हणजे, खालावणारी ही पातळी पुन्हा योग्य राहू शकते. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलेले डोसचे वेळापत्रक पाळायला हवे. उदा. १-०-१ म्हणजे सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा औषध घ्यायचे. ०-१-० म्हणजे दुपारीच फक्त एक डोस, पुढचा डोस दुस-या दिवशी दुपारी. आजाराचे स्वरूप व औषधाचा प्रकार याप्रमाणे डॉक्टर डोस व डोसच्या वेळा प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतात. समजा, एखादा डोस विसरला तर? शक्यतो विसरायचा नाहीच, पण तसे झाल्यास जेव्हा आठवण होईल तेव्हा लगेच औषध घ्यायचे, पण पुढच्या डोसची वेळ जवळ आली असल्यास आधीचा डोस न घेता पुढचा डोस वेळेवर घ्यायचा. डबल डोस मात्र कधीच घ्यायचा नाही.

आता औषध वेळा पाळण्याचे महत्त्व आपण बघितले. पण औषध नेमके किती कालावधीपर्यंत घ्यायचे? अर्थातच डॉक्टरांनी लिहून दिले असेल तितके दिवस ते घ्यायचे. अँटिबायोटिक्सचा कोर्स पाच दिवसांचा असेल, तर बरे वाटू लागले म्हणून एक-दोन दिवसांत सोडायचा नाही. बरे वाटणे व बरे होणे यात फरक असतो. कोर्स अर्धवट सोडल्याने शरीरातील न मारले गेलेले जंतू पुढे निर्ढावून इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) अधिक तीव्र स्वरूपात नंतर कधीतरी उलटते. क्षयरोगाची औषधे कमीत कमी सहा महिने घ्यायची, पण ती मध्येच थांबवली तर कालांतराने घातक स्वरूपाचा ‘रेझिस्टंट टीबी’ होण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाबात बहुधा कायमस्वरूपी औषधे घ्यायची असतात. पण किमान ५०% रुग्ण तरी औषधे अनियमित घेतात, किंवा गोळी स्वमनाने बंदच करतात. मग कधीतरी अचानक रक्तदाब वाढतो व मेंदूत रक्तस्राव, हार्ट अॅटॅक अशी आपत्ती उद्भ‌वते. औषध न घेतल्याने स्वत:वर ओढवून घेतलेली ही संकटे. ‘फिट्स’सारख्या आजारात औषध अचानक बंद करायचे नसते, तसे केल्यास आजार उद्भ‌वतो. अनेकदा अगदी विरुद्ध रुग्ण‌वर्तनही आढळते. डॉक्टरांनी काही दिवसांपुरतेच लिहून दिलेले औषध रुग्ण त्यानंतरही सर्रास घेत राहतात. वेदनाशामके, झोपेच्या गोळ्या इ.बाबत हे ‘सेल्फ मेडिकेश‌‌‌न’ बरेचदा दिसते. याची सविस्तर चर्चा आता नाही. पण हादेखील औषध वेळापत्रक निकालात काढल्याचाच वेगळा नमुना आहे, हे जरूर लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, औषधांबाबतचा ‘कॅज्युअल’ दृष्टिकोन बदलून अधिक गांभीर्याने त्याचा विचार व्हायला हवा. कंटाळा, विस्मरण सोडून आठवणीने औषधांच्या वेळा व कालावधी सांभाळायला हवा. औषधाची आठवण राहावी, यासाठी
*आपल्या औषधाचे वेळापत्रक, तक्ता फ्रिजवर/ कपाटावर वा सोयीस्कर ठिकाणी लावावा.
*औषध घेतल्यावर कॅलेंडरवर/ तक्त्यावर टिकमार्क करणे, विस्मरण होत असल्यास कुटुंब सदस्यासमोरच औषध घेणे.
*मोबाइल / कॉम्प्युटरवर औषध वेळांचे ‘रिमाइंडर’ लावणे.
*हल्ली ‘पिल बॉक्स’ (Pill Box) मिळतात. त्यात आठवडाभराच्या गोळ्या सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र अशी विभागणी करून भरून ठेवता येतात.
*असा हवाबंद बॉक्स स्वत: किंवा फार्मासिस्टच्या मदतीने दर आठवड्याला भरून त्यातून गोळ्या घ्याव्यात.
*परदेशात फार्मासिस्ट रुग्णाला ‘रिफिल’ किंवा डोसबाबतचे रिमाइंडर पाठवतात. आपल्याकडेही काही फार्मासिस्टनी ही सेवा चालू केली आहे व ते निश्चित स्वागतार्ह आहे.

symghar@yahoo.com